लेख : द्रष्टे आणि थोर समाजसुधारक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>सतीश पितळे 

नाना शंकरशेट यांच्या ४५ वर्षांच्या जीवनात असंख्य प्रसंग आले, घटना घडल्या आणि प्रत्येक वेळी नानांनी अनुकंपा, मानवता आणि प्रामाणिक इच्छा दर्शविली. प्रत्येक वेळी नानांच्या उदार मनाचे व दातृत्वाचे दर्शन घडले. नानांचे दातृत्व हे केवळ मुंबई वा देशापर्यंत मर्यादित नव्हते, तर ते त्याही पलीकडे होते. यावरून नाना शंकरशेट यांचं मानवतेप्रति असलेले प्रेम, कणव, अनुकंपा दिसून येते.

नाना शंकरशेट हे एक द्रष्टे आणि थोर समाजसुधारक होते. त्यांची राजकीय प्रगल्भता अलौकिक होती. स्त्री शिक्षणाचे ते आद्य पुरस्कर्ते होते. बालपणातच मुलींचा विवाह करून देण्यास त्यांचा प्रखर विरोध होता. स्वतःच्या वाड्यातील परिसरात स्टुडन्ट लिटररी ऍण्ड सायंटिफिक सोसायटीला मुलींची शाळा बांधून देऊन वर शाळेचा योगक्षेमसुद्धा ते चालवीत असत. बालविवाह थोपवण्यासाठी त्यांनी legislative council मध्ये लग्नविषयक कायद्यामध्ये सुधारणा करण्यास सुचविले होते. त्यांचा दृढ मानस होता की, स्त्री शिक्षण आणि बालविवाह यांचा धर्माशी कोणताही संबंध नाही. तसेच विदेशवारी करून आलेल्यांवरील बहिष्कृतीचा त्यांनी नेहमीच निषेध केला. त्यांचे म्हणणे असे की, त्यांनी विदेशात जाऊन ज्ञान संपादन केले आहे आणि आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे.

एल्फिन्स्टन फंड देशामध्ये उच्च शिक्षणाच्या प्रसारासाठी संगठित करण्यात आला होता. नाना त्याचे मुख्य प्रवर्तक होते व आजीवन विश्वस्त होते. संपूर्ण फंड नानांच्या अधिपत्याखाली होता. फंड ज्या कार्यासाठी स्थापन केला गेला होता त्याचे महत्त्व ओळखून नाना शंकरशेट यांनी आपले स्वतःचे योगदान म्हणून रुपये २५ हजार फंडात जमा केले. नंतर या फंडातून नानांनी एल्फिन्स्टन स्कूल व कॉलेज तसेच ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजची स्थापना केली.

नाना नेहमीच शास्त्री, पंडितांबरोबर संवाद राखून होते. निरनिराळ्या वैदिक, धार्मिक विषयांवर त्यांच्या चर्चा घडत असत. असेच एक लक्ष्मणशास्त्री थत्ते – जे नानांच्या शास्त्री, पंडित परिवारातील होते – एकदा दुपारी धावत नानांच्या घरी आले. शास्त्रीबुवा अत्यंत घाबरलेले व विमनस्क अवस्थेत होते. नानांनी त्यांच्या काळजीचे कारण विचारून ते तत्काळ दूर केले. झाले असे की, शास्त्रीबुवांनी सावकाराकडून घेतलेले १५० रुपये परत न केल्याने जप्ती आणली गेली होती. नाना शंकरशेटनी सावकार व बेलीफला आपल्या घरी पाचारण करून जी काही रक्कम होती ती देऊन शास्त्रीबुवांची मोठ्या बेचैनीतून सुटका केली.

नानांच्या जीवनात अशा अनेक घटना, प्रसंग आले तेव्हा नानांचे त्यात दातृत्व दिसून आले. बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर, गोविंद नारायण मडगावकर, दादोबा पांडुरंग, बाबा पद्मनजी अशा या आणि अनेक ख्यातनाम लेखक/ग्रंथकारांना नाना शंकरशेट यांचा आश्रय, पुरस्कार लाभला. नानांनी उदारहस्ते डेक्कन vernacular translation सोसायटी आणि गुजरात vernacular translation सोसायटीला भरघोस देणग्या देऊन उपकृत केले.

लोकांनी स्वतःला वाचनाची सवय लावून घ्यावी, जेणेकरून त्यांना ज्ञानार्जन होईल याकडे त्यांचा कल होता. लोकांना विविध पुस्तकांची ओळख व्हावी, ज्यांना पुस्तके विकत घेणे शक्य नव्हते त्यांच्यासाठी बॉम्बे प्रेसिडेन्सी इलाख्यामध्ये ठिकठिकाणी वाचनालयाचे जाळे विणण्याची त्यांची इच्छा होती. अगोदरच त्यांनी रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेला नॅचरल हिस्ट्रीविषयीची पुस्तके खरेदी करण्यास ५००० रुपयांची देणगी दिली होती. ज्यांनी कोणी मोठ्या वा छोट्या वाचनालयाच्या स्थापनेसाठी नानांकडे आर्थिक मदतीची अपेक्षा दर्शविली, नानांनी त्यांना उदार मनाने, उदारहस्ते मदत केली. पुस्तके खरेदी करण्यासाठी नाना शंकरशेट यांनी कित्येक प्रसंगी ५०० ते १००० रुपये मदत केल्याची उदाहरणे आहेत. पुण्यात जेव्हा संस्कृत लायब्ररी स्थापन झाली तेव्हा संस्कृत भाषेच्या संवर्धनाच्या हेतूने नानांनी संस्कृत भाषेतील नामवंत पुस्तके खरेदी करण्यासाठी ५००० रुपयांची देणगी दिली. १८५४ साली नाना शंकरशेट यांच्या आश्रयामुळे  Bombay Benevolent Library & Reading रूमची स्थापना झाली. नानांनी निव्वळ आर्थिक मदतच केली नाही, तर संस्थेला आपल्या स्वतःच्या मालकीची योग्य अशी जागासुद्धा प्रदान केली.

