
>> मनमोहन रो. रोगे
महाराष्ट्राची एक सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख असलेला गणेशोत्सव सध्या अतिशय उत्साहात आणि धुमधडाक्यात सुरू आहे. या वर्षी उत्साह आणि गर्दी जास्त असण्याचे कारण, मागील दोन वर्षे महामारीच्या संकटामुळे या उत्सवावर आणि उत्साहावर निर्बंध आले होते. यंदा या उत्सवावरील सारे निर्बंध उठवल्यामुळे आणि आजाराचे संकट कमी झाल्याने लोक आनंदात आणि उत्साहात आहेत. अर्थात आजाराची भीती कमी झाली असली तरी आजार संपलेला नाही हे लक्षात घ्यायला हवे. उत्सवात प्रचंड गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंग राखणे अशक्य आहेच, परंतु मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केला गेला पाहिजे. मास्कवरील बंदी सरकारने उठवलेली असली तरी गणेशोत्सव मंडळे भक्तांना मास्क बंधनकारक करू शकतात.
शतकाहूनही जास्त काळ अखंड सुरू असलेल्या या उत्सवात सुरुवातीला स्वातंत्र्यासाठी जनजागृती हा उद्देश होता, तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकांना एकत्र जमवून त्यांचे प्रबोधन आणि मनोरंजन करणे सुरू झाले. 25-30 वर्षांपूर्वी प्रबोधन संपून फक्त करमणूक उरली. तर मागील काही वर्षांत करमणुकीपेक्षा फाजील उत्साहामुळे आणि काही चुकीच्या वर्तनामुळे उत्सवातील पावित्र्य, मांगल्य कमी झाल्याचे लक्षात येते. तसेच ध्वनिक्षेपक, बँजो, डीजे इत्यादींच्या आवाजामुळे तान्ही मुले, परीक्षार्थी विद्यार्थी, वयोवृद्ध माणसे, आजारी माणसे यांना त्रास होतो. त्याबाबत कुणालाही वैषम्य वाटत नाही. कारण त्याची जाणीवच नसते. वास्तविक गणेश ही विद्येची, बुद्धीची, कलेची देवता आहे. तसेच तो गणांचाही पती – गणपती आहे. तेव्हा त्याची पूजा करणाऱयांनी, उत्सव करणाऱयांनी या गोष्टीची जाणीव ठेवून त्याच्या गुणांचे पूजन केले पाहिजे, त्याला आवडेल असे वर्तन केले पाहिजे. आपण गणपतीचे गण बनण्याचा प्रयत्न करायला हवा. त्याउलट समाजातील वरील घटकांना त्रास देण्याचे काम अजाणतेपणे का होईना, झाले तर ते त्याला आवडेल का, याचा विचार झाला पाहिजे. अशा कृत्यांमुळे उत्सवातील मांगल्य, पावित्र्य कमी होतेच, पण हिंदू धर्म, देव-देवता, सण-उत्सव, प्रथा-परंपरांवर टीका करण्याची, निंदा करण्याची संधी इतरांना मिळते. मागील काही वर्षांत अशांचे प्रमाण कमालीचे वाढलेले आहे. खरे तर जगाच्या सुखासाठी प्रार्थना करणारा, जे जे उपकारकर्ते मग तो दगड असो, वृक्ष असो, प्राणी-पक्षी असो वा माणूस, त्याची कृतज्ञतापूर्वक पूजा करणारा हा धर्म. पण सण-उत्सवांचे, प्रथा-परंपरांचे वैज्ञानिक महत्त्व हिंदूंनीच न जाणल्याने आज इतरांबरोबर काही हिंदूंकडूनही लक्ष्य केला जातो आणि दुर्दैवाने हजारो-लाखो माणसे एकत्र जमवून, लाखो – करोडो रुपये खर्च करून उत्सवांचे ‘इव्हेंट’ करणारे या अपप्रचाराला समर्पक उत्तर देऊ शकत नाहीत, मग इतके मोठे उत्सव करून त्याचा उपयोग काय? जे व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्याच्या नावाखाली आणि प्रसिद्धी माध्यमांचा मुक्तपणे वापर करायला मिळालेल्या हक्कांमुळे आज देश-धर्मावर कुणीही उघडपणे वाटेल ते बोलू लागलेत. हिंदू धर्माला पंचवीस सहस्र वर्षांचा उज्ज्वल इतिहास असताना काही चुकीच्या सुरू झालेल्या प्रथांमुळे काही लोक देवधर्मावर टीका करतात, निंदा-नालस्ती करतात. त्यासाठी तशा चुकीच्या प्रथा बंद करून टीकाकारांच्या प्रश्नांना – शंकाकुशंकांना योग्य ती उत्तरे देता आली पाहिजेत. देवधर्माची विटंबना करणाऱयांना कायदेशीर शिक्षा मिळावी यासाठी लढा देण्यास आपले ऐक्य असायला हवे. गणेशोत्सवात लाखो तरुण तन, मन, धन खर्च करून सेवा करतात. दहा-पंधरा दिवसांच्या उत्सवात लाखो रुपये खर्च केले जातात. आज कितीतरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे वर्षभर सामाजिक हिताची कामे करतात ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब होय. पण त्याचबरोबर त्यातील काही पैसा आणि श्रम या राष्ट्र, धर्मरक्षणासाठी खर्च व्हायला हवेत. तेव्हा स्वातंत्र्यप्राप्ती हे उद्दिष्ट होते तर आज राष्ट्र, धर्म संरक्षण-संवर्धन आणि जनसेवा हे उद्दिष्ट असायला हवे.
























































