ठसा – मोहन कुलकर्णी

>> गोरख तावरे

कराड येथील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असलेले मोहन कुलकर्णी यांचे अवघे जीवन हे असामान्य जिद्द आणि डोळस परिश्रम यांची आदर्श कथा होती. मोहन कुलकर्णी आणि त्यांची पत्नी मंजिरी यांनी ‘‘आम्ही देहदान करू’’ असे जाहीर केले होते. दुर्दैवाने कोरोनाची लागण झाल्यामुळे मोहन कुलकर्णी यांचे गेल्या आठवडय़ात निधन झाले आणि त्यांना देहदान करता आले नाही, ती इच्छा अपूर्ण राहिली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकेकाळी पत्रकारितेत मोहन कुलकर्णी नावाचा दरारा होता. शांत, संयमी, मृदू भाषिक असणाऱया मोहन कुलकर्णी यांची लेखणी नेहमी अन्यायाविरोधात आवाज उठवणारी होती. तत्कालीन परिस्थितीत राजकीय लोकांच्या चुकीच्या निर्णयावर सडेतोड लिखाण करण्यात मोहन कुलकर्णी कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. मोहन कुलकर्णी यांचे पाटण तालुक्यातील सांगवड हे गाव. कुलकर्णी कुटुंब कराडला वास्तव्यास आले. त्यावेळी मोहन लहान होते. कुटुंबाची जेमतेम परिस्थिती असल्यामुळे प्रारंभीच्या काळात शिक्षणासाठी पैसे नव्हते. याकरिता घरोघरी वर्तमानपत्र वाटण्याचे काम मोहन यांनी केले. लोकांच्या घरच्या देवपूजा केल्या. वडिलांनी दुधाच्या डेअरीत भांडी घासली. आईने मंगल कार्यालयात लग्नाच्या पंगती वाढल्या. ‘हेही दिवस जातील’ या आशावादावर अडचणींवर मात करीत राहिले. शाळेत असताना फलकावर सुविचार लिहिल्याबद्दल त्यांना शिक्षा करण्यात आली. त्याच वेळी ‘‘आपण जे लिहू ते कोणीही पुसणार नाही’’ अशी प्रतिज्ञा त्यांनी केली. कालांतराने पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण झाले. ‘‘आता जे मी लिहीन ते कोणीही पुसू शकणार नाही’’ याचा त्यांना अभिमान वाटायचा. वृत्तपत्रातील छापील शब्दांचे त्यांना अप्रुप वाटू लागले. ‘‘आपण लिहिलेले आता कोणी पुसणार नाही’’ या जाणिवेने ते आतून बाहेरून मोहरून गेले. त्यांच्या कोणत्याही लेखनाला सूडाचा स्पर्श कधी झाला नाही. तशीच निरुद्देश पत्रकारिताही त्यांनी केली नाही.

मोहन कुलकर्णी यांचे हस्ताक्षर सुंदर होते. शुद्धलेखनाची पुरेशी माहिती असणारे, विषयाचा आवाका लक्षात घेऊन बातमी किंवा लेखाची समर्पक मांडणी, नेमकेपणा, साधीसोपी लेखनशैली होती. पत्रकारितेचा श्रीगणेशा पुण्याच्या ‘तरुण भारत’ या दैनिकातून त्यांनी केला. पुढे विशाल सह्याद्री, लोकमान्य, समाज, ऐक्य, सकाळ, ग्रामोद्धार अशा दैनिकांत विविधांगी लिखाण असणारे लेख प्रसिद्ध झाले आहेत. समर्थ, रथचक्र, रसरंग, लोकप्रभा, साधना, स्वराज्य अशा साप्ताहिकांतूनही त्यांनी लेखन केले. तरुण भारत, लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेसचे वार्ताहर म्हणून काम केले. त्यानंतर कराड कार्यालयाचे दैनिक ‘पुढारी’चे ब्युरो चीफ म्हणून दीर्घकाळ काम केले.

अनेक नवोदित साहित्यिक, गायक, वादक, नर्तक यांना मोहन कुलकर्णी यांनी हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले. महाराष्ट्रातील नवोदितांचे व्यासपीठ म्हणून ‘कला सुगंध साहित्य संघ’ यांनी ही संस्था त्यांनी स्थापन केली. पुढे नवोदितांना प्रोत्साहन देणाऱया चाळीसवर संस्था महाराष्ट्रात स्थापन झाल्या. 1985 मध्ये नवसाहित्य परिषदेने सोलापूर येथे संमेलन भरविले. त्या संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ मोहन कुलकर्णी यांच्या गळ्यात पडली होती. 1975 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त त्यांच्या नेतृत्वाखाली पहिले राज्यस्तरीय कथा लेखिका संमेलन झाले. 1984 मध्ये ‘चौफेर’ संस्थेची स्थापना केली. त्याच्या उद्घाटनाला माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई आले होते. मोहन कुलकर्णी पंचवीस वर्षे त्या संस्थेचे अध्यक्ष होते.

पत्रकारितेतून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी ‘आम्ही लेखिका’ संस्थेची स्थापना केली. मोहन कुलकर्णी यांना व्यापक आणि सर्वसमावेशक दृष्टी होती तशीच रसिकताही होती. एक अभ्यासू, चिकित्सक पत्रकार म्हणून ख्याती होती. परखड आणि निस्पृह अशा लेखणीने सत्य कधीही लपवले नाही. गुळगुळीत लोकप्रियता नाकारण्याचे धैर्य असणारा, जीवनाविषयी संवेदनशील कुतुहल बाळगणारा सहृदय माणूस म्हणून अनेकांशी त्यांचा स्नेह होता. त्यांच्या पत्नी मंजिरी यांनीही मोहन यांच्या प्रत्येक कार्यात मनापासून साथ दिली. आजच्या स्वार्थी जगात ‘रात्रंदिवस नवऱयाने लोककार्यात गढून जावे’ अशी तळमळ बाळगणाऱया मंजिरी वेडय़ाच ठरतील. मात्र त्यांनी या भूमिकेपासून स्वतःला शेवटपर्यंत वेगळे केले नाही. मोहन कुलकर्णी यांना त्यांनी शेवटपर्यंत साथ दिली. मोहन यांचे कार्य पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर प्रेsम करणाऱयांची आहे.

आपली प्रतिक्रिया द्या