
कोकणातील हौशी कलाकारांचे चेहरे रंगवताना रंगभूमीच्या पायऱया कधी चढलो समजलेच नाही… सांगताहेत अनंत मोरे
हौशी रंगभूमी, राज्य नाटय़ स्पर्धा, कामगार कल्याण स्पर्धांमधील नाटकात काम करायचो. कोकणात होणाऱया होळी सणावेळी काही नाटकांचे दिग्दर्शनही करायचो. त्यावेळी आपणच रंगभूषा करावी अशी इच्छा निर्माण झाली. त्यामुळे आपसूकच रंगभूषेकडे वळलो.
साधारण 1980 सालापासून या क्षेत्रात काम करतोय. अर्थात अनुभव चांगला आहे. हळूहळू व्यावसायिक रंगभूमीकडे वळलो. मराठी रंगभूमीवर काम करत असताना गुजराती रंगभूमीवर काम करण्याची संधी मिळाली. गुजरातीमध्ये शफी इनामदार, शरमन जोशी, दीपक घीवाला, अरविंद त्रिवेदी, अजित वाच्छानी, रोहिणी हट्टंगडी यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांची रंगभूषा करण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे मराठी रंगभूमीवर ‘सदासर्वदा’ या नाटकाचे 500 प्रयोग केले.
जनार्दन लवंगारे यांच्या चंद्रकला संस्थेत 15 वर्षे काम केले. त्यांच्या सर्वच नाटकांतील रंगभूषा मी करायचो. चेतन दळवी, विजय पाटकर, विजय कदम, प्रदीप पटवर्धन, सतीश तारे आदी कलावंतांची रंगभूषा करण्याचा योग आला. अरुण नलावडे दिग्दर्शित ‘निखारे’ या नाटकात जयंत सावरकर, जयवंत वाडकर, अविनाश नारकर अशा काही दिग्गज कलाकारांची रंगभूषा केली. विशेष म्हणजे या नाटकासाठी महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट रंगभूषेचे पारितोषिक मिळाले. हा माझ्यासाठी सर्वात सुखद अनुभव होता. त्याचबरोबर मोहन जोशी, ज्योती चांदेकर यांचे ‘पुरुष’ नाटक, सुबोध भावे, शैलेश दातार, आशालता वाबगावकर यांची ‘महासागर’ या नाटकांसाठी रंगभूषा केली. सध्या रंगभूमीवर सुरू असलेले ‘बाबुराव मस्तानी’ या नाटकाचे दीडशे प्रयोग झाले आहेत. विशेष म्हणजे या नाटकातील दिग्दर्शक आणि कलाकार यांना ‘झी’चा पुरस्कार प्राप्त झाला.
आतापर्यंत केलेल्या वैशिष्टय़पूर्ण रंगभूषेविषयी सांगायचे झाले तर गुजराती रंगभूमीवरचे ‘हसता रमता साव अचानक’, ‘या चांगल्या घरात असं घडलं कसं’ या नाटकांत दहा मिनिटांमध्ये विग बदलणे खूपच जिकरीचे काम होते. त्याचा मला सराव करावा लागला. काही दिवसांच्या प्रयत्नाने विग बदलणे शक्य होऊ लागले. नाटकातील रंगभूषेचे हे अनोखे वैशिष्टय़ आहे की, नाटकातील रंगभूषेचे हे कसब आहे की, फारच कमी वेळेत अशा काही कृती कराव्या लागतात. उत्तम रंगभूषाकार होण्यासाठी खूप परिश्रम करायला हवेत. प्रत्येक रंगभूषेचा अभ्यास, बारकाईने निरीक्षण या गोष्टी सतत व्हायला हव्यात. रंगभूषेचे प्रशिक्षण घेताना मला तशा काही अडचणी आल्या नाहीत. कारण या कलेची मुळातच आवड होती, मात्र आतापर्यंतच्या प्रवासात नोकरी करून नाटक करणे म्हणजे माझ्यासाठी तारेवरची कसरत होती. यासाठी मला माझ्या कुटुंबीयांनी समजून घेतले आणि सहकार्य केले. म्हणूनच मी आतापर्यंत या क्षेत्रात न थकता कार्यरत आहे.
या कलेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि गुजरात फिरता आले त्यामुळे खूप खूप आनंद मिळाला. आज वयाच्या 70 व्या वर्षीसुद्धा पूर्वीच्याच ईर्षेने रंगभूषेचे काम करतो आहे. हेच समाधान!


























































