
>> नीता ब्रह्मकुमारी
आजचे युग मोबाईल युग आहे. बाल-वृद्ध, गरीब-श्रीमंत सर्वजण मोबाईलच्या प्रेमात बुडाले आहेत. रामायणामध्ये सीतेला जसे सोनेरी हरीण मोहित करून गेले तशीच आज सगळय़ांवर मोबाईलची मोहिनी आहे.
आजचा विद्यार्थीवर्ग तर मोबाईलचा शिकारच झाला आहे. एक वेळ अशी होती की, मुले-मुली कॉलेजमध्ये गेले की, ‘त्यांना पंख फुटले, आता त्यांना सांभाळायची गरज आहे’ असं पालकांना वाटायचे, परंतु वर्तमान परिस्थिती अशी आहे की, जन्माला मूल आल्यापासून पालकच त्या लहान मुलांना मोबाईलवर कार्टुन दाखवतात, मोबाईलवर हॅलो बोलायला शिकवतात. बोलताही येत नसलं तरी मोबाईलच्या कितीतरी गोष्टी त्या चिमुरडय़ांनाही कळतात. ही मोबाईलची जादू आहे.
Face is the index of mind म्हटले जाते. मनाची अवस्था चेहऱ्याच्या हावभावांनी समजू शकतो, परंतु आजचा मानव दुहेरी भूमिका करण्यात पटाईत झाला आहे. कधी कधी तर आपले विचार आणि वाणी यामध्ये कुठे ताळमेळही नसतो. मनामध्ये नकारात्मक, ईर्षा, घृणेची भावना ठेवूनही सुंदर हास्य चेहऱ्यावर आणू शकतो.
सेल्फी म्हणजे स्वतःचा फोटो. खरंच स्वतःला विचारून पहा, ‘मी म्हणजे कोण?’ ‘मी म्हणजे एखादी व्यक्ती, पद, जाती?’ हे तर काळानुसार बदलत राहते. लहान मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याच्याकडे ना नाव असते ना जात, पात, धर्म किंवा पैसा असतो. मग मी म्हणजे कोण? शरीर तर नश्वर आहे. एक वस्त्र आहे, साधन आहे, पण त्याला चालवणारी मी एक ऊर्जा आहे. ज्यालाच आध्यात्मिक भाषेमध्ये आत्मा म्हटले आहे. ही चेतना जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंत जीवन आहे. चेतना निघून गेली तर त्याला शव म्हटले जाते. ज्या शरीराला काही अर्थ उरला नाही (deadbody) ते कितीही सुंदर असले तरीही त्याला काही तासांसाठीसुद्धा ठेवत नाहीत. शारीरिक सुंदरता ही अल्पकालीन आहे असे म्हणूनच म्हटले जाते. रूपवान असण्यापेक्षा गुणवान असणे गरजेचे आहे. मनुष्याचे मूल्य त्याच्या अंगभूत गुणांनी ठरते.
रूपवान बनण्यासाठी कितीतरी ब्युटी पार्लर्स आहेत, पण गुणवान बनण्यासाठी काय आहे? आज लहान मुलांनाही ब्युटी पार्लर्स किंवा सलूनमध्ये घेऊन जातो, पण त्याचबरोबर गुणवान बनवण्यासाठी कोणते प्रशिक्षण दिले जाते? हिंदीमध्ये एक म्हण आहे ‘आप कितना जीये उसका महत्त्व नही, परंतु आप कैसा जीये उसका महत्त्व है।’
जीवनाच्या अल्बममध्ये आपण स्वतःच्या कर्माचा हिशेब पहावा. व्यक्तिपरत्वे बदलणाऱ्या आपल्या भावना आणि चेहऱ्यावर आलेले हावभाव न्याहाळावेत. काही जण दिवसातून कित्येक वेळा वेगवेगळय़ा अँगलने फोटो काढतात आणि ते फोटो फेसबुक, व्हॉटस्ऍपवर टाकताना जेणेकरून सर्वपरिचित लोकांनी मला बघावे. आपण दिलेली पोझ किती दिवस त्यांच्या मानस पटलावर राहील हा विचार कोणी करीत नाही.
आपण सुंदर विचारांनी स्वतःला तसेच आपल्या जीवनाला सुंदर बनवावे. व्यक्तीची ओळख त्याच्या व्यवहाराने, कर्माने होते म्हणून महान कार्य करणाऱ्यांना महात्मा म्हटले जाते आणि जे महान कार्य करतात त्यांना स्वतःची ओळख द्यावी लागत नाही. कारण लोक त्यांना त्यांच्या कार्याने ओळखतात. अशा व्यक्तींना सेल्फी काढायची गरज लागत नाही, लोकच त्यांचा फोटो काढतात. जे त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतात अशा महान विभूतींना आपल्या जीवनाचा आदर्श बनवतात तेच मोठे होतात.
विचारांना सुंदर बनविण्यासाठी रोज सकाळी स्वतःला फक्त एक सुविचार पक्का करावा. दिवसाची सुरुवात जर सुविचारांनी झाली तर मनाची अवस्था चांगली ठेवण्यास मदत मिळते. आपले बदलणारे मूड, आपल्या चेहऱ्याची दशाही बदलत राहतात. म्हणून रोज एखादा सुंदर विचार दिवसभर मंत्रपठणासारखा रेटत राहावा. त्यामुळे त्या विचारांचा प्रभाव आपल्यावर होत राहील. उदा. मी खूप सुखी आहे किंवा मी खूप भाग्यवान आहे, मी खूप शांत आहे. असे छोटे-छोटे अभ्यास सतत स्वतःला देत राहिले तर नक्कीच त्याचा चांगला परिणाम कालांतराने आपल्याला दिसून येईल.
फोटो काढताना खास आपण स्माइल देतो, जेणेकरून आपण खूश आहोत हे सगळय़ांना कळावे. चेहऱ्यावर हसू नसेल तर खास हसण्याचा प्रयत्न आपण करतो. अर्थात सुंदर विचार, चांगला मूड असेल तर कृत्रिम हास्य आणावे लागत नाही, पण तो फोटो नैसर्गिकरीत्या सुंदर वाटतो. अशा चेहऱ्याला कोणत्याही अँगलने बघितले तरी तो सुंदरच वाटतो. म्हणून आपण बाह्य गोष्टींवर मेहनत करण्याऐवजी आंतरिक अवस्थेवर मेहनत करावी, जेणेकरून कधी स्वतःचे जीवन न्याहाळताना संतुष्टतेचा अनुभव होईल. प्रत्येकाने सत्कर्माची ‘पोझ’ घेऊन स्वतःचा सेल्फी काढला तर आपले आणि इतरांचेही जीवन आनंदी बनेल.






























































