
>> अनिल साबळे
असं म्हणतात की, एक फोटो हजारो शब्दांपेक्षा खूप काही बोलतो. मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून अशीच बोलकी फोटोग्राफी करणारे कवी, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते अनिल साबळे हे नाव सध्या चर्चेत आहे. अनेक फोटोंच्या माध्यमातून साबळे यांनी जुन्नर तालुक्यातल्या आदिवासी, कष्टकरी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. जुन्नर तालुक्यातल्या ओतूर गावात साबळे राहतात आणि याच भागातल्या मुथाळणे या आदिवासी पट्टय़ातल्या शासकीय आश्रमशाळेत काम करतात. साबळे यांच्या फोटोग्राफीचं विशेष म्हणजे ते आपल्या जवळच्या मोबाईलने फोटो काढतात.
आश्रमशाळेत काम करत असताना तिथल्या आदिवासी पट्टय़ातल्या लोकांचं दुःख, समस्या त्यांनी जवळून पाहिल्या. आदिवासी जीवनशैली, तिथला निसर्ग यांचे फोटो मोबाईल कॅमेऱ्याने साबळे यांनी काढायला सुरुवात केली. ते फोटो त्यांनी बऱ्याचदा सोशल मीडियावर टाकले आणि क्षणार्धात हजारो लाइक्स मिळायला सुरुवात झाली. कधी उन्हातान्हात अनवाणी पायांनी चाललेली पोरं, मैलोन्मैल पाण्यासाठी जाणाऱ्या बायका तर कधी रस्त्याच्या कामात खडी फोडून रक्ताळलेल्या तरुणांचे हात तर गुहेत राहणारे आजोबा, सुईणीचं काम केलेल्या आजीबाई तर कधी झाडपाल्याचे औषध देऊन अनेकांना जीवदान देणारे आजोबा असे अनेक आदिवासी कष्टकऱ्यांच्या जीवनशैलीचे पैलू साबळे यांनी आपल्या फोटोंच्या माध्यमातून समोर आणले. आदिवासी, कष्टकऱ्यांच्या समस्या त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर मांडल्या आणि त्यांच्या फोटोंना प्रतिसाद म्हणून अनेक शहरांतून मदतही येऊ लागली. कधी कुणाला शिक्षणासाठी, कधी दवाखान्यासाठी तर कधी व्यवसायासाठी इथल्या लोकांना आपल्या फोटोंच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यात साबळे यशस्वी झाले. त्यांच्या मोबाईल फोटोग्राफीला सामाजिक कार्याचं कोंदण मिळालं. या सगळ्याची सुरुवात झाली ती एका छोट्याशा प्रसंगातून.
आश्रमशाळेची माहितीपत्रकं वाटण्यासाठी तिथल्या आदिवासी पट्टय़ात साबळे फिरत होते. एका घरात त्यांना तीन मुली आणि एक बाई दिसली. त्या बाईच्या तिन्ही मुली तापाने फणफणत होत्या. त्यांच्या उपचारासाठी त्या महिलेकडे पैसेही नव्हते. साबळे यांनी तो फोटो सोशल मीडियावर टाकला आणि काही वेळातच अमेरिकेतून एका व्यक्तीने काही पैशांची मदत साबळे यांच्याकडे पाठवली. साबळे यांचे फोटो खूप बोलके, जिवंत असतात. दिवंगत लेखिका कविता महाजन यांना ते इतके भावले की, त्यांच्या काही फोटोंवर त्यांनी चित्रंही रेखाटली. फोटोग्राफीच्या क्षेत्रातले छायाचित्रकार संदेश भंडारे त्यांचे आदर्श आहेत. संदेश भंडारे यांनी आपल्या फोटोंच्या माध्यमातून कष्टकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडली. तसंच काम मलाही करायचं आहे असं अनिल साबळे म्हणतात.
शब्दांकन : स्वप्नाली अभंग






























































