
>> स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली
‘अविर्वभुव तत्पश्चन्मुखताः परमात्मनः’ म्हणजे ज्याची उत्पत्ती थेट देवाच्या मुखातून निर्माण झालेली आहे असे सरस्वतीचे रूप. माझ्या लहानपणापासून जो स्वर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कधी कधी स्वप्नातसुद्धा जो सतत माझ्यासोबत आहे तो म्हणजे सा, रे, ग, म, प, ध, नी अर्थात ल, ता, मं, गे, श, क, र. आमचे कुलदैवत हे मंगेश असल्याने (म मध्यमातला, ग गंधारातला आणि श षड्जातला) संगीताची उपासना ही आलीच. ही उपासना करत असताना मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, माझा त्या सुवर्णयुगात जन्म झाला, ज्या युगात ‘भारतरत्न’ लतादीदींना मी प्रत्यक्ष पाहू शकलो, स्पर्श करू शकलो, शिकू शकलो आणि अनुभवू शकलो. गानसम्राज्ञी लतादीदी जरी शरीररूपाने नसल्या तरी त्यांची सांगीतिक ठेव आणि त्यांचे स्वरचैतन्य मला प्रत्येकवेळी नवीन सांगीतिक आव्हाने किंवा डोंगर यशस्वीपणे पार करण्याचे बळ देत राहील असे मी समजतो. अति परिचयाने सुद्धा ज्याची कधीच अवज्ञा झाली नाही ते म्हणजेच लतादीदींचे स्वर. ब्रह्मांडाच्या रचयितेच्या मुखातून झालेल्या उत्पत्तीचे स्वरूप म्हणजेच सरस्वती. माघ महिना, उत्तरायण, सरस्वती पूजेचे पर्व,
रविवारचा सूर्योदय अशा मुहूर्तावर अनंतात विलीन होणे म्हणजेच मोक्ष मार्गावर प्रयाण करण्यासारखेच! आदल्या दिवशी वसंत पंचमी, दुसऱया दिवशी रथसप्तमी आणि नंतर भीष्माष्टमी हा सर्व निसर्गाने जुळवून आणलेला योगच म्हणावा लागेल. कारण होतं एका ‘गंधर्वकन्येची घरवापसी’ किंवा मी तर म्हणेन ‘भूतलावरच्या सरस्वतीचे महानिर्वाण’. मला असे वाटते कधीकधी की, देवसुद्धा थोडा दुःखी होऊन अश्रू ढाळत असेल, कारण त्यालासुद्धा आता त्याची स्तुती ऐकण्यासाठी हा आवाज मिळणार नाही. दीदींचा स्वर हा चिरंजीवी असल्यामुळे आणि तो निसर्गात चिरकाल राहणार असल्यामुळे मला असे वाटते की, त्या स्वरलतेशी जेव्हा तुम्ही अद्वैत साधाल तेव्हा प्रत्येकवेळी लतादीदी तुमच्यासमोर येऊन उभ्या राहतील.
एका माणसाला लागलेली सवय जेव्हा एका समाजाला लागते तेव्हा परंपरा निर्माण होते, पण जेव्हा त्याच समाजाची सवय जेव्हा राष्ट्राला लागते तेव्हा संस्कृती निर्माण होते. अशा स्वरलतेची संस्कृती आपल्या हिंदुस्थानला लाभणे ही आपल्या राष्ट्राची पुण्याई आहे असे मी समजतो. ही जी लतादीदींच्या आवाजाची सवय लागणे ज्याला आपण addict होणे म्हणतो. ते त्यातल्या दैवी गुणांमुळे आहेच, पण त्याबरोबर लतादीदींनी घेतलेली मेहनत आणि डोळस रियाजाची वृत्ती पण त्याला कारणीभूत आहे. स्वरांचा सच्चेपणा, श्रुती टिपण्याचे सांगीतिक नैपुण्य, प्रासादिक ‘आ’कार आणि सुरेल कंठ याबरोबरच आपल्या सांगीतिक नजरेची झेप ही किती लांब स्वरांचे क्षितिज आपल्यात भरून घेऊ शकते याची आस आणि क्षमता हीच खरी लतादीदींची सांगीतिक प्राप्ती. परमेश्वराने दीदींच्या गळय़ात नैसर्गिकच equiliser लावून पाठवलंय हे दीदींना ध्वनिमुद्रित करताना कुणालाही जाणवेल. दीदींच्या गळय़ाची खासियत अशी की, मंद्रात गाताना जो आवाजाचा गेज असतो तोच तुम्हाला मध्य आणि तार सप्तकात जाणवतो, कारण त्यांच्या आवाजाच्या प्रोजेक्शनमध्ये काहीच अडथळा येत नसतो.
