मूक अभ्यासक्रम – कौशल्य विकासाच्या संधींचे प्रवेशद्वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अविनाश कुलकर्णी, व्यवसाय मार्गदर्शक आणि समुपदेशक

मर्यादित विद्यार्थी संख्या, फी, वेळेची कमी उपलब्धता, प्रवास खर्च, स्टेशनरी खर्च इत्यादी अनेक गोष्टींच्या मर्यादा पारंपरिक पद्धतीने बंद खोलीत दिल्या जाणाऱ्या शिक्षणावर येतात. त्यावर उपाय म्हणून जागतिक स्तरावर ‘मूक’ अभ्यासक्रम जन्माला आले.

मॅसिव ओपन ऑनलाइन कोर्सेस म्हणजे ‘मूक’ https://www.mooc.org या वेबसाइटवर 3000 पेक्षा जास्त ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध असून बहुतांश कोर्स हे निःशुल्क आहेत. करीअर बदलण्यासाठी, रिकाम्या वेळेत स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी विद्यार्थी, गृहिणी, कामावर रुजू असलेले लोकदेखील ऑनलाइन कोर्सेसची निवड करतात. आजपर्यंत जगभरातून लक्षावधी गरजूंनी या कोर्सेसचा फायदा घेतला.

लोकप्रिय मुख्य अभ्यासक्रम

कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, अकाऊंटिंग, फायनान्स, ई-कॉमर्स, इंजिनीअरिंग, बिझिनेस मॅनेजमेंट, क्रिएटिव्ह आर्ट, लँगवेज कोर्सेस, अॅक्चुरियल सायन्स, स्टॉक मार्पेटिंग, हेल्थ अँड वेलनेस, प्रॉफेशनल डेवलपमेंट कोर्सेस, फिजिक्स, केमिस्ट्री, सायकॉलॉजी, मीडिया स्टडिज, सॉफ्टवेअर डेवलपमेंट, सोशल सायन्सेस, स्टॅटिस्टिक्स या मुख्य विषयांशी संबंधित अनेक उपविषयांचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. उदा. डेटा सायन्सअंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, डेटा अनॅलिसिस, डेटा मायनिंग, डेटा व्हिज्युअलायझेशन, मशीन लार्ंनग, पॉवर बी आय टुल, डेटा बेस, कॉम्प्युटर व्हिजन असे अनेक उपविषयांचे कोर्सेस उपलब्ध आहेत.

कार्यपद्धती

‘मूक’  हा नवनवीन गोष्टी शिकण्याचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म (वेबबेस्ड डिस्टन्स लार्ंनग) आहे. आपण हे कोर्सेस केवळ इंटरनेटच्या माध्यमातूनच शिकू शकतो. सर्व कोर्सेस उच्च शिक्षणाचे (सामान्यतः कॉलेज किंवा विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणारे) आहेत. सर्व कोर्सेस आंतरराष्ट्रीय दर्जाचे असतात.  एखाद्या कोर्ससाठी ऑनलाइन नोंदणी झाल्यावर त्या कोर्सचे सर्व भाग एक-एक करून आपल्याला फिल्म, रेकॉर्डेड व्हिडीओज, असाइनमेंट्स, रीडिंग मटेरियल, प्रॉब्लेम सेट्स, ऑनलाइन क्विज व टेस्ट्स, इंटरॅक्टिव्ह लार्ंनग मोडय़ूल्स, फोरमच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांशी संवाद अशा पद्धतीने अवगत केला जातो.

फायदे

‘मूक’ कोर्स करताना रिकाम्या वेळेचा वापर करता येतो आणि आपली प्रोफेशनल ग्रोथ सहज साधता येते. डिग्री आणि मास्टर्स लेवल कोर्सेस वगळता इतर सर्व कोर्सेस निःशुल्क आहेत. सर्व कोर्सेस आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी डिझाइन केलेले असल्यामुळे दर्जेदार असतात. निवडलेल्या कोर्सच्या सर्व स्टेजेस (किमान 85टक्के) पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र (सॉफ्ट कॉपी) डाऊनलोड करता येते. कोर्स निवड करताना कोणत्याही पात्रतेची आवश्यकता नसते.

मर्यादा

निःशुल्क कोर्सेस असल्यामुळे नोंदणी करतात, पण त्यास गांभीर्याने पाहिले जात नाही. कोणत्याही इन्स्ट्रक्टरबरोबर प्रत्यक्ष भेट शक्य नसते. कोणताही कोर्स निवडला तरी शिकणाऱ्यास संगणकाची किमान कौशल्ये अवगत असणे अपेक्षित आहे. कोर्सेसच्या नावांमध्ये असलेले साधर्म्य आणि विविध पर्यायांची उपलब्धता कोर्सची निवड करताना काहीशी अडचणीची वाटते.

तोटय़ांपेक्षा फायदे जास्त आहेत म्हणून जगभरातील लाखो प्रशिक्षणार्थी, संस्था मूकचा पर्याय निवडतात.