आपला माणूस – मंदिर कोषांचा भगीरथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सचिन दीक्षित

मंदिर कोषकर्ते मोरेश्वर कुंटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा श्रद्धांजली लेख.

महाराष्ट्रात विपुल मंदिर संपदा आहे असे आपण म्हणतो ती नेमकी किती आणि तिची वैशिष्टय़े काय आहेत याचे उत्तर द्यायचा प्रयत्न संशोधकांनी वेळोवेळी केलेला आहे. इंग्रजी आमदनीत बर्जीस (burgees ), कॉसेंस (cousens) आदींनी हा प्रयत्न केला. स्वातंत्र्योत्तर काळात असाच अभ्यास देगलूरकर, जामखेडकर आदींनी केला. पुरातत्वीय अंगाने केलेली ही सर्वेक्षणे आणि त्याअनुषंगाने घडलेली ग्रंथनिर्मिती महत्त्वाची आहे.

मंदिर एके मंदिर, त्यात प्राचीन-नवीन असा भेद न करता महाराष्ट्रातील सर्व मंदिरांचा कोष तयार करण्याचे मोलाचे योगदान स्वर्गीय मोरेश्वर कुंटे यांनी केले. त्याचं या सर्वसमावेशक यादीला मराठी जगातील कोष वाङ्मयात मनाचे स्थान मिळावे.

कुंटे ह्यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1939 ला कऱहाड येथे झाला. विविध व्यवसाय करत त्यांनी मंदिर या विषयातील आपली आवड जोपासलेली होतीच. 1991 पर्यंत त्यांची, पुणे परिसरातील 600 च्या वर मंदिरे त्यांची बघून झालेली होती. आपल्या या आवडीला बांधीव आणि विस्तृत स्वरूप देण्याच्या मानसाने त्यांनी त्याच वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली. येथून पुढील 18 वर्षे कुंटे दंपतींनी महाराष्ट्र पिंजून काढला. बजाज कंपनींची एम-80 गाडी घेऊन त्यांनी जवळपास सवा लाख किलोमीटरचा प्रवास केला. तेव्हाच्या महाराष्ट्रातील 30 जिल्हे फिरून जवळपास 18 हजार मंदिरे आणि त्यासंबंधित 25 हजारांच्या वर छायाचित्रे त्यांनी घेतली. रत्नागिरीपासून सुरू झालेला हा प्रवास 2007 साली पुणे जिल्हा बघून झाल्यावर थांबला. अगदी गडचिरोली, संग्रामपूर असे दुर्गम भागसुद्धा त्यांनी बघितला. महाराष्ट्रातील गाव अन् गाव फिरून केलेल्या त्यांच्या कार्याची दखल लिमका बुक ऑफ रेकॉर्डने दोनदा घेतली होती.

दसरा ते मार्च महिने मंदिर बघणे, फिरणे आणि बाकीच्या सहा महिन्यात जमा झालेल्या माहितीचे विश्लेषण, वर्गीकरण ते करीत. पतीपत्नी दोघे मंदिर अभ्यासायला आपल्या गावात आलेत म्हणून लोकांनी राहणे, खाणे, आहेर यासोबत पेट्रोल, कॅमेरा रोल असे आर्थिक सहाय्य केल्याच्या हृद्य आठवणी ते सांगत. या सर्व प्रवासात त्यांची गाडी कधीच बंद पडली नाही हे विशेष.

काळाची गरज म्हणून त्या वयात कॉम्प्युटर आणि पब्लिशिंगसाठी लागणारे सॉफ्टवेअर शिकून त्यांनी या माहितीचे पद्धतशीर लिखाण करून ठेवले.

सुरुवातीला त्याच्या सफरीवर आधारित प्रदर्शने ते भरवीत. त्याला लोकांचा प्रतिसाद मिळत असताना या माहितीचे पुस्तक रूपात जतन करावे अशा सूचना मिळाल्यात. त्या अनुषंगाने मंदिराचा इतिहास, शिलालेख, तेथील मूर्ती, स्थानिक धर्म समजुती, लोकप्रथा अशा अनेक अंगाने त्यांना आपले अभ्यास क्षेत्र विस्तारावे लागले. माहिती ते संशोधित पुस्तक या प्रवासात त्यांना अनेकांचे मार्गदर्शन मिळाले. गोनीदा, बाबासाहेब पुरंदरे, गो. बं. देगलूरकर, प्रा. के. घाणेकर आणि शंतनुराव किर्लोस्कर ही काही नावे ते नमूद करीत. त्यांचे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले ते सांगली जिह्यावर. त्यासाठी खडीवाले वैद्यची पुढाकार घेतला होता. त्यानंतर जिल्हावार मंदिर कोष या स्वरूपात, लोकसहाय्याने त्यांनी 18 जिल्हय़ांवर पुस्तके प्रकाशित केली. उर्वरित 12 जिह्याबद्दलची माहिती टाइप करून तयार असली तरी त्यांच्या प्रकाशनाचा योग अजून आला नाही. राज्य गॅझेटियरला समकक्ष असे हे त्यांचे कार्य आहे. जिल्हानिहाय कोषाव्यतिरिक्त इतर पुस्तके धरून एकूण 40 पुस्तके कुंटेंनी सिद्धहस्त केली.

त्यांच्या हा कार्यासाठी माध्यमं, राजकारणी आणि जनता सर्व दिशातून त्यांच्यावर काwतुकाचा वर्षाव होत राहिला आहे. नितीन गडकरी किंवा सातारा गादी येथील देवघरं त्यांना आवर्जून दाखवली गेली, असा हा मान! 1997 च्या पुरात त्यांचे राहते घर पाण्याखाली गेले. सातारा जिह्याचा सगळा कोष ऐवज बुडाला असला तरी मंदिर कोषांची त्यांची वही सलामत राहिली होती. इतकेच नाही तर एकदा मंदिर बघताना काका-काकूंवर माधमाशाचा हल्ला झाला तेव्हा बाजूला पेटलेल्या चितेच्या आगीमुळे त्यांचे रक्षण झाले. अगदी मृत व्यक्तीने सुद्धा कोशासाठी माझी मदत केली, असे ते कृतार्थाने नमूद करीत.

मंदिर कोशांचा त्यांचा हा प्रयत्न भगीरथ म्हणावा असाच आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती आणि शिल्लक पुस्तकांना प्रकाशक मिळो ही आपली सदिच्छा

(लेखक भारतविद्या पारंगत (MA Indology) असून इतिहास-वारसा या विषयवर लेखन, संशोधन करतात. )