लेख – समाजभान जपणारे कृतिशील नाना

  • चंद्रशेखर बुरांडे

ब्रिटिश राजवटीतील मुंबईच्या सामाजिक जडणघडणीत अनेक धनिक उद्योजकांनी मोलाचे सहकार्य केले होते. नाना जगन्नाथ शंकरशेट हे त्यापैकी एक होत. देशभरातून मुंबईत आलेल्या कष्टकरू बांधवांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांचे निवारण करण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांसमोर शिष्टमंडळाचे नेतृत्व करणे, मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेणे, सार्वजनिक आरोग्याचा पाया घालणे, हिंदुस्थानातील पहिल्या रेल्वेचे आयोजन, हिंदू स्मशान भूमी संरक्षण, इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण कार्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. द्रष्टे समाजसुधारक, सेवाभाव, संस्कृतप्रेम, राष्ट्र व धर्माभिमान, अभ्यासू वृत्ती, मितभाषी इत्यादी अनेक पैलू त्यांच्या संपन्न व्यक्तिमत्त्वाला आहेत .पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा कोणता असेल तर तो त्यांच्याकडे असलेले समाजभानहोय. नाना शंकरशेट यांच्या उद्याच्या स्मृतीदिनानिमित्त

स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर मुंबईतील विविध प्रकारच्या नागरी सुविधा व सार्वजनिक स्थळांना नानांचे नाव दिले आहे. एकप्रकारे या जागादेखील नानांच्या स्मृती जपणारी स्मारकेच आहेत. अशी अनेक व्यापक कारणे व नानांनी दिलेल्या सक्रिय योगदानाप्रीत्यर्थ त्यांना ‘आधुनिक मुंबईचे शिल्पकार’ म्हणून गौरवले जाते. नानांच्या स्मृती जपण्यासाठी उभारण्यात येणारे प्रस्तावित ‘स्मृती भवन’ हे स्वातंत्र्यपूर्व मुंबईत अनावरण झालेल्या त्यांच्या पुतळारूपी स्मारकास जोडणारे दुसरे टोक असणार आहे.

नानांच्या समग्र जीवनाचा आढावा घेणारा ‘नाना जगन्नाथ शंकरशेट ः काळ आणि कामगिरी’ हा मराठी भाषेतील चरित्रपर ग्रंथ, श्री पुरुषोत्तम बा. कुळकर्णी यांनी दिनांक 3 ऑगस्ट 1959 रोजी प्रकाशित केला. दुसरा ग्रंथ, गोवा येथील डॉ. प्रकाशचंद्र शिरोडकर यांनी नानांचे आत्मचरित्र इंग्रजी भाषेत प्रकाशित केले आहे. या इंग्रजी ग्रंथाचे एकूण तीन खंड आहेत. तिसरा ग्रंथ, रोहा येथील इतिहास अभ्यासक आणि कोंकण इतिहास परिषदेचे नवनिर्वाचीत उपाध्यक्ष डॉ. शशिकांत वेदक यांनी लिहिला आहे. हा ग्रंथ शासनाने प्रकाशित करावा म्हणून ते प्रयत्नशील आहेत. तत्कालीन मुंबईची एकूण जडणघडण व समाजबांधवांच्या कल्याणासाठी त्याप्रसंगी नानांनी उचललेले प्रत्येक पाऊल दिशादर्शक कसे होते हे उल्लेखित चरित्रग्रंथातून समजते.

महाराष्ट्र सरकारने उल्लेखित तिन्ही ग्रंथ छापून त्यांच्या आवृत्ती महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ग्रंथालयात ठेवण्याची तरतूद करावी असे या लेखाद्वारे सूचित करावेसे वाटते. या लेखाच्या सुरुवातीस दिलेले संदर्भ ‘नाना जगन्नाथ शंकरशेठ ः काळ आणि कामगिरी’ या ग्रंथातून घेतले आहेत.

मुंबई शहर व पालिकेच्या जागेचे आरक्षण करण्यासाठी नानांनी दिलेल्या योगदानाचे महत्त्व ध्यानात घेऊन दि. 28 मार्च 1938 रोजी महापालिकेच्या मुख्य सभागृहात त्यांचे नातू श्री रावोजी शंकरशेट यांच्या विनंतीवरून त्यांचे रंगीत तैलचित्र लावण्यात आले. सन 1956 च्या दरम्यान स्थानिक प्रशासनाने गिरगाव येथील त्यांच्या राहत्या घरासमोरील रस्त्याचे नामकरण ‘नाना जगन्नाथ शंकरशेट मार्ग’ असे केले. दि. 26 जुलै 1995 रोजी ग्रांटरोड येथील नाना चौकातील अर्ध पुतळ्याचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर सन 1996 मध्ये दादर पूर्व येथील उड्डाणपुलास ‘ना. नाना जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपूल’ असे नाव देण्यात आले. सन 2003 मध्ये केंद्र सरकारतर्फे नानांच्या 200 व्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने ‘पोस्टल तिकीट’ वितरित करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या वतीने नानांना मुंबईचे महापौर यांनी अभिवादन व पुष्पहार अर्पण करण्यासाठी ऍड. मनमोहन चोणकर यांनी मांडलेल्या प्रस्तावास तत्कालीन  महापौरांनी मान्यता दिली. त्यानुसार 31 जुलै 2008 पासून सभागृहातील नानांच्या तसबिरीस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली जाते. हा सन्मानही थोडका नसे.

