लेख – संग्रह आणि जतन

531

>>  दिलीप जोशी 

आज जे निर्माण होतं त्याचा उद्या इतिहास होतो. मग कालच्या वस्तूसुद्धा ऐतिहासिक ठरतात. त्यांचा त्या काळात होता तसाच वापर आज होतोच असं नाही. घराघरातल्या अशा एकेकाळी हौसेने घेतलेल्या वस्तू माळ्यावर अडगळीत जातात. आज शहरातून तरी पाणी तापवायचा बंब प्रेक्षणीय वस्तू झाला आहे. कधीकधी या वस्तूंना दुर्मिळ (अ‍ॅण्टिक) म्हणून मानही मिळतो. काही तर पिढ्यानपिढ्या आपली सोबत करतात. आमच्याकडचं टोल्यांचं घड्याळ गेली 82 वर्षे अव्याहत टिकटिक् करतंय आणि आमच्या चार पिढ्यांनी त्याला ‘चावी’ दिलीय!

प्राचीन राजवाड्यांपासून सामान्यांच्या झोपडीपर्यंतच्या वस्तू आज वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. त्यापैकी बर्‍याच दुर्लक्षित राहातात. कुठे जंगलात पडलेली सुंदर शिल्पं त्या काळाच्या कलावैभवाची साक्ष असते पण त्याकडे ‘जतन’ करण्याच्या दृष्टीने पाहिलं जातंच असं नाही. यासाठी पुराणवस्तुसंग्रहालय किंवा ‘म्युझियम’ फार मोठी कामगिरी बजावतं. काल जागतिक ‘संग्रहालय दिवस’ होता. जगात आधुनिक पद्धतीच्या संग्रहालयांची सुरुवात वेगवेगळ्या ठिकाणी झाली. घराघरात ‘जपून’ ठेवलेल्या जुन्यावस्तू आणि विशिष्ट इमारत बांधून त्यात शिस्तबद्ध पध्दतीने मांडलेल्या वस्तू असे संग्रहाचे अनेक प्रकार आपल्या महाराष्ट्रात, पुण्याचं राजा केळकर संग्रहालय किंवा पैठणचं डॉ. बाळासाहेब पाटील संग्रहालय हे व्यक्तीगत आवड आणि परिश्रमातून निर्माण झालं. इतिहासात डोकावण्याची संधी अशा संग्रहातून मिळते. एकेक वस्तू तत्कालीन संस्कृतीचं प्रतीक असते. त्यावेळच्या विचारप्रक्रियेची कथा नकळत सांगते.

आपल्याकडे अनेक वस्तुसंग्रहालयं आहेत. मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय प्रसिद्धच आहे. ते अनेकदा पाहण्याचा योग आला. सदाशिव गोरक्षकर त्याचे संचालक असताना त्यांच्याकडून जगभरच्या अनेक पुराणवस्तूंची माहिती घेताना भूतकाळाचा प्रवास केल्यासारखं वाटायचं. राजा केळकर म्युझियमसाठी काम करणारे उमेश पवनकर मित्र होते. त्यांच्याकडूनही ‘म्युझिऑलॉजी’ किंवा संग्रहालयशास्त्राची माहीती मिळायची. हिंदुस्थानातल्या प्रसिद्ध संग्रहालयांमधील हैदराबादचं सालारजंग म्युझियम, तंजावूरच्या सरस्वती महाल ग्रंथालयातील संग्रह तसंच जयपूर, भूज येथील संग्रहालयं पाहता आली. मुंबईच्या जडणघडणीत ज्या मराठी मंडळींचा मोलाचा वाटा आहे. त्यापैकी डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय हेसुद्धा खूप समृद्ध आहे. अशी अनेक संग्रहालयं आपल्याला आपल्याच जागतिक, सांस्कृतिक प्रवासाचं दर्शन घडवतात. बडोद्याला सयाजीराव गायकवाड यांचं संग्रहालयही जरूर पहावं.

पुराणवस्तुजतनाचं एक शास्त्र आहे. त्याचा योग्य काळ ठरवणं, त्यांची काळजी घेणं, शक्यतो मूळ स्वरुपातच त्यांचं जतन करणं, त्यांचं नुकसान होऊ नये याची सतत काळजी घेणं आणि कलात्मक मांडणीतून ते लोकप्रिय करणं अशी अनेक जबाबदार्‍या संग्रहालय संचालकांवर असतात. आज जगातल्या शेकडो संग्रहालयांचं दर्शन ‘नेट’वर घेता येतं. डोंबिवलीचे कलारसिक प्राध्यापक आणि निष्णात छायाचित्रकार प्रा. गजानन देवधर सांगतात, ‘मला जगभरातील किमान पन्नास म्युझियम पाहण्याची संधी मिळाली. तिथे केवळ ‘टच अ‍ॅण्ड गो’ असं  न करता एकेका म्युझियममध्ये दोन-तीन दिवस सातत्याने भेट देऊन तिथल्या विस्मयकारी संग्रहाची माहिती मनात नोंदवली. बर्‍याच ठिकाणी छायाचित्र घ्यायला मज्जाव होता पण माहितीपुस्तिका आणि प्रत्यक्ष पाहण्याची अनुभू्ती यातून त्याविषयी एक व्याख्यानच तयार करता आलं. या लेखातील त्यांनी काढलेला हा डायनॉसॉरचा फोटो, लंडनच्या नॅचरल हिस्टरी म्युझियमधला आहे.

अशी ही संग्रहालयांची गाथा. त्यातून आपण आपला शोध घेत असतो. प्रत्यक्ष (प्रॅक्टिकल) ज्ञान मिळवण्यासाठी सर्वांनी अभ्यासपूर्ण रसिकतेने म्युझियम जरूर पहावी. तिथल्या वस्तू तुम्हाला ‘कोलंबस’च्या अमेरिकेत तर कधी सिंधु संस्कृतीमधील प्रशस्त मार्गावर घेऊन जातील. तिथल्या चित्र, शिल्प आणि वाद्यांमधून जीवनाचे रंग आणि सूर गवसतील.

आपली प्रतिक्रिया द्या