लेख – कोकण रेल्वेची नियोजनशून्य तीन दशके

955

>> सुरेंद्र मुळीक ([email protected])

कोकण रेल्वेला आता 29 वर्षे, म्हणजे जवळजवळ तीन दशके पूर्ण झाली. मात्र त्याचा महाराष्ट्रातील कोकण विभाग आणि तेथील कोकणी माणसाला काय फायदा झाला, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर शून्य असे द्यावे लागेल. कारण कोकण रेल्वेचा नियोजनशून्य कारभार. असा गलथानपणा असूनही 2018-19 या वर्षात 102 कोटी नफा होत असेल तर योग्य नियोजन केल्यावर त्याच्या चारपट फायदा होऊ शकतो. मात्र सगळाच गोंधळ आहे. पहाटे 5.25 ते 7.25 या केवळ दोन तासांत कोकणात म्हणजे फक्त गोव्यात जाण्यासाठी तब्बल पाच गाडय़ा मुंबईहून सोडल्या जातात, मात्र त्यानंतरच्या 16 तासांत कोकणात जाण्यासाठी एकही गाडी नाही. हे कुठले नियोजन म्हणायचे?

नियोजनाअभावी नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या कोकण रेल्वेच्या पायाभरणी समारंभाला नुकतीच 29 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त गोव्यातील फातोर्डा येथे एक समारंभ पार पडला. तसे कोकण रेल्वेला समारंभ कधी करायचा हे सांगण्याची आवश्यकता नसते. वर्षातील 12 महिने कोकण रेल्वे समारंभ करीत असते. आज काय तर वर्धापन दिन, उद्या काय तर लोकार्पण सोहळा दिवस, परवा काय तर सरकत्या जिन्याचे उद्घाटन, मग स्वछता पंधरवडा असे समारंभ सुरूच असतात. अगदी जिन्याची लादी जरी नवीन लावली तरी समारंभ झाला म्हणून समजा. पण मागील 30 वर्षांत कोकण रेल्वेने महाराष्ट्राच्या कोकणसाठी एखादी गाडी सोडली आणि त्याचा समारंभ केला असे होताना दिसले नाही. याचे कारण कोकण रेल्वेच्या उच्च स्थानावर असलेले परप्रांतीय अधिकारी. त्यामुळेच रोहा ते ठोकूरपर्यंत पसरलेल्या या मार्गापैकी महाराष्ट्र सोडूनच गाडय़ा पळविणे आणि समारंभाच्या नावाखाली उधळपट्टी सुरू असते. कालचा पायाभरणी समारंभही त्यातलाच भाग होता. म्हणूनच तो गोव्यात झाला. या समारंभात कोकण रेल्वेच्या प्रशासनाने कोकण रेल्वेचा मार्ग 1997 साली सुरू झाल्यापासून 2019 पर्यंत काय केले याचा पाढा वाचला आणि स्वतःच स्वतःवर स्तुतिसुमने उधळली, पण प्रवाशांच्या मागण्या आणि अडचणींबाबत ‘ब्र’ काढला नाही.

वास्तविक, कोकण रेल्वेमुळे उर्वरित हिंदुस्थान जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम झाले. त्यामुळेच आज उत्तरेकडील प्रवासी थेट दक्षिणेपर्यंत प्रवास करू शकतो. याचा फायदा दक्षिणेकडील कर्नाटक, केरळ राज्यांना झाला आणि त्यानंतर गोवा राज्यालाही, पण महाराष्ट्राच्या कोकण प्रांताच्या हाती काहीच लागले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे दक्षिणेकडील राज्यांना जोडण्यासाठीच हा मार्ग निर्माण करण्यात आला होता. त्यामुळे उत्तरेकडून आणि मुंबईतून जास्तीत जास्त गाडय़ा केरळकडे धावू लागल्या. उत्तर आणि दक्षिण मार्ग जोडण्यासाठी महाराष्ट्र ही फार मोठी अडचण होती. कारण सर्वाधिक जास्त जमीन कोकण प्रांताची जाणार होती. त्यामुळे त्यावेळी वेगवेगळी आमिषे दाखवून कोकणच्या जनतेला जमीन देण्यास भाग पाडले गेले, पण आज तीस वर्षांनंतर कोकणच्या हाती काहीच लागलेले दिसत नाही. रेल्वे नाही आणि नोकऱ्या नाहीत. सर्वच प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या दिल्या असे कोकण रेल्वेचे प्रशासन सांगत आहे, पण ते सत्य नाही. मागील आठवडय़ातच कोकण रेल्वेच्या गाडीतून प्रवास करताना एका प्रवाशाची भेट झाली.

