
<<< साधना गोरे >>>
भाषेतल्या एखाद्या शब्दाचं आपल्याला अगदीच विसंगत वाटेल अशा शब्दाशी नातं असतं. नातं पण कसं, तर अगदी वेगवेगळ्या संदर्भात वापरले जाणारे शब्द चक्क सख्खे भाऊ असावेत तसे. गाठभेटमधला ‘गाठ’, दोऱ्याची मारतात ती ‘गाठ’ आणि पुस्तक म्हणजे ‘ग्रंथ’ हे असेच भाऊबंद असलेले शब्द आहेत. तुम्हाला खरं वाटत नाही ना? मग थांबून सगळा लेख वाचा.
मराठीत ‘गाठ’ हा शब्द विविध संदर्भात वापरला जातो. या शब्दाचा मूळ अर्थ रचणे, मिळणे, एकत्र होणे असा होतो. उदाहरणांसह सांगायचं तर दोरखंडाची गाठ मारतात किंवा गाठ बसते. पैसे ठेवून वस्त्राला गाठ मारली जाते. समोरासमोर भेटण्याला, एकत्र येण्याला ‘गाठ पडली’ म्हटलं जातं. चढाई करून जाणं या अर्थाने ‘माझ्याशी गाठ आहे’ म्हटलं जातं. शरीराच्या किंवा झाडाच्या अनपेक्षित फुगीर भागालाही गाठ म्हटलं जातं.
अशा या विविधार्थी ‘गाठ’ शब्दाचं मूळ संस्कृतमधील ‘ग्रंथ’, ‘ग्रंथिः’ या शब्दांत आहे. ग्रंथामध्ये मजकूर आणि पानं एकत्र केली जातात. पूर्वी ग्रंथ तयार करण्याची प्रक्रिया आजच्या इतकी सोपी नव्हती. कागदाचा शोध लागण्याआधी ग्रंथ लिहिण्यासाठी विशिष्ट कापड, चर्मपत्र, भूर्जपत्र, झाडांच्या साली यांचा वापर केला जात असे. अर्थात ते सगळं लेखन एकत्र करण्याची प्रक्रिया फार जिकिरीची असणार. एकत्र येण्याचा हाच भाव लक्षात घेऊन माणसं एकमेकांना अवचित भेटण्याला, एकत्र येण्यालाही ‘गाठ पडणं’ म्हटलं गेलं.
संस्कृतमधील ‘ग्रंथ’, ‘ग्रंथिः’ शब्दांवरून मराठीत ‘गाठ’ शब्द तयार झाला, तर पालीमध्ये ‘गन्थन’, बंगालीमध्ये ‘गॉठान’, उडियामध्ये ‘गाथिबा’, हिंदीत ‘गाठना’, गुजरातीत ‘गांठ’, सिंधीत ‘गाठणुं’ अशी रूपं आहेत.
पूर्वी पुरुषांचा पोषाख म्हणजे धोतर आणि स्त्रियांचा लुगडं. या पोशाखाला खिसे असण्याचा प्रश्न नव्हता. पैसे संग्रही ठेवायचे तर धोतराच्या किंवा लुगड्याच्या कमरेच्या निऱ्यांच्या गाठीत ठेवले जात. जास्तीचे पैसे ठेवायचे झाले तर तेही एखाद्या वस्त्रातच ठेवले जात आणि त्या वस्त्राचीही गाठ मारली जाई. यावरून ‘गाठीशी पैसा ठेवणं / असणं’ यांसारखे शब्दप्रयोग तयार झाले. आजच्याप्रमाणे पूर्वी बँका नव्हत्या. त्यामुळे मुदत ठेव असा काही प्रकार असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे खर्च करायचा नाही अशा पद्धतीने काळजीपूर्वक जपून ठेवलेल्या पैशाला ‘सात गाठींतला पैसा’ म्हटलं जाई. एखादी वस्तू ठेवून गाठ मारलेलं वस्त्र झालं गाठोडं किंवा गठुळं. त्यामुळे पैसा, धन, मौल्यवान वस्तू या अर्थानंही ‘गाठोडं’ शब्द वापरला जातो.
सोन्याच्या माळा म्हणजे मंगळसूत्र, बोरमाळ, पुतळ्यांची माळ इ. विशिष्ट धाग्यात गुंफले जातात. या गुंफण्याच्या प्रक्रियेलाही गाठवणं म्हणतात. या प्रक्रियेत त्या दागिन्यांचे मणी विशिष्ट गाठी देऊन एकत्र केले जातात. मंगळसूत्राला तर काही भागांत गंठण असंही म्हणतात.
दोरीची दोन टोके एकमेकांमध्ये कशा प्रकारे गुंफली जातात यावरून गाठींचे साधी गाठ, सुरगाठ, निरगाठ इ. विविध प्रकार पडतात. विशिष्ट हेतूनुसार ते ते प्रकार वापरले जातात. लग्नात वधूवरांच्या वस्त्रांची गाठ मारली जाते. कारण विवाह संबंध मरणापर्यंत सुटत नाहीत असं मानलं जातं. या गाठीला जन्माची गाठ किंवा लग्नगाठ म्हणतात. वधूवरांच्या वस्त्रांची ही गाठ सोडण्याचा मान वधूच्या बहिणीचा म्हणजे करवलीचा असतो. करवलीचा मान म्हणून तिला बक्षीस दिलं जातं. त्याला गाठ दाम किंवा गाठ सोडवणं म्हणतात.
एकमेकांविषयी गैरसमज होऊन मनात त्या माणसाविषयी अढी बसते, त्यालाही गाठ बसणं म्हणतात. शिवाय एखाद्याच्या स्वभावाचा थांगपत्ता लागत नसेल तर अशा माणसाला ‘आतल्या गाठीचा’ म्हटलं जातं.
संत तुकारामांचा एक अभंग आहे – ‘गांठी पडली ठका ठका । त्याचे वर्म जाणे तुका’ या ओळींच्या आधी तुकारामांनी एक गोष्ट सांगितली आहे ती अशी – वाघ कोह्याला म्हणतो, ‘‘मला फार भूक लागल्यामुळे मला सुखाने तुला खाऊ दे. तसंही तुला मरण काही चुकणार नाही. मग तू मला तरी उपाशी का मारतोस?’ त्यावर कोल्हा म्हणतो, ‘‘तू म्हणतो ते अगदी योग्य आहे, पण तू तुझ्या तोंडानेच सांगत आहेस की, मरण चुकणार नाही. मग तू मला सोडून दिलेस तर तुला परोपकार करण्याचं पुण्य मिळेल. त्यामुळे तुझं म्हणणं तूच समजून घे म्हणजे झालं!’’ एका ठकाला दुसऱ्या ठकाची गाठ पडली तर ते एकमेकाला कसा स्वार्थी उपदेश करतात ते मला माहीत आहे, असं तुकोबा म्हणतात.