नाना जसे स्त्री शिक्षणाबद्दल आग्रही होते तसेच त्यांना गर्भवती स्त्रीच्या आरोग्याविषयीसुद्धा कळकळ होती. नुसतीच कळकळ नव्हती, तर नानांनी पुढाकार घेऊन १८५० साली पहिले सूतिकागृह एक हजार रुपयांची देणगी देऊन स्थापन केले.

नाना शंकरशेट, इंडस्ट्रियल स्कूल ऍण्ड रेफॉर्मटरी इन्स्टिट्युशनचे संस्थापक आणि व्हाईस प्रेसिडेंट होते. नानांनी या संस्थेसाठी आपल्या मालकीचा ग्रॅण्ट रोडवरील पेन्शनर्स ऑफिसजवळचा भूखंड दान दिला. जेव्हा नानांनी मोठ्या प्रयासाने देशात रेल्वे प्रकल्प सुरू केला तेव्हा रेल्वेचे कार्यालय थाटण्यास जागेची कमतरता भासत होती तेव्हा नानांनी स्वतःच्या वाड्यातील जागा देऊन प्रकल्पातील अडथळा दूर केला.

एक सर्वांगीण आयुष्य लोकांना जगता यावे, करमणुकीची/ज्ञान संपादनाची विविध साधने उपलब्ध व्हावीत या हेतूने भायखळा येथे व्हिक्टोरिया museum स्थापन करण्यात नानांचा प्रत्यक्ष सहभाग होता. स्थापना होण्यापूर्वीच नानांनी ५००० रुपये देणगी दाखल दिले. एवढेच नव्हे तर, व्हिक्टोरिया गार्डनसाठी नाना आणि त्यांच्या निकटवर्तीय मित्रांनी २५ हजार रुपये गोळा केले आणि तेवढेच पैसे स्वतःचे योगदान म्हणून नानांनी दिले. जनतेच्या करमणुकीसाठी त्यांनी मुंबईमध्ये देशातील पहिले नाट्यगृह स्थापन केले.

प्रवासी, वाटसरू, यात्रेकरू आणि भिक्षंtना रस्त्यात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने नाना शंकरशेट यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, विश्रांतिगृहे बांधली. प्रामुख्याने भुलेश्वर, सोनापूर आणि घोडबंदर येथे. त्र्यंबकेश्वर, वज्रेश्वरी अशा तीर्थस्थळी त्यांनी धर्मशाळा उभारल्या. त्यांचा दानशूरपणा त्यांनी स्वखर्चाने नाशिक, त्र्यंबकेश्वर, वज्रेश्वरी येथे बांधलेल्या रस्त्यांनी दिसून येतो.

त्या काळी मुंबईतून कुठल्याही नैसर्गिक आपत्तीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे जमा करण्यात येत असत. त्या काळी पारशी समाजात अनेक दानशूर धुरीण होते, पण हिंदू समाजात एकुलते एक जगन्नाथ शंकरशेट. देशवासीयांच्या उत्कर्षासाठी, भल्यासाठी नाना नेहमीच भलीमोठी रक्कम देण्यास मागेपुढे बघत नसत. त्यांची धारणा होती की, आपल्याकडील संपत्ती केवळ आपलीच नाही, तर समाजाचाही त्यात हिस्सा आहे. नानांच्या दृष्टीने देवाच्या दयेने एखादा वैभवसंपन्न होतो, पण तो केवळ त्या वैभवाचा निव्वळ विश्वस्त असतो. त्या माणसाला त्या संपत्तीतील काही भागच वापरण्याचा अधिकार असतो. उरलेला भाग हा गरीब, गरजवंत समाजातील भाऊबंदांसाठी असतो. धनवान व्यक्तीची विश्वस्त म्हणून जबाबदारी असते की, त्याने संपत्तीचा विनियोग सामाजिक भान ठेवून करावा. नानांप्रमाणे त्यांचे परममित्र आणि सहयोगी सर जमशेटजी जिजिभॉय यांचीसुद्धा अशीच मनोधारणा होती. त्यामुळे मुंबईमध्ये कुठल्याही प्रसंगाला ते धावून येत व आपल्या मनाला पटेल अशीच कृती करीत. आपल्या आयुष्यात नाना शंकरशेट यांनी नेहमीच कुठल्याही आपत्तीसाठी निधी गोळा करण्यास पुढाकार घेतला व स्वतःही उदारहस्ते भरघोस निधी दिला. त्यांच्या ४५ वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात त्यांनी ५.६० लाख रुपये देणगीदाखल दिले. आज त्याची किंमत अब्जांनी होऊ शकेल.

[email protected]

(लेखक नामदार जगन्नाथ शंकरशेट प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत.)