हिंदुस्थानची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईतील पायाभूत सुविधांना दिलेल्या नामकरणातून नानांच्या कार्याची घेतलेली दखल पुरेसी आहे, असे मानून चालणार नाही. नानांनी दिलेल्या योगदानाची महती केवळ मुंबई वा महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित न राहता देशभरातील जनतेसही कळावे या प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या दक्षिण मुंबईत कायमस्वरूपी स्मृती भवन उभारण्याच्या निर्णयातून सन 2014 मध्ये श्री. सुरेंद्रजी शंकरशेट यांच्या अध्यक्षतेखाली ‘ना. नाना जगन्नाथ शंकरशेट प्रतिष्ठान समिती’ स्थापन करण्यात आली.

या समितीच्या माध्यमातून भाईसाहेब पेडणेकर व इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांनी व्हिक्टोरिया टर्मिनस स्थानकास नानांचे नाव देण्यासाठी पाठपुरावा केला होता. परंतु केंद्र सरकारने या स्थानकास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिले. मुंबई सेन्ट्रल रेल्वे स्थानकास नानांचे नाव देण्यासाठीचा प्रस्ताव मुंबई महानगर पालिकेत तत्कालीन नगरसेवक ऍड. मनमोहन चोणकर यांनी मंजूर करून घेतला. तत्कालीन महाराष्ट्र सरकारने दि. 12 मार्च 2020 रोजी हा ठराव विधान सभेत मंजूर केला. जवळपास एक वर्षापासून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे असे समजते.

नानांच्या जीवनातील समाजकार्य येथवर चर्चिल्या गेलेल्या विविध रूपातून, विविध माध्यमातून, विविध व्यक्तिरेखातून, विविध स्थळांना दिलेल्या नामांकनातून प्रकट झाले आहे. नानांचे व्यक्तिमत्व केवळ आकाशाला गवसणी घालणारे नव्हते, ना पांडित्याची हौस पुरवून घेणारे नव्हते; तर ते काळाची पावले ओळखून समाजाच्या अभ्युदयासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व होते. नानांच्या व्यक्तिमत्त्वाचे अंतरंग जाणून घ्यायचे झाल्यास सर्वसामान्य जनतेचे दुःख जाणून त्यांचे प्रश्न हाताळताना लागत असलेली सचोटी तसेच त्यांचे स्वभाव वैशिष्टय़ व त्यांच्यातील लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. नानांना मिळालेली ‘एस्कायर’ ही उपाधी व ‘कोटऑफ आर्मस्’ या मानचिन्हातून त्यांना लाभलेले नाममहात्म्य समजून येते. द्रष्टे समाजसेवक नाना, तत्त्वचिंतक नाना, लोकोद्धारक नाना, समाजजीवनात स्वतःचा ठसा निर्माण करणारे नाना, सुधारणांचे समर्थन करणारे नाना अशा विविध नात्यांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व आपल्याला आजवर प्रेरणा व मार्गदर्शन देत राहिले आहे.

स्मारक समितीने केलेल्या पाठपुराव्याचे फलित म्हणजे मुंबईत नानांचे स्मारक बांधण्यासाठी वडाळा येथे भूखंड मिळवण्यासाठीचा प्रस्ताव 2014 रोजी मंजूर केला. पुरेशा निधीअभावी इमारतीचे बांधकाम अद्यापही सुरू झाले नाही. एकेकाळी मुंबईतील अत्यावश्यक पायाभूत सुविधा व अनेक सामाजिक इमारतींसाठी सढळ हाताने दिलेली आर्थिक मदत तसेच स्वतःच्या मालकीच्या अनेक जागा समाजकार्यासाठी दान दिल्याचे दाखले आहेत. परंतु नानांच्या स्मृती भवनासाठी निधी प्राप्त होण्यात अडचणी येतात हा विरोधाभास आहे!

नानांनी या जगाचा निरोप घेऊन 155 वर्षे पूर्ण झाले. सन 2025 साली हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होतील. दि. 31 जुलै 2025 ही स्मृती भवनाच्या उद्घाटनाची अंतिम मुदत गृहीत धरून इमारतीचे बांधकाम पूर्ण करायला हवे. वरील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जरूर पडल्यास प्रस्तावित आराखड्यात फेरफार करून हाती घेतलेले कार्य तडीस नेणे गरजेचे आहे. जेणेकरून या इमारतीच्या माध्यमातून निरनिराळे उपक्रम राबवून एका नव्या पर्वाची सुरुवात करता येईल. आवश्यकते नुसार केंद्र/राज्य सरकार तसेच आर्थिकदृष्टय़ा संपन्न असलेल्या उद्योजकांनीदेखील या कार्यास आर्थिक हातभार लावावा. नानांचे स्मृती भवन उभारणे म्हणजे ‘समाजभान’ असलेल्या एका महान समाजसेवी वृत्तीचा सन्मान केल्यासारखे आहे!

(लेखक व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या