चतुरस्र लेखन- लीला शहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रज्ञा कुलकर्णी

आपले अभिजात मराठी साहित्यविश्व असंख्य स्त्रियांनी आपल्या दर्जेदार लेखनाने आणि अजोड साहित्यकृतींनी समृद्ध केले आहे. गेल्या 50-60 वर्षांचा मराठी वाङ्मयाचा इतिहास पाहिला असता, त्यात स्त्रियांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे दिसून येते. अनेक स्त्रियांनी आपल्या प्रभावी लेखनाचा ठसा उमटवून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे आणि अनेक मानाचे पुरस्कारही मिळवले आहेत. मग ते लेखन निर्भीड, बंडखोर असो की, शांत, संयत, सात्त्विक असो. अशा प्रथितयश लेखिकांच्या मांदियाळीत लेखिका लीला शहा यांचे नाव आदराने आणि अभिमानाने घ्यावे असेच आहे. लीला शहा यांचा गेल्या 50-60 वर्षांतील एकूण लेखन प्रवास हा थक्क करणारा असाच आहे.

लीला शहा यांचा जन्म 10 मे 1935 रोजी तुळजापुरात जैन कुटुंबात झाला. घरात लेखन, वाचन, संगीत, चित्रकला यांची सर्वांनाच आवड. लीलाताईंच्या मातोश्री या जैन समाजातील पहिल्या कीर्तनकार होत्या. लीलाताईंच्या बहिणी, भाऊ यांनादेखील वाचन, लेखनाची अतिशय आवड. घरात साहित्य, संगीत यावर सतत चर्चा सुरू असे. अभ्यासाबरोबर मराठी, हिंदी, इंग्रजी साहित्याचे अवांतर वाचनही प्रचंड. या साऱया समृद्ध संस्कारातून लीलाताईंचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. 1952 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी लीलाताईंची पहिली कविता वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर कथा, कादंबऱया, कविता, ललित लेख, मुलांसाठी गोष्टी, गाणी असे लेखन अविरतपणे सुरू झाले ते आजतागायत वयाच्या 84 व्या वर्षांपर्यंत अखंड सुरूच आहे. आज त्यांच्या पुस्तकांची संख्या 67 झाली आहे आणि काही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. यामध्ये कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबऱ्या, चरित्रे, रेसिपीज अशा विविध विषयांवरच्या लहानमोठय़ा पुस्तकांचा समावेश आहे. लीलाताईंनी साहित्यातले सर्व प्रकार आपल्या समर्थ लेखणीने उत्तमरीत्या हाताळले आहेत. अनेक नामवंत प्रकाशनांतर्फे प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या पुस्तकांना असंख्य पुरस्कारही लाभले आहेत. ‘माहेर’, ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’, ‘मानिनी’, ‘अनुष्टुभ’, ‘सुगंध’, ‘तरुण भारत’, ‘लोकसत्ता’, ‘मार्मिक’, ‘सामना’ अशी दर्जेदार मासिके आणि वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कथा, कादंबऱया, कविता, ललित लेखांना बक्षिसे मिळाली आहेत. पर्यावरण, अंधश्रद्धा अशा विषयांवर सदर लेखन केले. लीलाताईंच्या एका कवितासंग्रहास द. भा. धामणस्कर पुरस्कार तर ‘ढगांच्या देशात दीपू’ या पुस्तकाला ताराबाई मोडक बालसाहित्य पुरस्कार मिळाला आहे. अल्बर्ट श्वाईटझर, डॉ. राजेंद्र सिंह आणि ‘कविता पर्यावरणाच्या’ या पुस्तकांना उत्कृष्ट वाङ्मयाचे महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. डोंबिवलीस्थित लीलाताईंना आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार, डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा आदर्श महिला (साहित्यिक) पुरस्कार, को.म.सा.प.चा साहित्य सेवा पुरस्कार, असे इतर असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. लीलाताईंना सर्वांत मोठा बहुमान लाभला तो म्हणजे 2017 मध्ये जयसिंगपूर येथे भरलेल्या अ.भा. मराठी जैन साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

लेखनाबरोबरच लीलाताई कथाकथन, कवितावाचन, विविध विषयांवर व्याख्याने असे जाहीर कार्यक्रमही करतात. त्यांना शास्त्रीय संगीताचीही उत्तम जाण आहे. रागदारीवर चाली लावून गीत ज्ञानेश्वर, गीत महावीर, गीत बाहुबली अशा दीर्घ काव्यरचना त्यांनी केल्या आहेत आणि त्या रचना त्या स्वतः गाऊन सादर करतात. लीलाताईंचे लेखन त्यांच्यासारखेच देखणे, शांत, निर्मळ आणि सात्त्विक आणि चतुरस्त्र आहे. त्यांची लेखणी त्यांच्यासारखीच तेजस्वी आहे. 10 मे रोजी त्या पंच्याएंशीव्या वर्षात पदार्पण करीत आहेत, परंतु या वयातही त्यांच्यातला उत्साह, त्यांची धावपळ आणि त्यांच्यातील सृजनशीलता लाजवाब आहे. त्यांचे लेखन अव्याहतपणे सुरू आहे. लीलाताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना संत साहित्याचे गाढे अभ्यासक, लेखक आणि प्रवचनकार वामन देशपांडे म्हणतात, ‘लीलाताई म्हणजे देवघरात शांतपणे तेवणाऱया पवित्र समईसारख्या आहेत. त्यावरूनही लीला शहा यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येतो.

[email protected]