माझे सौभाग्य मी मानतो की, त्याच निसर्गाने माझ्या झोळीत मास्टर दीनानाथांची गायकी आणून टाकली आणि त्याच गायकीने माझ्यात आणि लतादीदींमध्ये अतीव स्नेहसंबंध जुळवले. 22 डिसेंबर 2002 रोजी माझी पहिली भेट सायंकाळी 7.30 वाजता लतादीदींशी झाली. तेव्हा मी इयत्ता आठवीत होतो आणि घरी न सांगता त्यांना भेटण्याच्या आसेत मी थेट प्रभूकुंजला पोहोचलो होतो. तेव्हा काहीही अडचणीविना मी आलोय हे कळल्यावर त्यांनी मला वर बोलावून घेतले आणि पहिल्यांदा माझे गाणे ऐकले. ही माझी पहिली भेट आणि तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांचे स्नेह आणि आशीर्वाद कायम मिळत राहिले. त्यांच्यासोबतचे अनुभव, किस्से खूप आहेत, पण सगळे उद्धृत करणे अशक्य असल्यामुळे दोन नेमके प्रसंग आणि अनुभव मी इथे सांगू इच्छितो, जे मला महत्त्वाचे वाटतात.
मी नववी- दहावीत असताना असे झाले की, माझा आवाज फुटत होता. म्हणजेच कंठ फुटून आवाज जरा पुरुषी होत होता. तेव्हा मला इतक्या उंच पट्टीत गाणं शक्य होत नसून माझा स्वर हा खूप खाली उतरायला लागला होता. एक वेळ अशी आली की, मी पुढे गाऊ शकेन की नाही अशी शंका निर्माण झाली. तेव्हा लतादीदींशी हा विषय बोलल्यावर मला त्यांनी जमेल तसं गात राहा, गाणं थांबवू नकोस, असे म्हणत कंठ फुटत असताना काय पद्धतीने ‘आ’काराचा रियाज, व्यंजनांचा अभ्यास आणि स्वरयंत्राला वळण देण्याची एक विशिष्ट पद्धत सांगितली, जेणेकरून माझा मंद्र, मध्य आणि तार असे तिन्ही सप्तक साफ होऊन आवाज पुन्हा रुळावर येऊ लागला. नंतर आणखीन माध्यम स्पष्टतेकडे वळण्याची प्रेरणा मला त्या सतत देत राहिल्या आणि स्वरांना त्यांच्या अचूक श्रुतींसोबत प्रकट करून गायकी सादर करण्याचा ध्यास त्यांनीच माझ्या मनात पेरला असं म्हणायला हरकत नाही.
2010 साली 11 ऑक्टोबरच्या सोमवारी सायंकाळी 7 वाजता मला उषाताईंकडून निरोप आला की, ललिता पंचमीची पूजा असून तुला प्रभूकुंजमध्ये घरी यायचे आहे. त्याप्रमाणे संध्याकाळी मी घरी पोहोचलो आणि देवीला नमस्कार करून प्रसाद घेऊन सर्वांशी गप्पा मारून निघालो. त्यावेळी लतादीदींनी मला थांबवून त्यांच्या लेटरहेडवर एक लेखी शुभसंदेश दिला. ज्यामध्ये असे लिहिले होते की, ‘‘आपण आमच्या वडिलांच्या म्हणजेच मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या गायकीवर आदरपूर्वक प्रेम करून ती गायकी समर्थपणे जगासमोर मांडली म्हणून आम्ही समस्त मंगेशकर कुटुंबीय आपले अत्यंत आभारी आहोत. मास्टर दीनानाथांवरच्या तुमच्या पुढच्या उपक्रमांना आमच्या अनेक शुभेच्छा.’’ ही एक आशीर्वादरूपी दाद होती असे मी समजतो कारण त्यावर पाचही मंगेशकर भावंडांच्या स्वाक्षऱया होत्या. मास्टर दीनानाथांचे गाणे किंवा इतर कुठलाही गायन प्रकार गात असताना स्वरलगावामधील अंतरे अचूक ओळखून तसेच मनात आलेले स्वरलगाव गळय़ातून भावनाप्रधान पद्धतीने प्रकट करणे हा एक दैवयोगच म्हणावा लागेल. हा दैवयोग थोडय़ाफार प्रमाणात मला सुकर होऊ लागला तो फक्त समोर ठेवून ऐकलेल्या लतादीदींच्या स्वरलगावामुळेच!
