रंगदेवतेचा सच्चा उपासक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोहिणी निनावे,  [email protected]

ज्येष्ठ नाट्यकर्मी कुमार सोहनी. नाट्यदिग्दर्शनाचे अर्धशतक कधीच पूर्ण झाले आहे. आता वाटचाल शतकाकडे!

कुमार सोहोनी हे नाट्यक्षेत्रातलं फार मोठं नाव आहे. त्यांच्या प्रसिद्धीझोतात न राहण्याच्या स्वभावामुळे. त्यांच्या नावाभोवती ते वलय फारसं नाही. म्हणूनच त्यांच्या कामाबद्दल वाचकांना माहीत करून देणं आवश्यक आहे.

असं मला वाटलं. कुमारजींची आणि माझी भेट अनेक वर्षांपूर्वी संस्कार या मालिकेच्या वेळी झाली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘संस्कार’ या मालिकेचं शीर्षकगीत मी लिहिलं होतं आणि त्यात कामही केलं होतं. हसतखेळत काम करण्याची त्यांची पद्धत मला तेव्हाच माहीत झाली होती.  त्यांनी मी लिहिलेलं ‘क्षण एक पुरे’ हे नाटक आणि  ‘तुझ्याचसाठी’ हा चित्रपटही दिग्दर्शित केला होता.

आम्ही दीनानाथ नाट्यगृहात भेटायचं ठरवलं. तिथल्याच लॉबीमध्ये एका बाजूला बसून गप्पा मारायला सुरुवात केली. म्हटलं कुमारजी, मला तुम्ही लिहिलेली महत्त्वाची नाटकं माहीत आहेत, पण तुमची या क्षेत्रातली सुरुवात कशी झाली वगैरे काही बोलणंच झालं नाही …! कुमारजी म्हणाले, माझी आई शोभना सोहनी ही संगीत विशारद होती. त्यामुळे मी गायक व्हावं अशी तिची इच्छा होती. त्याप्रमाणे मी गाणं शिकायला लागलो. माझे आई आणि वडील राष्ट्रसेवा दलाच्या कला पथकातून काम करायचे. नाटकात कामही करायचे. त्यांच्याबरोबर मीही काम करायला लागलो. लीलाधर हेगडे, निळू फुले, दादा कोंडके, राम नगरकर, वसंत बापट यांसारख्या मोठ्या कलाकारांबरोबर मी काम करायला लागलो. माझा रंगमंचावरचा सहज वावर होऊ लागला आणि कदाचित तेव्हाच मी या क्षेत्रात काम करणार हे निश्चित झालं.

संचात यांच्या कलापथकात छोटा शाहीर म्हणून गाणं म्हंटलं होतं. राष्ट्रसेवा दलाच्या ठाणे कलापथकातून भाग घेत असताना दादा कोंडके, व्यंकटेश माडगूळकर, पु. ल. देशपांडे यांच्या वगनाट्यात मी भाग घ्यायला लागलो आणि त्यातून शिकूही लागलो. पुढे ठाणे कॉलेजमध्ये असताना महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत भाग घ्यायचा आणि अंतिम फेरीमध्ये प्रथम पारितोषिक मिळवायचे हे सगळ्यांचं स्वप्न होतं. आम्ही ठाण्यातल्या मित्रांनी एकत्र येऊन संस्था स्थापन करायचं ठरवलं आणि राज्यनाट्य स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पैसे हवे म्हणून दादा कोंडके यांचा ‘मुंबईची लावणी’ हा कार्यक्रम करायचं ठरवलं . 4 मे 1973 रोजी माझी दिग्दर्शक म्हणून अशी पहिली सुरुवात झाली, त्याच दिवशी ‘कला सरगम’ ठाणे या आमच्या हौशी नाट्य संस्थेची स्थापना झाली… आणि आम्ही वेगवेगळ्या नाट्यस्पर्धांमधून भाग घ्यायला लागलो.

