चेहऱ्यावरील वांग करा दूर

>> मृणाल घनकुटे

त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱया काही पेशी असतात, ज्यामुळे आपल्या त्वचेला रंग प्राप्त होतो. ज्याला मेलानोसाइट्स असे म्हणतात. जेव्हा मेलानोसाइट्स प्रभावित होतात, तेव्हा त्वचेतील काही भागांत जास्त प्रमाणात मेलॅनिनची निर्मिती होते आणि त्यामुळे त्वचेचा काही भाग जास्त काळपट व काही भाग वेगळा दिसू लागतो, यालाच वांग येणे असे म्हटले जाते.

सुंदर दिसणे प्रत्येकाला आवडतेच, पण बदलत्या जीवनशैलीनुसार सौंदर्यप्रसाधने, हार्मोनल बदल या सर्वांमुळे चेहऱ्याचा पोत बदलतो. मुरमे, छिद्रे यांसारख्या अनेक समस्या भेडसावतात. त्यातलाच एक त्वचेमध्ये होणारा बदल म्हणजे वांग. चेहऱयावरील वांग समस्येमुळे अनेक जण त्रस्त असतात. याविषयी त्वचाविकार विशेषज्ञ डॉ. सिमल सोईन यांनी केलेले मार्गदर्शन…

हायपर पिग्मेंटेशनपासून सुटका

हायपर पिग्मेंटेशन नुकसानकारक नसते, पण चंद्रावर जसे डाग दिसतात, तसे काहीसे हायपर पिग्मेंटेशनमुळे चेहऱयाबद्दल म्हणता येईल. हायपर पिग्मेंटेशनपासून सुटका मिळवणे वा ते वाढण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रकारचे उपचार आणि घरगुती उपाय उपलब्ध आहेत.

1. कडक उन्हाला टाळा.
2. त्वचेवर खाजवणे टाळा.
3. प्रदीर्घ काळासाठी सूर्यकिरणांपासून त्वचेचा बचाव न केल्याने त्वचा स्वरक्षणासाठी मेलॅनिनचे अधिक उत्पादन करते तेव्हा वांगासारखे हट्टी डाग येतात. ते घरगुती उपाय करून जात नाहीत. सर्वात आधी त्वचेला सूर्यापासून वाचवण्यासाठी बाहेर जाताना चेहरा झाकून जात जा. ते शक्य नसेल तर सनस्क्रीन वापरणे सुरू करा.

सनस्क्रीन हे नेहमी spf 30, pa+++ किंवा त्यापेक्षा जास्त असावे.

तुम्ही त्वचेच्या डार्क पॅचचा रंग हलका करण्यासाठी आणि हायपर पिग्मेंटेशनपासून सुटका मिळवण्यासाठी पुढील उपचारांचाही अवलंब करू शकता. टॉपिकल क्रीम ः बहुतांश व्यक्ती हायपर पिग्मेंटेशन वा वांग यांच्यावर उपचार करण्यासाठी टॉपिकल ट्रीटमेंटचा वापर करत असतात. टॉपिकल ट्रीटमेंटमध्ये ते घटक जरूर असले पाहिजेत, जे त्वचेचा रंग हलका करण्यात मदत करतात. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कॉस्मेटिक प्रक्रिया ः त्वचेचा रंग हलका किंवा वांग दूर करण्यासाठी काही कॉस्मेटिक उपचार आहेत. लेझर थेरपी, इंटेन्स पल्स्ड लाइट, केमिकल पील्स, मायक्रोडर्माब्रेजन इत्यादी.

जर तुम्ही हायपर पिग्मेंटेशनच्या उपचारांसाठी वरीलपैकी कोणतीही एक प्रक्रिया अवलंबण्याचा विचार करत असाल तर ती प्रक्रिया आणि संभाव्य साइड इफेक्ट्सबाबत स्किन केअर तज्ञ अथवा डर्मेटोलॉजिस्ट यांच्याशी जरूर संवाद साधा.