लेख : चारित्र्य म्हणजे काय?

>>शिरीष कणेकर

‘चारित्र्य म्हणजे काय? चारित्र्य म्हणजे काय? जे गमावण्याची संधीच मिळत नाही म्हणून टिकून रहातं ते चारित्र्य!’ – मी ‘कणेकरी’ या माझ्या एकपात्री कार्यक्रमात म्हणतो आणि प्रेक्षकांत खसखस पिकते. ते उघडपणे सांगू शकत नाहीत असे त्यांच्या निःष्कलंक, चारित्र्याचे गमक त्यांच्या वतीनं मी खुशाल रंगमंचावरून सांगतोय याचा त्यांना मनातल्या मनात आनंद होतो. बरं, मी काय म्हणालो हे सांगायला ते मोकळे. त्यांच्या व माझ्या चारित्र्याचे रहस्य एकच आहे, हे कुठं ते सांगतात? या कामदेवाच्या क्षेत्रात मी डरपोक असलो तरी एरवी तसा बेडर आहे. शिक्षकांने फळ्यावर लिहिण्यासाठी आमच्याकडे पाठ फिरवल्यावर ‘काय रे, शेणगोळय़ा?’ असं अख्या वर्गात मी एकटाच ओरडलो होतो. वर्गातल्या अबोली तरटेची खाली जमिनीवर पडलेली रिबीन उचलून शिताफीने ‘शेणगोळ्या’च्या खिशात टाकण्याचे देशकार्य मीच केलं होतं. त्यानंतर ‘शेणगोळ्या’ची बकरीची लेंडी झाली होती. हमसे जो टकराएगा मिट्टी मे मिल जाएगा! ‘मी टू’चा जन्म होण्याच्या कितीतरी आधीचं माझं हे पुरुषांना आयुष्यातून उठवण्याचे महान कार्य. मोठेपणी मीही पुरुष होईन हे मला कळलंच नव्हतं.

मी पुरुष झालो की नाही याचीही मला शंका आहे. कारण एकाही महिलेनं (अजून तरी) माझ्याविरुद्ध ‘मी टू’ची तक्रार नोंदवलेली नाही. पौरुष सिद्ध करण्याचा ‘मी टू’ हा चांगला मार्ग मानला जातो. निदान पत्रकार महिलांनी माझ्याविरुद्ध बंडाचं रणशिंग फुंकायला काय हरकत होती? किती जणींना मी माझ्या इंपोर्टेड मोटरसायकलवरून इच्छीत स्थळी पोहोचवलंय? तेव्हा मी काहीच असभ्य वर्तन केलं नसेल? मला एकवेळ नसेल आठवत, पण त्यांना आठवायला काय हरकत आहे? वीस-वीस वर्षांनी आठवलं आणि त्यानंतर आवाज ठरवला तरी चालतं असं मंत्री मनेका गांधी (राहुलच्या काकी!) कायद्यावर बोट ठेवून म्हणतात. असेल बाबा, पण इतकी वर्षे हा उद्रेक मनात दाबून ठेवून चारचौघींसारखं जगणं कसं आहे? वरच्यांनी त्यांच्या घरातला कचरा खुशाल आमच्या बाल्कनीत टाकला तर लगेच आम्ही भांडायला जातो. घटना ताजी असताना संतापाचा भडकाही ताजा व प्रखर असतो. मनेका गांधी म्हणतील की वीस वर्षांनी भांडायला गेलात तर चालेल. तुम्हाला चालेल हो, पण आम्ही कशासाठी भांडायला आलोय हे आम्हाला आठवायला नको का? ‘तुम्हाला वेळ असेल तर कुठला तरी विषय काढून आपण मांडू या का?’ असे मंद स्मित करीत ‘कचराफेम’ शेजाऱ्याला विचारायचं का?…

अलीकडे पेपर उघडला की नरेंद्र मोदी, राहुल गांधी व ‘मी टू’ सोडून काही वाचायलाच मिळत नाही (जसं क्रिकेटमध्ये विराट कोहली सोडून काही नाहीच) अत्याचार झाल्याचा आरोप करणाऱ्या महिलांची संख्या प्रतिदिन वाढत आहे व त्यांनी बुरखा फाडलेल्या पुरुषांची पलटन कोर्टाकडे धावत सुटल्येय. स्वतःला निर्दोष शाबीत करण्याचा हा त्यांच्यापुढे इकमेव राजमार्ग आहे. कोर्टात गुन्हा सिद्ध करणंही सोपं नाही. वीस वर्षांपूर्वी कोणा कामुक पुरुषानं काही अश्लील चाळे केले, सूचक उद्गार काढले किंवा चक्क अतिप्रसंग केला तर त्या महिला कोर्टात सिद्ध कसं करणार? जगात लंपट पुरुषांची कमी नाही. त्यातले बरेचसे आपलं वखवखलेपणा सामाजिक बंधनांच्या चौकटीत ठेवण्यात यशस्वी होतात. काही मात्र अनावर असतात. ते सर्रास स्त्रीशोषण करतात. चित्रपटसृष्टीत हा प्रकार जास्त प्रमाणात आहे, हा समज खोटा आहे. सर्वच क्षेत्रांत तो बोकाळलाय. घरकाम करणाऱ्या महिला बोलत्या झाल्या तर गदारोळ होईल. त्यांना कोणी वाली नाही म्हणून त्या या गैरप्रकारांना बळी पडतात. काही गप्प बसून चालवून घेतात. नोकरी सोडणं हा त्यांना एकच पर्याय असतो. उच्चभ्रू स्त्रियांच्या प्रवक्त्यांनी या शोषित, पीडित, खालच्या वर्गातील स्त्रियांवरील अत्याचारांची नोंद घ्यायला हवी.

अनेक ‘गोवलेल्या’ पुरुषांचं असं म्हणणं आहे की काही सिद्ध होण्याच्या आधीच त्यांच्या पाठीवर कधीही पुसला न जाणारा बदनामीचा शिक्का कायमचा बसतो. त्यानं ते निलाजरं दुष्कृत्य केलंय असं समाज गृहीत धरतो. हे अर्थातच योग्य नाही. पण सुरुवातीपासून सहानुभूती स्त्रियांच्या बाजूनं असते. स्वाभाविक आहे. अन्याय त्यांच्यावर झालाय व संकोच, संभाव्य परिणामांची भीती यांच्यावर मात करून त्या समाजमाध्यमांपुढे बेडरपणे आल्यायत. सुरुवातीलाच पारडं त्यांच्या बाजूनं झुकतंय ते असं सामान्य माणूस म्हणतो – ‘त्यांना काय पडलंय उगीचच कोणाचं न्याय घ्यायचं? काहीतरी मुरतंय नक्की.’
आणखी कोणी म्हणतं – ‘अनेक जणी वाहत्या गंगेत हात धुवून घेतायत? मतलब साधला नाही. मग या मार्गानं प्रसिद्धीच्या झोतात या.’

कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं. आपण आपले काहीही म्हणू या नको. या सगळय़ा ‘मी टू’ प्रकरणांची ‘इस पार या उस पार’ सोक्षमोक्ष लागावा एवढीच अपेक्षा चळवळ बारगळू नये, तक्रारदार ढेपाळू नयेत व ही चार दिवसांची करमणूक ठरू नये, एवढीच श्रीचरणी प्रार्थना…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या