एकीकडे सिव्हिल ड्राफ्ट्समनची नोकरी करत असताना मी 1975 साली ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या शिष्यवृत्तीसाठी अप्लाय केलं.  काही हजार मुलांपैकी फक्त 2 मुलांना शिष्यवृत्ती मिळणार होती. इब्राहिम अल्काझी, दीना पाठक, बी. वी. कारंथ. एम. के. रैना, कमलाकर सोनटक्के असे दिग्गज लोक इंटरव्हय़ूसाठी होते. परंतु माझा इंटरव्हय़ू चांगला झाला आणि मी दुसरा आलो. मला 3 वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळाली.

या सगळ्या प्रवासात अभिनेत्री सुहास जोशी यांचं मोलाचं मार्गदर्शन मला मिळालं.  एनएसडीमधून शिकून आल्यावर आमच्या ग्रुपच्या संस्थेद्वारे नाटक करायचं ठरलं. प्र. ल. मयेकर लिखित ‘अथ मनुस जगन हं’ हे स्पर्धेतलं आमचं नाटक खूपच गाजलं. हे नाटक बघून श्रीराम लागूंनी मला भेटायला बोलावलं आणि रावसाहेब हे नाटक घडलं. अर्थात माझं पहिलं व्यावसायिक नाटक म्हणजे ‘अग्निपंख’. यात डॉक्टर लागू, सुहास जोशी, स्वाती चिटणीस, अरुण नलावडे अशी मातबर नट मंडळी होती. अशा तऱहेने सुरुवातच दणक्यात झाली. मोठमोठ्या असामी हे नाटक बघायला येऊन गेल्या. या प्रवासात डॉक्टर लागूंनी भावनिक आणि आर्थिक मदत केली. कुठे ही बोलू नकोस या अटीवर. ‘रावसाहेब’मध्ये नायकाची भूमिका दुय्यम असूनही त्यांनी केली. आणि शेवट बदलणंही कसं गरजेचं आहे हेही सांगितलं. कारण गांधी हत्येनंतरचा अनुभव त्यांना होता. नटाचा दिग्दर्शकावरचा विश्वास असा महत्त्वाचा असतो.

त्यानंतर एकामागोमाग एक नाटक करत राहिलो. 51 हून अधिक नाटकं मी म्हटलं सगळीच गाजलेली नाटकं! .. वा ..! .. तुम्ही काही चित्रपटही केले आहेत ना … कुमारजी म्हणाले हो. एक रात्र मंतरलेली. आहुती, अनुराधा, बजरंगाची कमाल, जोडीदार, तुझ्याचसाठी, जिगर, अनुराधा असे अनेक. शिवाय काही मालिकाही केल्या आहेत. मी म्हटलं या तिन्ही माध्यमातील कुठलं आवडीचं वाटतं? कुमारजी म्हणाले अर्थात नाटक..ती एक जीवंत कला आहे. रसिकांचा प्रतिसाद लगेच कळतो आणि अगदी 500व्या प्रयोगामध्येही आपण त्यात बदल करू शकतो. नाटकात लेखन महत्त्वाचं असतं. कारण मालिका, चित्रपटांसारखं त्याला सजवायला दुसरं काही नसतं. मालिका आपण येऊन जाऊन बघतो. नाटकात प्रेक्षकांचं संपूर्ण लक्ष असतं. त्यामुळे जे सादर होत आहे ते अर्थपूर्ण आणि मनोरंजक असणं गरजेचं असतं.

नाटक बसवणं अधिक जिकिरीचं आहे. नेपथ्य, प्रकाशयोजना करताना काही मर्यादा पडतात. आवाज आणि अभिनय अगदी शेवटच्या रांगेमधल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. कारण नाटकामध्ये क्लोज अप नसतो. तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत देहबोली आणि आंगिक अभिनयातून पोहोचायला हव्यात. बोलणारी व्यक्ती रंगमंचाच्या कुठल्या बाजूला असावी.. सगळ्या बाजूनं बसलेल्या प्रेक्षकांचं लक्ष वेधलं जाईल आणि सगळ्यांपर्यंत तिची कृती पोहोचेल हे बघावं लागतं.

