मुद्दा : मानसिकता बदलावी

702

>> गणेश हिरवे

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या नागासाकी व हिरोशिमा या शहरांवर अणुबॉम्ब टाकला व ही शहरे उद्ध्वस्त झाली, लाखो लोक मारले गेले, पराभव, दुःख व निराशा यामुळे सारा देश होत्याचा नव्हता झाला. परंतु फिनिक्स पक्ष्याप्रमाणे या राखेतून जपान पुन्हा उभा राहिला व अल्पकालात तो देश समृद्ध व प्रगत झाला. चमत्कार कसा झाला? याचे कारण जपानी जनतेच्या राष्ट्रप्रेमामुळे. उद्योग, कष्ट, सचोटी या गुणांमुळे. जपानचा पराभव झाल्यानंतर एका अमेरिकन उद्योग समूहाने आपली शाखा जपानमध्ये उघडली, अमेरिकन प्रथेप्रमाणे फक्त पाच दिवसांचा आठवडा ठेवला. दोन दिवस पूर्ण सुट्टी, परंतु जपानी कामगारांनी या सुट्टीस विरोध दर्शविला. व्यवस्थापकांना याचे मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी कामगारांना विचारले, ‘तुमचा विरोध कशासाठी आहे?’ सर्व कर्मचारी म्हणाले, ‘आरामामुळे आम्ही आळशी बनू, आमचे राष्ट्रीय पतन होईल, आरोग्य धोक्यात येईल, फालतू गोष्टींवर खर्च वाढेल. जी सुट्टी, जो आराम आम्हाला वाईट सवयी लावेल, आमची शारीरिक, मानसिक, आर्थिक स्थिती बिघडेल ती आम्हाला नको आहे. आठवड्यात एक दिवस सुट्टी आम्हाला पुरेशी आहे. ज्या देशातील लोक कष्ट व उद्योग यांची कास धरतात त्यांचाच विकास होतो. परिश्रमाशिवाय प्रारब्ध बदलत नाही. आज आपल्या देशाची लोकसंख्या भरमसाट वाढतेच आहे. साधनसंपत्तीचा तुटवडा पडत आहे, भ्रष्टाचार वाढत आहे, लोक कष्ट न करता, दुसऱ्याची फसवणूक करून आपली घरे भरत आहेत. याचे कारण आहे जपानी लोकांची मानसिकता व आपली मानसिकता. कोणताही देश प्रगतिपथावर जातो तेथील देशवासीयांमुळे. आज जपान सर्वच क्षेत्रांत प्रगत आहे. आपल्याकडे साधनसुविधांचा सुकाळ असूनही त्यामानाने आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. याचे कारण स्वार्थ व संकुचितपणा. सार्वजनिक स्वच्छता, प्रदूषण याविषयी आपण कमालीचे उदासीन व निष्काळजी बनलो आहोत. प्रत्येक मनात परोपकाराचा, सौदार्हाचा भाव निर्माण होण्यासाठी प्रत्येकाला स्वतःची, म्हणजे स्वतःच्या मूळ रूपाची ओळख व्हायला हवी. तेव्हाच स्वार्थ, आळस, निष्काळजीपणा इत्यादी दुर्गुण दूर होऊन हिंदुस्थानी माणूस स्वतःही प्रगती करेल आणि देशालाही प्रगतिपथावर नेईल.

आपली प्रतिक्रिया द्या