आगळं वेगळं – हळूहळू हरवणारं माजुली

275

>> मंगल गोगटे

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ‘माजुली’ बेट 880 चौरस किमी एवढं होतं, परंतु तेथील जमिनीची धूप होत गेल्याने 2016 मधे फक्त 352 चौरस किमी राहिलं आहे. (या आकडय़ांबाबत बरेच मतभेद आहेत.) जागतिक तापमान वाढीने पाण्याची पातळी वर येत असल्याने या बेटाचे तुकडे ब्रह्मपुत्रा दरवर्षी गिळंकृत करत असते. पाणी वर येण्याचा वेग दर वर्षी वाढत असल्याने नजिकच्या भविष्यात हे बेट पूर्णपणे पाण्याखाली जाईल यात शंका नाही.

गिनीज बुकमध्ये नदीतलं जगातील सगळ्यात मोठं बेट म्हणून ब्रह्मपुत्रा नदीतील ‘माजुली’चं नाव नोंदलेलं आहे. हे पहिलं बेट ज्याला 2016 मध्ये देशातील जिह्याचा दर्जा मिळाला. माजुली म्हणजे दोन समांतर नद्यांमध्ये असलेली जमीन. ब्रह्मपुत्रा ही आसाममध्ये आणि आसाममधून वाहणारी सगळ्यात मोठी नदी. सियांग (दिहांग), सिकांग (दिबाँग) आणि लोहित या नद्या सदिया इथे एकत्र येऊन ब्रह्मपुत्रा (लुइट) तयार होते. हा भूभाग प्रवाही भूगोलशास्त्राचा विषय आहे.

ही जागा इथल्या चित्तथरारक सूर्योदय व जबरदस्त आकर्षक सूर्यास्त यासाठी प्रसिद्ध आहे. आसामच्या संस्कृतीची चांगली ओळख इथे होते. आपल्या देशातील सगळ्या बेटांत अगदी अपारंपरिक असं हे बेट आहे. इथल्या किनाऱयांवर वाळू नाही तर शेवाळं दिसतात आणि इथे समुद्री अन्नाऐवजी उत्तर-पूर्वी पाककृती चाखायला मिळतात. इथे प्रवास करण्याचे सगळे कष्ट विसरायला होतील अशी ही जागा आहे. फक्त तो खूप आनंददायी होण्यासाठी हा प्रवास ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात करावा. गोहातीहून जोरहाटला जाण्यासाठी विमानप्रवास करता येतो आणि तेथून पुढे माजुलीपर्यंत होडीतून पोचता येतं. आसाममधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या या बेटावर मिसिंग, देवरी आणि सोनोवाल कचरी या जमातीचे लोक राहतात. आसामी, देवरी आणि मिशिंग भाषा इथे बोलल्या जातात. 16 लाख लोकांची घरं असलेल्या या बेटाचा अंतर्भाव लवकरच युनेस्कोच्या यादीत होईल.

आदरणीय आसामी संत श्रीमंत संकरदेवा यांनी इथे नव वैष्णव ही संस्कृती 15 व्या शतकात सुरू केली आणि वेगवेगळ्या सत्रांची (मॉनेस्ट्री) स्थापना केली. ऑनीआती सत्र, अप्सरा आणि तेथील बौध्द साधूंच्या पलनाम नृत्यांसाठी तर दखिनपथ सत्र, रासलीला नृत्यासाठी प्रसिध्द आहे. सत्र हत्यारं, भांडी, दागिने आणि सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या प्राचीन वस्तू जतन करतात. गेली 500 वर्षे माजुली, आसामी संस्कृतीची राजधानी आणि आसामी सभ्यतेचं उगमस्थान आहे. काळाबरोबर माजुली बदललेलं नाही त्यामुळे आसामची खरीखुरी जुनी संस्कृती अगदी तिच्या पारंपरिक धार्मिक पद्धती, कला, साहित्य, नृत्यप्रकार आणि नाटकं यासह अजूनही इथे जशाच्या तशा पाहायला मिळतात. उत्तर-पूर्व हिंदुस्थानात अनेक आश्चर्यचकित करणाऱया निसर्गरम्य जागा सुंदर आणि शांत आहेत आणि नदी-बेट माजुली हे अशांपैकी एक आहे. गुलाबी आणि स्वर्गिय अशा सूर्यास्तामुळे माजुली अविस्मरणीय स्मृती आपल्याला देते. दरवर्षी पावसात रौद्ररूप धारण करणारी ब्रह्मपुत्रा माजुलीचे लचके तोडते तरीही माजुली तितकंच रम्य राहिलं आहे.

माजुली भाताच्या हिरव्यागार गालिच्यांनी आणि अधूनमधून सुवासिक फुलांच्या पाणवनस्पती उगवलेल्या लहान तळ्यांनी भरलेलं आहे. सपाट जमिनीवर असलेले व दोन्ही बाजूंनी बांबूच्या झाडांची सावली असलेले शांत रस्ते असं माजुलीचं रूप आहे. इथले लोक या अरूंद रस्त्यावरून सायकलच्या दोन्ही बाजूंना सामानाच्या जाळीच्या पिशव्या लटकवून जाताना दिसतात. तसंच कोळी लोक असेच सायकलच्या दोन्ही बाजूंना माशांनी भरलेल्या जाळ्या घेऊन जाताना दिसतात.

इथला वसंतातील महोत्सव ‘अली- ऐ- लिगँग’ चांगलं पीक मिळावं म्हणून पृथ्वीचे आभार मानण्यासाठी साजरा केला जातो. येथील तरुण व तरुणी पेरणीची सुरुवात करताना विधिवत नृत्य करतात. शरद ऋतूमधील रास महोत्सव देखील पाहण्यासारखा असतो. त्यावेळी पारंपरिक मंत्रोच्चार, नृत्य, नाटकं इत्यादी कृष्णाचा जन्म, आयुष्य आणि पराक्रम साजरे करण्यासाठी केले जातात.

पक्षी निरीक्षकांसाठी माजुली स्वर्ग आहे. कारण अनेक प्रकारचे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी इथे पाहायला मिळतात. अनेक पक्ष्यांचे थवे आकाशातून पाण्यात झेप घेत आपलं जेवण करतात, चरत असणाऱया गाईगुरांच्या कळपांमधे फडफडत उडत राहतात आणि पाण्यात मौजमजा करतात.

आपली प्रतिक्रिया द्या