मी म्हटलं पूर्वीची नाटकं आणि आजची नाटकं यांच्या सादरीकरणामध्येही फरक पडला आहे नाही? त्यावर कुमारजी म्हणाले, हो पूर्वीच्या नाटकांमध्ये खूप स्वगतं असायची. स्पेस कमी असायची. आज जास्तीत जास्त व्हिज्युअल्सचा वापर केला जातो आहे. नेपथ्य, प्रकाशयोजना.. रंगमंचाची आखणी आणि रंगमंचाचा वापर याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. ज्याला आपण कॉम्पोजिशन म्हणतो.

नाटकाच्या एका एका दृश्याचा बारकाईने विचार केला जातो. संगीताचं महत्त्वही वाढलं आहे. हे सगळं पूर्वीसुद्धा होतं, पण त्याला आता एक आधुनिक दृष्टिकोन मिळाला आहे. मीसुद्धा जाणीवपूर्वक काही प्रयोग केले आहेत नाटक करताना. जे यशस्वीही झाले. मी म्हटलं, या प्रवासात पत्नीची साथ कशी मिळाली. कुमारजी म्हणाले, माझी बायको म्हणजे तेव्हाची उज्वला टकले माझ्या नाटकाच्या ग्रुपमधलीच असल्याने तिला या क्षेत्राचे टक्केटोणपे माहीत होते. आजवर तिने माझ्या
या प्रवासात खूप महत्त्वाची साथ दिली आहे .

मी म्हटलं खरंच, आपली नाट्य परंपरा अतिशय समृद्ध आहे आणि रसिकांना सगळीच उत्तम नाटकं बघणं, इच्छा असूनही बघता येत नाहीत. हल्ली नाटकांचं डॉक्युमेंटेशन केलं जातं आहे. त्याच्या बद्दल काय मत आहे? कुमारजी म्हणाले खूप चांगला उपक्रम आहे. कारण मोठमोठे कलाकार त्यात काम करताहेत.

उद्या कदाचित त्यांचं नाटक, त्यांचा अभिनय लोकांना बघता येणार नाही. तो यानिमित्ताने बघता येईल. तरीपण एक रंगकर्मी म्हणून मला वाटतं की नाटकाचा जिवंतपणा त्यात नसणार.. ती गम्मतच न्यारी! ..तेव्हा अधिकाधिक नाटकं प्रत्यक्षात बघून घ्यावी. मी म्हटलं नवीन मुलांनी दिग्दर्शन क्षेत्रात येण्यासाठी काय तयारी करावी? कुमारजी म्हणाले, त्या तंत्राचं शिक्षण घेणं गरजेचं आहे. तुम्ही नीट स्वतःला तयार करून या आणि सुरुवातच अशी दणक्यात करा की मागे वळून बघायची वेळच यायला नको. लेखकाशी चर्चा करून त्याने कागदावर उतरवलेले शब्द प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतील अशी तयारी करावी लागेल .

मी दिग्दर्शन या विषयावर ‘चौकट दिग्दर्शनाची’ हे एक मोठं पुस्तक लिहिलं आहे. त्यांनी मला ते पुस्तक भेट दिलं. मी ते बघितलं. इतकी मोलाची माहिती त्यात आहे की या क्षेत्रात येऊ बघणाऱया सगळ्यांनीच आवर्जून हे पुस्तक वाचायला हवं. कुमारजी म्हणाले, याची दुसरी नवीन आवृत्तीपण येणार आहे. कुमारजींनी आजवर नाटक, चित्रपट, मालिका धरून शंभर कलाकृती दिग्दर्शित केल्या आहेत. आणि पुढेही आपला दिग्दर्शन करत राहण्याचा मानस असल्याचं ते म्हणाले. कुमारजींचा उत्साह बघता मला या विषयी काही शंका नाही. कुमारजांना भेटल्यावर आजच्या पिढीने त्यांच्यासारख्या अनुभवी, गुणी दिग्दर्शकाकडून अनेक गोष्टी शिकून घ्यायला हव्यात, असं आवर्जून वाटलं.