त्यांनीच त्यांच्या गावातील संकेत अनंत माळी यांची कथा सांगितली. त्यांच्या मुलाला अद्यापही नोकरी मिळाली नाही. कोकण रेल्वेच्या बेलापूर व रत्नागिरीच्या कार्यालयात त्याने अनेक चकरा मारल्या, पण त्याला टोलवाटोलवीची उत्तरे मिळत आहेत. वास्तविक कोकण रेल्वेतील इतर सारी भरती आणि गाडय़ांचे नियोजनशून्य वेळापत्रक याबाबत संपूर्ण कोकणात जनआंदोलन होणे गरजेचे आहे, पण कोकणातील सुस्तावलेले लोकप्रतिनिधी आणि विविध राजकीय पक्षांतील पुढारी यामुळे हे शक्य होत नाही. याचा गैरफायदा कोकण रेल्वे प्रशासन घेत असून कोकणी जनता नाहक भरडली जात आहे. कोकण रेल्वेसारखा प्रकल्प अन्य राज्यांतून जर गेला असता तर तेथील राजकीय पुढाऱ्यांनी मोठे आंदोलन उभारून या रेल्वेवर आपला कब्जा निर्माण केला असता. महाराष्ट्रात मात्र कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या साथीने मनमानी कारभार केला. गोवा, कर्नाटक, केरळ ही तीन राज्ये समोर ठेवूनच गाडय़ांचे वेळापत्रक तयार केले. याबाबतही कोकणच्या जनतेची तक्रार नाही, पण या गाडय़ांना कोकणातील विविध स्थानकांवर थांबा द्यायला हवा होता. मात्र तसे झाले नाही. त्यामुळेच कोकणची जनता नाराज झाली.

नुकत्याच पार पडलेल्या 29व्या वर्धापनदिनी कोकण रेल्वे प्रशासनाने आकडय़ांचा मोठय़ा प्रमाणात खेळ करीत 2018-19 साली 102 कोटी रुपयांचा निव्वळ फायदा झाल्याचेही कबूल केले. इतकेच नव्हे,  कोकण रेल्वेच्या स्थानकावर मागील वर्षी 2 हजार 257 अपराध्यांना दंड ठोठावला, तर 1 हजार 622 अनधिकृत विक्रेते आणि 25 चोरांना अटक केली, असेही सांगितले. या सर्व अटक झालेल्या अनधिकृत विक्रेत्यांची नावे प्रसिद्ध केली असती तर अधिक बरे झाले असते. एकंदरीत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासमोर कोकण रेल्वेच्या चांगल्या कामाची टिमकी वाजवीत असताना स्वतःच्या नियोजनशून्य कारभाराबाबतही थोडेसे सांगितले असते तर योग्य झाले असते. रेल्वेमंत्री गोयल यांनाही समजले असते की, नियोजन ठेवून गाडय़ा चालविल्या तर 102 कोटी रुपयांपेक्षा चारपट फायदा होऊ शकतो, पण स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून अशाच पद्धतीने मध्य आणि कोकण रेल्वे चालत आहेत. त्यामुळे गाडय़ांचा पुरता बट्टय़ाबोळ झाला आहे. कसे ते आपणच पहा.

