आभाळमाया -चंद्रावरच्या अनेक वस्तू

>> वैश्विक  ([email protected])

सध्या चांद्रयान-2 मुळे सर्वत्र चांद्रचर्चा सुरू आहे. चांद्रयान-2 चं यश नेमकं किती टक्के यावरही बोललं जातंय. चांद्रयान-2 मोहिमेचं कौतुक अमेरिकेची स्पेस एजन्सी असलेल्या ‘नासा’लासुद्धा करावंसं वाटलं याचं मर्म लक्षात घ्यावं. प्रगत राष्ट्रांच्या अनेक अंतराळ मोहिमा पहिल्या टप्प्यात फसल्याच्या घटना घडल्या आहेत. अपोलो-11 मधून नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यानंतरही अपोलो-13 च्या मोहिमेला अपयश आलं होतं. मात्र मोठय़ा तांत्रिक कौशल्याने त्यातील संभाव्य चांद्रवीरांना सुखरूप पृथ्वीवर आणण्यात आलं. हॉलीवूडने त्यावर सिनेमाही काढला.

वैज्ञानिक प्रयोगात असं यशापयश अपेक्षितच असतं. अत्यंत किचकट यंत्रसामग्रीत थोडीशी गफलत झाली तरी ‘कोलंबिया’ दुर्घटनेसारख्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं हे जगानं पाहिलंय. त्यामुळे कोणाएका देशाचं अंतराळी अपयश ही उपहासाची गोष्ट ठरत नाही, तर अवघं वैज्ञानिक विश्व त्याच्या बाजूने उभं राहतं. चौदा दिवसांची मुदत संपल्यावर आपल्या चांद्रयान-2 मधून उतरताना वाट चुकलेल्या विक्रमचं नेमकं काय झालं ते स्पष्ट होईल आणि वास्तव स्वीकारून पुढे जाण्याची मानसिक तयारी ठेवावी लागेल.

1959 मध्ये रशियाचं ल्युना-2 बोस्टॉक रॉकेट चंद्राकडे झेपावलं. ते ‘क्रॅश’ करण्यात आलं होतं. त्यानंतर अमेरिका-रशियात याबाबतची स्पर्धाच लागली. 1966 मध्ये रशियाचं ल्युना-9 हे लँडर चंद्रावर प्रथम उतरलं आणि चांद्रपृष्ठावर मानवनिर्मित वस्तू यायला सुरुवात झाली. चंद्राकडे जाणाऱ्या यानांपैकी सर्वाधिक यानं दोन महासत्तांची होती. जपान आणि युरोपीय स्पेस एजन्सीला चंद्रावर यान उतरवण्यात यश मिळालं नाही. चीनने 2013 आणि 2019 मध्ये पाठविलेली चांद्रयानं चंद्रावर उतरल्याने तिथे पोहोचणारा तो चौथा देश ठरला. इस्रायलचं ‘बेरेशिट’ हे चांद्रयान याच वर्षी अयशस्वी ठरलं. आपलं चांद्रयान-2 वरून गेलेलं विक्रम तिरके होऊन पडल्याचे म्हटले जाते, पण नेमकं छायाचित्र आलेलं नाही.

एकेकाळी लहानपणीच्या गोष्टीच्या पुस्तकातला चांदोबा कविकल्पनेतला होता. त्यावर कुणाला ससा तर कुणाला हरीण दिसत होतं. हे सारे दृष्टिभ्रम म्हणजे चंद्रावरच्या विवरांची किमया असल्याचं नंतर सिद्ध झालं तरी ‘चांदोबा चांदोबा भागलास का?’ या गाण्यातलं बालमनात असलेलं कुतूहल कमी झालं नाही. चांदोबा किंवा चंदामामा असलेला चंद्र प्रणयात ‘मधुचंद्र’ होऊन अवतरला. विज्ञानाने त्याचं खरं रूप अनेकदा दाखवलं तरी स्वप्नरंजनातला चंद्र तसाच राहिला.

आता मात्र गेल्या साठ वर्षांत चंद्रावरच्या सशाच्या जागी बऱ्याच मानवनिर्मित वस्तूंनी आणि यानांनी वर्णी लावली आहे. काही वेळा ही याने ‘इम्पॅक्ट’ पद्धतीने चांद्रापृष्ठावर मुद्दाम आदळण्यात आली. आपल्या चांद्रयान-1 चं स्वरूप तसंच होतं. त्याचाही अभ्यासाच्या दृष्टीने फायदा होतोच. म्हणूनच अनेक देशांच्या हेतूपूर्वक ‘क्रॅश’ केलेल्या ‘प्रोब’ची संख्या बरीच आहे.

त्याशिवाय अमेरिकेच्या चंद्रावर माणूस उतरवण्याच्या ज्या मोहिमा यशस्वी झाल्या, त्यातील लँडर चंद्रावर उतरून पुन्हा चांद्रवीरांना घेऊन ऑर्बिटरकडे आल्यावर त्यातील चांद्रवीर ऑर्बिटरमध्ये सुखरूप आले की, वजनदार लँडर परत पृथ्वीवर आणणं खर्चिक असल्याने चांद्रपृष्ठावरच सोडून दिली गेली. अगदी आर्मस्ट्राँगच्या ‘ईगल’लासुद्धा शेवटी चांद्रपृष्ठावरच विश्राम मिळाला.

अशी अनेक यानं, शिवाय अयशस्वी मोहिमांचे अवशेष आणि चंद्रावर झळकणारे ध्वज, नामपट्टिका, संदेशपट्टिका अशा 70 पेक्षा जास्त वस्तू मानवाने चंद्रावर सोडल्या आहेत. त्यात 60 अंतराळयानं (लँडर) आहेत. तीन मानवनिर्मित चांद्रबग्गी आहेत. त्यातून अपोलो मोहिमेतल्या चांद्रवीरांनी  चांद्रपृष्ठावर फेरफटका मारला होता. एक गोल्फ बॉलही असल्याचं म्हटलं जातं. थोडक्यात, किमान 70 कृत्रिम वस्तूंनी चांद्रपृष्ठावर तळ ठोकलेला दिसतो.

यापुढच्या काळात माणूस तिथे वस्तीला गेला तर काय काय घडेल? माणसांची वैशिष्टय़पूर्ण म्हणजे चांद्र वातावरणाला साजेशी घरं, यानं अवकाशयानांचे तळ, त्यावरून ये-जा करणारी रॉकेटस् आणि पर्यटकांची वर्दळ. बघता बघता चंद्राची पृथ्वी व्हायला वेळ लागणार नाही. माणूस तिथे राहणार म्हणजे त्याच्या खाण्यापिण्याची सोय आणि इतर सुखसोयीसुद्धा आल्याच. कदाचित प्राणीसुद्धा बरोबर नेले जातील.

या सगळय़ा उपद्व्यापात चंद्रावर प्रथम यानं उतरलेल्या जागा स्मारकांसारख्या जपाव्या लागतील. नव्या मोहिमांमधील यानं पूर्वी कोणाचं यान उतरलं असेल त्यापासून किमान 2 किलोमीटर दूर उतरावीत असं नासाला वाटतं. थोडक्यात काय, चंद्रावरच्या गर्दीची धास्ती आतापासूनच वाटू लागली आहे. व्यवस्थित काळजी घेतली आणि माणसांच्या समूहाने शिस्त पाळली तर चंद्र सुंदर ठेवता येईल. चंद्रावरच्या आरंभीच्या महत्त्वाच्या मोहिमांचे अवशेष ‘पुराण वस्तू’ (हेरिटेज) म्हणून जपले जावेत ही मागणी आता होऊ लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या