खाऊच्या गोष्टी – ‘मारी’ लय भारी!

>> रश्मी वारंग

अगदी खास म्हणावी अशी चव नसतानाही एखादं बिस्कीट जगभरात लोकप्रिय कसं होऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे मारी बिस्कीट. एका राणीच्या नावाने जन्माला आलेल्या आणि हिंदुस्थानसकट जगभरातील मंडळींचा नाश्ता ठरलेल्या या मारी बिस्किटांची ही भारी गोष्ट.

पिक फ्रीन्स हा लंडन येथे राहणारा बेकर. त्याच्या बेकरीत होणारी विविध बिस्किटस् लंडनकरांच्या नाश्त्याचा भाग होती. अशा काळात 1874 साली रशियाची राजकन्या ग्रॅण्ड डचेस मारीया अलेक्झान्ड्रोवना हिचा विवाह डय़ुक ऑफ एडींबरा यांच्याशी झाला. ब्रिटिश जीवनात राजा, राणीचं महत्त्व किती आहे हे आपण अलीकडेच अनुभवलं. तर  या राजेशाही विवाह  सोहळय़ाचा आनंद आपल्या परीने व्यक्त करण्यासाठी पिक फ्रीन्सने आपल्या बेकरीत काही बिस्किटस् बनवली आणि राणी मारीयाच्या सन्मानार्थ या बिस्किटांना नक्षीदार सजवत त्याने मारी हे नाव दिले. अगदी आजही, ब्रॅण्ड कोणताही असो, मारी बिस्किटांवर आपल्याला ठिपक्यांची नक्षी आणि मारी हे नाव कोरलेले आढळतेच.

वास्तविक या बिस्किटांमध्ये खास काय आहे? तर काहीच नाही. गव्हाचे पीठ, साखर आणि खाद्यतेल यांच्या वापरासह मारी बिस्कीट तयार होतं, मात्र नाश्त्याच्या वेळी भुरळ घालणारं हे बिस्कीट जगभरात व्हॅनिला या एकाच फ्लेवरमध्ये शक्यतो उपलब्ध होतं. आपल्याकडे ऑरेंज मारी वगैरे प्रकार मिळतात. पण ओरीजनल मारी आणि व्हॅनिला स्वाद यांना कोणीच वेगळं करू शकत नाही.

जगभरात ही मारी विविध, पण  साधर्म्य राखणाऱया नावांनी ओळखली जाते. मारी, मारीबॉन किंवा मारीट्टा, नाव कोणतंही असो, मारीचा स्वाद इथून तिथून सारखाच.

अनेक घरांमध्ये बाळाला घनपदार्थ द्यायला सुरू केल्यावर भरवलं जाणारं पहिलं बिस्कीट मारी असतं, तर वयस्कर मंडळींचं आणि मारीचं नातं अतुट आहे. हे बिस्कीट पचायला हलकं आणि साध्याशा घटकांनी बनलेलं असल्याने मारी आवर्जून  सुचवलं जातं. आजारी मंडळींना भेटायला जाताना खायला घेऊन जाण्याच्या परंपरेत मारीचा हात तर कुणीच धरू शकत नाही. त्यामुळे एकीकडे मारीचा फॅनक्लब मोठा आहे तर दुसरीकडे ही बिस्किटं आजारी असल्याची जाणीव देतात म्हणून मारी बिस्किटस् अजिबात न आवडणारा वर्गही तितकाच आहे. अर्थात याचा मारीच्या लोकप्रियतेवर परिणाम होत नाही.

अशी ही लाडक्या मारीची ही सफळ संपूर्ण कहाणी. नावात राणीचा इतिहास, पण चवीत सर्वसामान्यांचा साधेपणा असं अजब रसायन असणारं मारी चहात बुडवून खाताना आपण त्या साधेपणात कसे विरघळतो कळतंच नाही. आणि म्हणूनच ही आपली मारी लय भारी!

लंडनमध्ये जन्माला आलेलं हे बिस्कीट नंतर युरोपभर लोकप्रिय झालं. विशेष करून सिव्हिल वॉरनंतर स्पेन आणि पोर्तुगाल देशांमध्ये मारीचा खप विलक्षण होता. या काळात आलेल्या अफाट गव्हाच्या पिकामुळे या बिस्किटांची मोठय़ा प्रमाणावर निर्मिती झाली आणि अतिशय सामान्य वाटणाऱया या बिस्किटाने चक्क या देशांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला.

 जगभरात अनेक बिस्कीट कंपन्या या मारी बिस्किटांचं उत्पादन करतात. ब्रॅण्ड कोणताही असो, मारी नेहमीच आपला साधेपणा जपत खवय्यांचं पोट भरण्याचं काम इमानेइतबारे करते.

चाय बिस्कुट ही फक्त हिंदुस्थानींची मक्तेदारी नाही. अनेक देशांत चहात ‘बुडवून’ खायला खास बिस्किटस् बनवली जातात आणि त्यात मारीचा नंबर खूप वरचा आहे.