
>>दिलीप जोशी, [email protected]
मन या दोन अक्षरी शब्दाचं रूप प्रत्यक्ष दाखवता येत नाही, पण त्याच्या अस्तित्वाचा प्रत्यय आपल्याला क्षणोक्षणी येत असतो. मनाशी निगडित असे अनेक वाप्रचार आपण वापरत असतो. ‘मनात येतं, ‘मन जडलं’, ‘मन उडालं’ आणि किती तरी. कविता आणि लेखनात मनाचा उल्लेख माणसाला ‘मन’ कळू लागल्यापासून होत आला आहे. ‘मनःषष्ठाणि इंद्रियाणि’ असं भगवद्गीता सांगते. समर्थ रामदासांनी तर ‘मनाचे श्लोक’च लिहिले. ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तूच शोधून पाहे’ असं त्यांनी म्हटलं. मन हे माणसाचं सुख, दुःख व्यक्त करणारं साधन. मनात कधी काय येईल सांगता येत नाही. कधी ते उत्साहात असेल तर कधी निराशेत. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ असंही म्हटलं जातंच. मन हे असं अनेकरंगी, अनेक सुरांचं. त्याच्या पटलावर सारखं काही तरी उमटत राहतं. आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट त्याच्याच अभिव्यक्तीनुसार घडत असते.
आधुनिक विज्ञानात मन मेंदूतच असतं. मेंदूमधल्या अब्जावधी न्यूरॉन्सचा ‘व्यापार’ आणि रासायनिक प्रक्रिया मन घडवतात, बिघडवतात. म्हणूनच विविध भावभावनांची आवर्तनं मनात सारखी सुरू असतात. जागेपणी तर मन काही ना काही विचार करतंच, पण झोपेतही स्वप्नांच्या रूपाने व्यक्त होत राहतं. मेंदूची अव्याहत विचार प्रक्रिया हृदयाच्या ठोक्यांसारखी आयुष्यभर चालते.
या विचारशृंखलेत कधी नैसर्गिकरीत्या बाधा येते तर कधी आपल्या जीवनानुभवातून कुठे तरी घोळ निर्माण होतो. मग ‘आहे मनोहर तरी, गमते उदास सारे’ असं होतं किंवा ‘मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा’ अशी अवस्था होते. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी मन कासावीस करणाऱ्या गोष्टी घडतातच. एकविसाव्या शतकात जग तंत्रज्ञानात पुढे गेलंय. ‘सर्व सुख हाताशी आहेत असं वाटत असलं तरी या ‘सुखसागरात’ही एकाकीपणाची बेटं असतातच… मग ज्यांच्याकडे काहीच नसतं त्यांच्या मनाची अवस्था काय होत असेल? गरिबी, आजार, अपयश अशी किती तरी कारणं मन विषण्ण करतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन.’ ते खरंच आहे, पण विपरीत परिस्थितीत ते प्रसन्न ठेवायचं कसं? मनात बाहेरून उत्साह ओतता येत नाही. तो पुन्हा मनातूनच आणावा लागतो. तिथेच त्याचा उगम असतो.
मन सतत उत्साही किंवा उदास नसतं. परिस्थितीनुसार त्याचे क्रय-विक्रय बदलत राहतात. निसर्गाच्या लहरीसारखे. आपल्यालाही एकाच दिवसात उत्साह ते उदासीनता अशा अनेक संमिश्र भावनांचा अनुभव येत असतो. ‘सकाळी अगदी छान वाटत होतं, पण आता कंटाळा आलाय’ असं आपण एकमेकांना सांगतो.
मनाच्या या ‘कंटाळवाण्या’ला यशस्वीरीत्या टाळणारेही अनेक असतात. आवडीच्या कामात ते स्वतःला इतकं गुंतवून घेतात की, त्याचा ध्यास होतो. ‘कंटाळा’ यायला वेळच शिल्लक राहत नाही. अशी विलक्षण कार्यरत सामान्य माणसं मी पाहिलीय… केवळ ‘आराम करूनच कंटाळा वाढवणारीही माणसं असतातच. सुस्ती वाढत गेली की, हळूहळू निक्रियता येऊ लागते हे त्यांनाही कळतं, पण वळत नाही. ‘उद्याचं काम आज करा आणि आजचं आता’ इतकी कार्यतत्परता असावी हे बोधवचन झालं, पण अनेकांना आरंभाचा सूरच गवसत नाही तर काही केवळ आरंभशूरपणा करून थबकतात. पुन्हा तेच होतं. मन मनास उमगत नाही. ‘मन रे, तू काहे ना धीर धरे’ अशी अवस्था होते.
यावर ‘पर्सनॅलिटी करेक्शन’ म्हणजे आपल्याच वागण्याचा, जीवनपद्धतीचा आपल्याशीच विचार करून त्यात कोणता सकारात्मक बदल घडवता येईल आणि आपलं व्यक्तिमत्त्व प्रसन्न होईल ते ठरवावं लागतं. तेसुद्धा आपल्याच मनात ठरतं. अशी ही गुंतागुंतीची प्रक्रिया, पण मनाचा ‘गुंता’ करायचा की ‘गोफ’ हे ठरवता येतं. सावधपणा, संयम आणि सहनशीलता जेवढी अधिक तेवढं मन खंबीर होत जातं. मनाविरुद्ध घडलेल्या साध्या गोष्टींनी ढेपाळणारी आणि मोठय़ा संकटालाही धैर्याने सामोरी जाणारी अशी सर्व प्रकारची माणसं अवतीभवती असतात.
सध्याच्या जगात ज्या विविध कारणांनी स्ट्रेस किंवा मानसिक ताणतणाव वाढतोय त्याची जागतिक आरोग्य संस्थेलाही चिंता वाटते. एका बाजूला जग ‘प्रगती’ करताना दिसतं. नित्यनवी यंत्रं दिमतीला येतात. वेगवान प्रवास शक्य होतो. सुबत्तेची कारंजी उडताना दिसतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना एकवेळचं अन्नही मिळत नाही अशी माणसंही याच जगात राहतात. कुणाचं दुःख अपरंपार असतं, तर कुणाचं सुख दुखतं. माणसांच्या जगातली ही परस्परविरोधी चित्रं. अतिहव्याससुद्धा मनावर ओझं लादतो. त्यातूनही त्याचा तोल ढळू शकतो. म्हणूनच जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या दिवशी (10 ऑक्टोबर) जगाला मनाच्या प्रसन्नतेचं स्मरण करून द्यावं लागतं. मुक्त निसर्ग, दुरून कानावर येणारे मंजुळ सूर, आकाशाचे बदलते रंग अशा साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही मन उल्हासित करण्याची शक्ती असते. ‘प्रगत’ म्हणवणाऱ्या आयुष्यात आपण हे सारं हरवतोय का? तसं असेल तर आनंदाचे क्षण वेळीच पकडायला हवेत. मनात साठवायला हवेत. शेवटी मन सुखी तर जग सुखी. आपल्या मनाची काळजी तर घ्यायला हवीच, पण माणूस म्हणून इतरांच्या मनाचीही घ्यावी. त्यातून मानसिक आनंद शतगुणित होईल.


























