माझ्या लग्नाचे आमंत्रण मी द्यायला गेलो असताना आमंत्रण देऊन झाल्यावर ब्ल्यूटूथ स्पीकरवर मी गायलेला राग मालकंस आणि राग तिलक कामोदचा विस्तार मी आणि दीदींनी बसून एकत्र ऐकला. तेव्हा अष्टांग गायकीपैकी मींड, गमक, घसीट अधिक परिणामकारकरीत्या कशापद्धतीने वापरता येईल हे लतादीदींनी सांगितल्यामुळे माझी सांगीतिक नजर अधिक व्यापक होत गेली यात शंकाच नाही. तेव्हा त्यांनी इतर पण मी गायलेल्या त्यांच्या बाबांच्या बंदिशी ऐकून मींड घेत असताना मधल्या स्वरांचे दर्शन कसे करवता येईल आणि त्या स्वरांचे संवादशास्त्र कसे उमजेल याबद्दल मला त्यांनी मार्गदर्शन केले. अशा अनेक सांगीतिक व्युत्पत्त्या मला लतादीदींकडून मिळत गेल्या.
कलाकाराने सतत विद्यार्थीदशेत राहणे हे सर्वोतोपरी त्याच्याचसाठी भल्याचे आणि जिथे जी विद्या मिळेल ती आपला इगो बाजूला ठेवून ती ग्रहण करत राहणे हे त्याचे आद्यकर्तव्य. ही विद्यार्थीदशा अंगी असलेला मोठेपणा बाजूला ठेवून कशापद्धतीने चोख पाळावी हे सुद्धा लतादीदींना बघूनच मला समजले. उत्तम संगितासोबत एक विशिष्ट वृत्ती कलाकाराने जोपासावी, जेणेकरून त्याच्या कलेला योग्य तो मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होते आणि कलेचे कलेवर कधीही होत नाही. ती वृत्ती मला लतादीदींकडे बघून शिकायला मिळाली आणि स्वरांवर अतोनात प्रेम करून त्यांच्याशी प्रामाणिक कसे राहता येईल याचा मार्गही मिळाला. एक असाही प्रसंग घडला होता की, मी गायलेले मास्टर दीनानाथांचे ‘दिव्य स्वातंत्र्य रवी’, ‘भालीचंद्र असे धरिला’ आणि ‘शांत दांत कालिका ही’ ही नाटय़गीते मी आणि लतादीदी त्यांच्या हॉलमध्ये बसून स्पीकरवर ऐकत असताना गाणं संपल्यावर मला त्या म्हणाल्या की, ‘स्टेजवर बसल्यावर गाणं सुचणं आणि ते गळय़ात हुबेहूब उमटणं हे निस्सीम कृपा असल्याशिवाय शक्य होत नाही. म्हणून तू गाताना बाबा मागे उभे आहेत असा भास होतो.’ ही दाद मला उषाताई आणि लतादीदी यांच्याकडून जी मिळाली ती मला सर्व पुरस्कारांपेक्षाही मोठी वाटते.
पंचत्वात विलीन झालेल्या लतादीदी या नेहमीच जिथे असतील तिथून सर्वांवर प्रेमाशीर्वादाची उधळण करतच राहतील आणि माझ्यासारख्या अनेक कलाकारांना, पिढय़ांना उत्तुंग सांगीतिक उंची पार करण्याची प्रेरणा देत राहतील. म्हणून मला म्हणावेसे वाटते की, ‘ तुझ्या सोडून जाण्याची आता चिंता मला नाही, तुझा आभास सोनेरी मला सांभाळतो आहे.’




























































