आभाळमाया – या वर्षीचा धूमकेतू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

हा लेख लिहीत असताना आकाश अगदी स्वच्छ, निरभ्र, निळंशार दिसतंय. अवकाळी पावसाचे ढग पांगले असतील. त्यामुळे प्रदूषणही कमी वाटतंय आणि गार वारा सुटलाय. ही स्थिती मुंबईतली. राज्यात इतरत्र तर थंडीचाच मोसम आहे. तसा सूर्य कालच पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून पुन्हा आपल्याकडे (भासमान) निघाला आहे, परंतु तो विषुववृत्त ओलांडायला 21 मार्चपर्यंतचा अवधी आहे. त्यामुळे तोपर्यंत ऋतुचक्राने योग्य साथ दिली, ‘क्लायमेट चेंज’चा फटका बसला नाही तर रात्रीचं आकाश छान दिसेल. हे वर्ष सरता सरता अवकाशात एक सुंदर धूमकेतू दिसतोय. आता तो संध्याकाळी शुक्राच्या जवळ दिसत असेल, पण जेव्हा तो पहाटेच्या आकाशात दिसत होता तेव्हाचे त्याचे फोटो तर असतीलच, पण ज्यांना हे पाहायला मिळालं त्यांना खूप आनंद झाला असेल. कारण 4 डिसेंबरपूर्वी काही खगोलमित्रांनी उत्साहाने दुर्बिणी सरसावल्या, सारी तयारी केली, पण पावसाने त्यावर पाणी ओतलं. असं गेल्या काही वर्षांत अनेकदा घडलंय. त्यातच ‘पॅन्डॅमिक’मुळे दोन वर्षे आकाश निरीक्षणाच्या दृष्टीने ‘वाया’ गेली.

मात्र अवकाशातल्या घडामोडी त्यांच्या नित्यक्रमाने घडतच होत्या, पण आपल्याकडे ते अनुभवण्याची परिस्थिती नव्हती. या वर्षीची अखेर कोविडला निरोप देणारी ठरावी असं वाटत असताना ‘ओमायक्रॉन’ नावाचा स्ट्रेन उपटलाच. हे असं किती काळ चालणार ठाऊक नाही, पण सारी आरोग्य पथ्ये सांभाळून, योग्य काळजी काटेकोरपणे घेऊन हळूहळू जग मोकळेपणा अनुभवण्याचा प्रयत्न करतंय. आकाशदर्शनाला त्याचा फटका बसलाच आहे. त्याचं दुःख आकाशप्रेमींना असणारच. याचं कारण म्हणजे धूमकेतूसारख्या घटना वारंवार घडत नसतात. तसे छोटे-मोठे दूरस्थ धूमकेतू सारखेच येत असतात. आपल्या ग्रहमालेच्या पलीकडे सूर्य ते पृथ्वी या अंतराच्या लाखपट अंतरावर ‘उर्ट क्लाऊड’चं कवच आहे. तिथे लाखो धूमकेतू जन्म घेतात आणि काही वेळा सूर्याकडे झेपावतात. त्याच प्रवासात ते आपल्या ग्रहाच्या जवळ आले की, ‘दर्शन’ देतात. ते अशुभ वगैरे मुळीच नसतात. आमच्या ‘खगोल मंडळा’ची स्थापनाच मुळी हॅली धूमकेतूच्या आगमनाच्या वेळी झाली आणि 1985 पासून आमचं छान चाललंय. वैज्ञानिक जाणीव जुने गैरसमज पुसून टाकते. नवी पिढी त्यातूनच संशोधनाकडे वळते. त्यासाठी समूहाने आकाशदर्शन महत्त्वाचे ठरते. सध्या कोविडग्रस्ततेच्या मर्यादा असल्या तरी लवकरच ‘झाले मोकळे आकाश’ असा अनुभव येईलच.

तर यंदाच्या धूमकेतूचं नाव ‘लिओनार्ड’ असं आहे. ‘लाँग पीरियड’ म्हणजे आपल्यासाठी अनेक वर्षांनी येणारा दीर्घकालीन धूमकेतू आहे. त्याचा शोध माऊंट लेमन वेधशाळेचे जी. जे. लिओनार्ड यांनी 3 जुलैच्या रात्री लावला. 10 ऑक्टोबर 21 पासून त्याच्या गोलाकार मस्तकाबरोबरच त्याची धूसर शेपूटही दिसू लागली. डिसेंबर उजाडेपर्यंत त्याची ‘टेल’ अतिशय सुंदर दिसू लागली. ‘नासा’ने त्याचे फोटो घेतलेच आहेत. पुष्कळ हौशी खगोल निरीक्षकांनीही कॅमेऱयाने त्याचा वेध घेतला.

5 डिसेंबरपासून तो काही ठिकाणी नुसत्या डोळय़ांनीही दिसू लागला. 12 डिसेंबरला हा धूमकेतू पृथ्वीपासून सुमारे 4 कोटी 49 लाख किलोमीटरवर होता. तेव्हा तो संध्याकाळच्या आकाशात दिसत होता. त्याची एक फेरी सुमारे 80 हजार वर्षांची आहे. त्यातला निम्मा काळ म्हणजे गेली 40 हजार वर्षे तो आपल्या सूर्यसंकुलाभोवती घोटाळतोय. त्याचा नेपच्यूनच्या कक्षेत प्रवेश मात्र 2009 मध्ये झाला. त्यानंतर एका तपाने आता तो आपल्याला दिसायला आणखी 12 वर्षे गेली. म्हणजे त्याची ‘लाँग पीरियड’ कक्षा किती असेल पाहा. अशा धूमकेतूंना पॅरॅबोलिक किंवा अन्वस्त म्हणतात.

डिसेंबरात तो पहाटे व संध्याकाळीही छान दिसला हे खरंच, पण अजून त्याचं सौरमालेतलं वास्तव्य संपलेलं नाही. जानेवारी 2022 मध्ये तो 3 ते 22 तारखेपर्यंत सूर्याच्या सर्वात जवळ असेल. मात्र आपल्याला तो पश्चिम क्षितिजावर मावळतीच्या वेळेला कितपत दिसेल याची शंकाच आहे. कारण तो पृथ्वीपासून खूपच दूर जाणार आहे. दुर्बिणीतून या महिनाअखेरपर्यंत पाहता आला तर जरूर बघा.