
>> चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार
कमावलेल्या उत्पन्नापैकी काही भाग आपल्या कमी व लांब पल्ल्याच्या उद्दिष्टांसाठी बाजूला ठेवता आला पाहिजे. आपण स्वतःच्या जीवनशैलीला मर्यादा घातल्या तर नक्कीच भविष्यात निश्चिंत राहू शकतो.
जरा आठवून पाहा. जेव्हा आई-बाबा पॉकेटमनी द्यायचे, त्यामध्येच आपल्याला भागवायला लागायचं. हौशीमौजीदेखील त्यांच्यावरच अवलंबून असायच्या आणि त्यांनी दिलेल्या सुविधांवर मन मारून आपण राहत होतो. मनात खूप काही असायचे, पण बजेटची मर्यादा दुसऱयावर अवलंबून असल्यामुळे हात आखडता घ्यावा लागायचा. ज्या क्षणी कमवायला सुरू केले त्या क्षणी सर्व गणितं बदलत गेली. आला पैसा स्वतःच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांवर खर्च करायला सुरुवात झाली. खर्च करण्याआधी बचत करा हे समीकरण बाजूला सारून उच्च जीवनशैली उपभोगण्याकडे कल वाढू लागला. हळूहळू कालांतराने ही सवय होऊन गेली व आपण कमवलेल्या उत्पन्नामध्ये काय जीवनशैली स्वीकारली पाहिजे, त्यापेक्षा आपल्या पात्रतेपेक्षा मोठी जीवनशैली उपभोगण्याकडे कल वाढू लागला. त्यामुळे हळूहळू कर्जाच्या चक्रात अनेकांची मानसिक शांतता भंग पावू लागली. सुरुवातीलाच झालेल्या संस्कारामुळे पुढील आर्थिक नियोजनही धोक्यात येऊ लागले.
अगदी 10000/- मासिक पगार असलेली व्यक्ती जेव्हा एक लाखाचा आयफोन कर्जावर घेते तेव्हा ही व्यक्ती आपल्या भविष्यासाठी काय तरतूद करणार? एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी ती गोष्ट आपल्या उत्पन्नाला सूट होणार का हे तपासून पाहणे खूप गरजेचे आहे. आजकालच्या भौतिक जगात आपण स्वतःला शिस्तबद्ध नाही ठेवले तर मात्र कर्जाच्या बोजाखाली आपण दबून जाऊ व आयुष्यभर आपणास काम करावे लागेल.
जीवनशैलीची मर्यादा वाढवायची झाल्यास आपले कौशल्य वाढवून अधिक उत्पन्न अथवा नफा मिळविण्याकडे खरं तर आपला कल असायला हवा. तसे झाले तर काहीच अडचण येणार नाही. आपण जीवनशैलीच्या मर्यादा जर आखून घेतल्या आणि त्याप्रमाणे वागलो तर नक्कीच भविष्यात आपल्या उद्दिष्टांसाठी संपत्ती जमा करू शकतो व निश्चिंत राहू शकतो.
कमावलेल्या उत्पन्नापैकी 30 ते 40 टक्के भाग आपल्या कमी व लांब पल्ल्याच्या उद्दिष्टांसाठी बाजूला ठेवता आला पाहिजे. कर्ज घ्यायचेच झाले तर त्याचा हप्ता 30 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. व आपली जीवनशैली कमवलेल्या उत्पनापेक्षा 30 ते 40 टक्क्यांपेक्षा जास्त न ठेवता आपल्याला जीवनशैलीची मर्यादा घालून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

























































