आम्ही सतत कार्यमग्न!

निवृत्तीनंतर पुढे काय…? खरे पाहता हा प्रश्न आजच्या सतत कार्यमग्न आजी-आजोबांसाठी नाहीच मुळी. निवृत्तीनंतरही आपापल्या किंवा आपल्या आवडीच्या कार्यक्षेत्रात व्यग्र राहणं ही आज काळाची गरज आहे. आर्थिक निकड, कामाची आवड आणि शरीरात असलेला उत्साह… अशा अनेक गोष्टी या कार्यमग्नतेमागे आहेत… आणि अर्थातच त्या असायला हव्यात…  

आता वेळ फक्त सामाजिक कामासाठी

>> स्वाती पंडीत, अंधेरी

मी एलआयसी ऑफिसमध्ये नोकरीला होते. तेथून निवृत्त झाल्यावर दोन वर्षे घरीच होते. दोन वर्षे कुटुंबासाठी दिली आणि नंतर मग समाजासाठी काहीतरी करावे असे सतत वाटायचे आणि त्यातूनच ‘हेल्प एज’ ही ज्येष्ठांसाठी काम करणार्‍या संस्थेची माहिती मिळाली. माझ्यासारख्या लोकांची मदत करायला मलाही आवडेल. कारण ज्येष्ठांनाच ज्येष्ठांच्या समस्या कळतात. त्यामुळे माझा वेळ सामाजिक कार्यासाठी द्यावा असा विचार केला आणि ‘हेल्प एज’ या संस्थेत रुजू झाले. दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मी येथे काम करते. ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणं अशी काम तिथे करते. त्यासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे घेत नाही. आयुष्यात पैसे कमविले आता समाजासाठी वेळ खर्च करत असल्याचा आनंद मिळतोय. सकाळी मॉर्निंग वॉकला जाते. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पौष्टिक खाते. सोसायटीत कोणाला गरज असेल तर त्यांना मदत करते. वाचनाची आवड असली तरी आता डोळ्यांना त्रास होत असल्यामुळे हल्ली पूर्वीसारखे वाचन होत नाही.

 

अखेरच्या श्वासापर्यंत काम करीन

>>विष्णू पटवर्धन, बोरिवली

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या कंपनीत नोकरी करत होतो. आज मला निवृत्त होऊन सोळा वर्षे झाली. नोकरी करीत असतानाच ‘अस्मिता संस्था’ स्थापन केली होती. त्या संस्थेअंतर्गत राम गोपाल केडिया प्राथमिक विद्यालय आणि जमनाधर अग्रवाल माध्यमिक विद्यालय ही शाळा सुरू केली. नोकरी सांभाळून संस्थेसाठी वेळ देत होतो. निवृत्त झाल्यावर पूर्णवेळ संस्थेला द्यायचा असे मी आधीपासूनच ठरवले होते. त्यामुळे निवृत्त झालो आणि खर्‍या अर्थाने मी पूर्णवेळ संस्थेला देऊ लागलो. सकाळी अकरा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत गेली सोळा वर्षे मी शाळेत असतो. केवळ सामाजिक काम म्हणून इथे येतो. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा मोबदला घेत नाही. पूर्वी जसे काम करत होतो त्या जोमाने नाही, पण माझ्या वयाला झेपेल असे काम करतो. संस्थेसाठी आवश्यक प्रशासकीय कामे, शिक्षकांची सभा घेणं, मुलांसंबंधित काही विषय, यात त्यांना मार्गदर्शन करतो. शाळा चालवतो ती उत्कृष्ट चालायला हवी, त्याला देशात तोड नसावी असे माझे उद्दिष्ट आहे. अखेरच्या श्वासापर्यंत मी या माझ्या संस्थेत येणार, काम करणार आणि भविष्यात अस्मिता उत्कृष्ट विद्यापीठ कसे होईल या दिशेने काम करणार! सध्या मी अस्मिता संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून काम पाहतोय. मी माझ्या आरोग्याची काळजी घेतो. म्हणून आज मी चांगलं काम करू शकतो. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मी सकाळी मॉर्निंग वॉकला जातो, घरच्या घरी नियमित योगासनं करतो आणि महत्त्वाचे म्हणजे वेळेवर जेवतो.

कामामुळे उत्साही राहतो…!

>> श्रीकांत निवाते, जोगेश्वरी 

मी पूर्वी गिरधरलाल ऍण्ड कंपनीत मेडिकल डिस्ट्रिब्युटर म्हणून कामाला होतो. निवृत्त झाल्यावर पुढे काय असा मनात सतत विचार यायचा. निवृत्तीनंतर घरी बसायचे नाही असे ठरवलेच होते. गावी पावसाअभावी शेती करणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्या दिशेने काम करायला लागलो. छोटं मोठ काम करत होतो. आर्थिक गरज होतीच, पण त्याच बरोबर कुठेतरी मन गुंतविणे गरजेचे होते. एका ट्रस्टमध्ये मी कामाला आहे, सकाळी जातो आणि रात्री घरी येतो. नियमित सगळे पेपर वाचतो. कारण आर्थिक गरजेबरोबरच शरीर तंदुरुस्त असणे तेवढेच आवश्यक आहे. त्याची आधी काळजी घेतो. त्यामुळे सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास चालायला जातो. पोळीभाजी, वरणभात असं घरगुती खाणे पसंत करतो. काम करत असल्यामुळे नेहमी चार लोकांच्या नवीन ओळखी होतात, नवीन मित्र होतात, नवीन गोष्टी शिकता येतात आणि मनाने ताजेतवाने वाटते. त्यामुळे आर्थिक गरजेबरोबर कामामुळे उत्साही राहायला होते.

आपली प्रतिक्रिया द्या