ठसा – डॉ. मधुकर मेहेंदळे

>> मेधा पालकर

प्राच्यविद्यापंडित डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांचे नुकतेच निधन झाले. ते 102 वर्षांचे होते. संस्कृत भाषा, ऋग्वेद, महाभारत, निरुक्ता, पाली, प्राकृत भाषेतील संशोधन आणि अवेस्ता या पारशी ग्रंथाचे संशोधन अशा विविध विषयांत डॉ. मेहेंदळे यांनी मूलभूत अभ्यास आणि संशोधन केले. वयाची शंभरी ओलांडूनसुद्धा त्यांचा उत्साह आणि नवे समजावून घेण्याची जिद्द अफाट होती. मेहंदळे यांचा जन्म मध्य प्रदेशातील हरसूद गावी 14 फेब्रुवारी 1918 झाला, तर काही शालेय शिक्षण गुजरातमध्ये बडोद्याजवळील वाकड येथे झाले. पदव्युत्तर शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजात झाले. तर पीएचडी पुण्यात डेक्कन कॉलेजात झाली. सहावीपर्यंतचे शिक्षण गुजराती माध्यमातून झाले. शाळेत दुसरी भाषा संस्कृत होती. पुढे संस्कृतबद्दलची त्यांची गोडी वाढत गेली. बीए आणि एमए झाल्यानंतर संशोधनाच्या कामामुळे संस्कृतशी त्यांचा अधिक जवळून परिचय झाला. हिस्टॉरिकल ग्रामर ऑफ इनक्रिप्शनल प्राकृत’ या विषयात त्यांनी पीएच.डी. मिळवली. तसेच उत्कृष्ट निबंधासाठीचे मुंबई विद्यापीठाचे प्रतिष्ठsचे भगवानलाल इंदोजी सुवर्णपदकही त्यांना मिळाले. 1945 मध्ये ‘अशोक इनक्रिप्शन इन इंडिया’ या विषयावरील भाषिक अंगाने अभ्यास किंवा लिंग्विस्टिक स्टडी व त्याची सूची करण्याचे काम त्यांनी केले. प्राकृत भाषेशी संबंधित असलेले हे सर्व काम जर्मनीपर्यंत पोहोचले. प्राकृतमुळेच त्यांनी दोन वर्षे जर्मनीत वास्तव्यही केले! मराठीचा भाषिक अभ्यास, वरुणविषयक विचार, प्राचीन भारत, समाज आणि संस्कृती मराठी पुस्तके; तर इंग्रजीत रिफ्लेक्शन्स ऑफ संस्कृत इन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स, हिस्टॉरिक ग्रामर इन इनक्रिप्शनल प्राकृत आणि वेदा मॅन्युक्रिप्ट्स ही इंग्रजी पुस्तकेही त्यांनी लिहिली. पुढे भांडारकर संस्थेत कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारत आणि डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स यांसारख्या मोठय़ा प्रकल्पांवरही त्यांनी कामे केली. डेक्कन कॉलेजात डॉ. मंगेश कत्रे यांच्या सहकार्यामुळे संस्कृत भाषेतील महत्त्वाकांक्षी शब्दकोश तयार करता आला. संस्कृतमध्ये निर्माण झालेला प्रत्येक शब्द कुठून आला, त्याची व्युत्पत्ती, त्या शब्दामागचा इतिहास शोधणे आणि मग त्याचा नेमका अर्थ कोणता हे शोधून काढणे असे ते प्रचंड काम होते. तसेच शिलालेखांसंबंधीची माहिती किंवा त्यावरील कामही करता आले. ही शिस्त मला पुढच्या संशोधनातून अधिक काटेकोरपणे बाणवता आली, असे मेहेंदळे सांगतात. ते संस्कृत भाषेचे महत्त्व पटवून देताना सांगायचे, संस्कृतसारख्या भाषा या मध्ययुगात निर्माण झालेल्या ग्रीक, लॅटिन, इंग्रजीप्रमाणे इंडो-युरोपीयन भाषिक कुळातील आहेत. संस्कृतपासून पुढे पाली, अर्धमागधी आणि प्राकृत या उपभाषा निर्माण झाल्या आहेत. त्या त्या भाषेला एक स्वतःचा संदर्भ असतो. पाली, अर्धमागधी या भाषाही संस्कृतोद्भव आहेत. जसा काळ जातो तशी भाषांची निर्मिती व त्याचे संदर्भ बदलतात. पाली भाषा ही बौद्ध धर्मासाठी निर्माण झाली, तर अर्धमागधी ही जैन धर्मासाठी. म्हणजे त्या त्या भाषेत तो तो शब्द जातो, तेव्हा त्याचे एक वेगळे महत्त्व निर्माण होते. दुर्दैवाने या गोष्टीचा आता फार कुणी अभ्यासही करत नाही. जुन्या भाषेचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा हे नव्या पिढीने समजावून घेतले पाहिजे.साहित्य अकादमीतर्फे अभिजात आणि मध्ययुगीन साहित्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठsचा भाषा सन्मान डॉ. मेहेंदळे यांना शंभरीत पदार्पण करताना मिळाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या