पहाटे 5.25 ते 7.25 या केवळ दोन तासांत कोकणात म्हणजे फक्त गोव्यात जाण्यासाठी तब्बल पाच गाडय़ा मुंबईतून सोडण्यात येतात. 1) 5.25 जनशताब्दी 16 डबे, 2) 5.30 डबल डेकर 9 डबे, 3) 5.45 तेजस 16 डबे, 4) 6.30 दिवा पॅसेंजर 24 डबे, 5) 7.20 मांडवी 24 डबे

म्हणजेच तीन तासांत तब्बल 98 डबे गोव्यासाठी रवाना होतात. आता सांगा, जर पाठोपाठ गाडय़ा सोडल्या तर प्रवासी मिळणार का? त्यात या सर्व गाडय़ा पहाटे निघत असल्याने अंधेरीच्या पुढील प्रवाशांसाठी सोयीच्या नाहीत. परिणामी दोन गाडय़ांचे प्रवासी पाच गाडय़ांत विभागले गेल्याने पाचही गाडय़ा रिकाम्या धावतात. आणखी मजा म्हणजे त्यानंतर तब्बल 16 तास म्हणजे रात्री 11.30 पर्यंत कोकणात जाण्यासाठी गाडी नाही. हा कारभार चुकीचा आहे हे शेंबडे मूलही सांगू शकते, पण मध्य आणि कोकण रेल्वेच्या स्वतःला विद्वान समजणाऱ्या अधिकाऱ्यांना हे समजू नये यातच सारी गोम आहे.

पहाटे  ज्या पाच गाडय़ा मुंबईतून गोव्यासाठी सोडल्या जातात त्यातील एखादी गाडी कमी करून ती गोव्यातून पहाटे 5.30 वाजता सोडण्यात यावी व मुंबईत दुपारी एक वाजता पोहोचताच गोव्यात परतीच्या प्रवासाला पाठवावी. म्हणजे मधील 16 तासांचा ‘गॅप’ भरला जाईल. पण प्रवाशांच्या या मागणीकडे कानाडोळा करावयाचा हेच अनेक वर्षे कोकण रेल्वे प्रशासन करीत आहे.

हाती आलेला पैसा खर्च करण्यासाठी फक्त स्थानके निर्माण करावयाची आणि थाटामाटात उद्घाटन करून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकायची. या स्थानकावर एखादी passenger वगळता कोणत्याही गाडीला थांबा द्यायचा नाही हेच सुरू आहे. इंदापूरपासून मडुरे स्थानकापर्यंत हीच स्थिती आहे. रत्नागिरी ते वैभववाडी स्थानकांदरम्यान विलवडेसारख्या महत्त्वपूर्ण स्थानकावर फक्त तीन गाडय़ा थांबतात व मांडवीसारख्या गाडीला थांबा नाही यासारखी शोकांतिका नाही. 20 वर्षे झाली या स्थानकावर PRS म्हणजेच प्रवासी आरक्षण केंद्र नाही आणि मुंबईला येण्यासाठी फक्त एका गाडीत दोन प्रवासी कोटा. मग येथील जनतेने करावयाचे काय? सावंतवाडी येथून सुटणारी 11004 तुतारी एक्स्प्रेसच्या बाबतीतही असेच आहे. सात तासांचा प्रवास करण्यासाठी ही गाडी 13 तास घेते. म्हणजेच passenger झाली, पण प्रवाशांकडून भाडे घेतले जाते एक्स्प्रेसचे. हे असे का? याचे उत्तर कोकण रेल्वेने द्यावयास हवे. जनशताब्दीच्या बाबतही असेच झाले. सावंतवाडीची जनता गेली 20 वर्षे या गाडीला थांबा मिळविण्यासाठी झगडत होती. अखेर थांबा मिळाला, पण थांबा मिळताच जसा काही ‘‘आम्हीच थांबा दिला!’’ अशा थाटात कोकण रेल्वेने पत्रक काढले. या पत्रकात असे म्हटले आहे की, जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा दिल्याने कोकण रेल्वेचे वर्षाला  सात लाख प्रवासी वाढतील. मग हे सारे कोकण रेल्वेला 20 वर्षे का समजले नाही? यातच सारे मुद्दे स्पष्ट होत आहेत. म्हणूनच मनमानीपणे गाडय़ा चालविणाऱ्या कोकण रेल्वेला लगाम घालणे गरजेचे आहे आणि ती वेळ आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या