
>> डॉ. बसवेश्वर चेणगे
सीमा भागातील इदलहोंड येथे मध्यंतरी 17 वे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासह संमेलनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील साहित्यिक व साहित्य रसिकांना त्या गावात येण्यास कर्नाटक सरकारने मज्जाव केला. मराठीचा आवाज दाबण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करण्याच्या कर्नाटक सरकारच्या या दडपशाहीबद्दल सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार व तेथील पोलिसांकडून होणारा अन्याय, मराठी अस्मिता डिवचण्याचा प्रकार अस्वस्थ करणारा आहे. ही बाब मानवी हक्काची पायमल्ली करणारी असून या प्रकारामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मोठा हल्ला झाला आहे. यानिमित्ताने गुंफण साहित्य चळवळीचा मागोवा घेणारा लेख.
सीमा भागात स्थानिक मराठी बांधवांकडून प्रतिवर्षी साहित्य संमेलने भरवली जातात, परंतु सातारा जिल्ह्यातील साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या गुंफण अकादमी या संस्थेकडून गेल्या चार वर्षांपासून सीमा भागातील मराठी भाषिकांच्या सहभागातून साहित्य संमेलने भरवली जात आहेत. सीमा प्रश्न कधी सुटायचा तेव्हा सुटेल, पण गुंफणच्या सद्भावना संमेलनांच्या माध्यमातून माणसांची मने जोडली जावीत आणि सीमावासीयांच्या मनातील दुरावा कमी होण्यास मदत होऊन राष्ट्रीय एकात्मता साधली जावी, दोन्ही राज्यांतील जनतेमध्ये एक सुसंवादाचे नाते निर्माण व्हावे या उद्देशाने गुंफणने या संमेलनांची सुरुवात सीमा भागात केली. जिथे संमेलन होईल त्या ठिकाणी ‘गुंफण ग्रंथालय’ सुरू करून वाचन संस्कृतीला बळ देण्याचे कामही गुंफणने केले आहे.
याआधी मणतुर्गे, जांबोटी व कावळेवाडी या गावामध्ये ही संमेलने आयोजित केली होती व ती सर्व संमेलने संस्मरणीय अशा पद्धतीने यशस्वी झाली आहेत. रविवार, 12 जानेवारी 2020 रोजी 17 वे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन सीमा भागात इदलहोंड (ता. खानापूर, जि. बेळगाव) या गावी आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती, तर गोव्याचे सांस्कृतिक व कला विभागाचे मंत्री गोविंद गावडे हे संमेलनाचे उद्घाटक होते.
अकादमीने आजवर महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यांच्या विविध भागांत गुंफण सद्भावना साहित्य संमेलने भरवली आहेत. ‘जिथे मराठी माणूस, तिथे गुंफण’ हे ब्रीद घेऊन गुंफणने मराठी भाषा, मराठी माणूस, संस्कृती जोडण्याचे काम आजवर केले आहे. समाजात सद्भावना रुजावी हा व्यापक विचार अगदी निःस्वार्थीपणे सीमा भागात घेऊन गेल्यामुळे तेथील मराठी भाषिकांकडून संमेलनांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. या वर्षीच्या संमेलनालाही तसाच प्रतिसाद लाभणार होता. गुंफणचे हे संमेलन यशस्वी करण्यासाठी गुणवंत पाटील, विलास बेळगावकर, माजी आमदार दिगंबर पाटील, तातोबा पाटील यांनी सहकार्य केले होते.
संमेलनाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. संमेलन अवघ्या दोन दिवसांवर आल्यावर कानडी पोलिसांनी ‘हे संमेलन करणार नाही’ असे स्थानिक संयोजकांकडून दबाव टाकून लिहून घेतले. त्यामुळे स्थानिक मराठी माणसांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी अनेक पद्धतीने संमेलनाला परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. अनेक राजकीय मान्यवर नेत्यांनी पोलिसांकडून परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. अखेर रात्री पोलिसांनी तोंडी परवानगी दिली.
दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता कानडी पोलिसांनी संमेलनास उपस्थित राहणाऱ्या सर्व साहित्यिकांना व संयोजकांना फोनकरून ‘‘तुम्ही संमेलनास येऊ नका, नाहीतर तुम्हाला अटक करावी लागेल’’ असा दमच दिला. इदलहोंड गावाकडे जाणाऱ्या फाटय़ावर प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात केला होता. वास्तविक हा भाषेचा उत्सव होता, साहित्यिक – सांस्कृतिक उपक्रम होता. असे असताना समाजात सद्भावना पोहोचविणारा विचार घेऊन गेलेल्या साहित्यिकांना, साहित्य रसिकांना अन्यायकारक पद्धतीने संमेलन आयोजित केलेल्या गावात प्रवेश नाकारण्याचा नतद्रष्ट प्रकार कानडी सरकारने केला.
संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, माझ्यासह ग्रामीण कथाकार बबन पोतदार, गोव्यातील साहित्यिक चित्रा क्षीरसागर, प्रकाश क्षीरसागर, पौर्णिमा केरकर, प्रा. कृष्णाजी कुलकर्णी, डॉ. नीता तोरणे, डॉ. सुनंदा शेळके यांच्यासह अनेकांना अटकेची धमकीच कानडी पोलिसांनी दिली. वातावरण चिघळू नये व शांतता भंग होऊ नये या विचाराने आम्ही सर्वजण परत फिरलो. कर्नाटक सरकारचे वर्तन किती असहिष्णू आहे, दडपशाहीचे आहे हेच या सर्व प्रकारातून लक्षात येते. झालेल्या प्रकाराची सल मनात घेऊन महाराष्ट्रात परत येताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या हद्दीत कागलजवळील एका मंदिरात गुंफणने प्रतीकात्मक संमेलन आयोजित केले. या संमेलनातच 17 व्या गुंफण संमेलनाचे उद्घाटन झाल्याचे संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी जाहीर केले व कडक शब्दांत कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध केला. यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत निदर्शने करण्यात आली.
सीमा भागातील मराठीचा द्वेष करणारे कानडी पोलीस मराठी भाषा व मराठी माणसाच्या वाढत्या वर्चस्वामुळे घाबरते आहे का? हाही प्रश्न सर्वसामान्यांना पडताना दिसतो. खरे तर आपण देशातील कोणत्याही प्रांतात गेलो तर त्या त्या राज्यातील माणसे त्यांची त्या त्या राज्याची भाषा बोलतात, पण आपण सर्व भाषांचा आदर करत असल्यामुळे महाराष्ट्र परराज्यातील व्यक्तींना, त्यांच्या भाषेला सामावून घेतो. याची जाणीव कर्नाटक सरकारने बाळगणे गरजेचे आहे. जर कर्नाटकमध्ये मराठी साहित्यिकांना व साहित्य रसिकांना प्रवेश नसेल तर महाराष्ट्र सरकारने व महाराष्ट्रातील जनतेने किती काळ हे सहन करायचे? सीमा भागातील मराठी बांधव तर म्हणतात, ‘‘आम्हाला कोणतीही सुविधा नको, पण आमचा समावेश महाराष्ट्रात करा.’’ अशा जनतेला दिलासा देणे हे आपले काम आहे. आपण इतरांपेक्षा सहिष्णू आहोत. या सहिष्णू असल्याचा गैरफायदा कर्नाटक घेत आहे. महाराष्ट्र सरकारने तातडीने या सर्व प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. सीमा लढा सहा दशकांहून अधिक काळ सुरू आहे. सीमा भागातील मराठी माणूस तो चिवटपणे लढवतो आहे. त्यातून अद्यापपर्यंत काही मार्ग निघाला नाही, पण केंद्राने हस्तक्षेप करून ज्याप्रमाणे कश्मीर खोऱ्याबाबत निर्णय घेतला, त्याप्रमाणे याबाबतीत निर्णय घ्यावा हीच जनतेची अपेक्षा आहे.
गुंफण संमेलन न होऊ देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कानडी पोलिसांच्या आडमुठय़ा धोरणामुळे कर्नाटक सरकारचा करंटेपणा व मराठी द्वेष पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. सर्व मराठी बांधवांनी व सीमावासीयांनी आपल्या एकजुटीने याचे उत्तर देण्याची गरज आहे. या प्रयत्नात शासनाच्या बरोबरीने राज्यातील सर्व जनतेने कर्नाटक सरकारविरुद्ध आपला लढा व्यापक व तीव्र केला पाहिजे.
(लेखक गुंफण संमेलनाचे आयोजक व गुंफण अकादमीचे अध्यक्ष आहेत.)































































