लेख – ठसा- नारायण बांदेकर

>> दिलीप ठाकूर  

काही काही माणसांना काही केल्या स्वस्थ राहता येत नाही. एक प्रकारचे झपाटलेपण घेऊन ते वावरतात, जगतात आणि आपल्या सहवासात येत असलेल्या अनेकांना ते चांगल्या अर्थाने स्वस्थ बसू देत नाहीत. त्यांनाही ते एनर्जी देत कार्यरत करतात.

नारायण बांदेकर अगदी असेच होते. मराठी पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या अनेकांशी होत राहिलेल्या सततच्या भेटीगाठी, भटकंती आणि एकूणच कामाचा ध्यास अतिशय विलक्षण होता. ही धावपळ आहे, दगदग आहे असे त्यांनी कधीच मानले नाही. अखेर 14 जून 2021 रोजी वयाच्या 79 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली तेव्हाच ते शांत झाले.

वाचक आणि लेखक यांच्या चळवळीत एक कार्यकर्ता असाही त्यांचा आवर्जून विशेष उल्लेख करता येईल. एकीकडे आपले काम सुरू असतानाच त्याचवेळी इतरांनाही सतत काही ना काही सुचवत राहायचे, सकारात्मक दृष्टिकोन देत राहायचे हे त्यांचे पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्राला खूप मोठे देणे आहे. एखाद्याचा लेख अथवा बातमी आवडल्या ते आवर्जून सांगत. अशा सकारात्मक वृत्तीमुळेच ते कायमच जणू तरुण राहिले होते.

सिंधुदुर्ग जिह्यातील बांदा गावी जन्म झालेल्या बांदेकर यांचे बालपण अतिशय हलाखीचे होते. पण असलेल्या परिस्थितीतून मार्ग काढत राहणे या मूळ स्वभावानुसार त्यांनी घरोघरी पेपर टाकण्याचेही काम केले आणि एकीकडे त्यातून आपली वाचनाची आवड जपली तर दुसरीकडे एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि मुंबईत टाइम्स ग्रुपमधील इकॉनॉमिक्स टाइम्समध्ये मुद्रित तपासनीस म्हणून आपल्या नोकरीला सुरुवात केली. पण ते चौकटीत अडकणारे नसल्याने एकीकडे हे काम तर दुसरीकडे साहित्य आणि पत्रकारिता यात संचार सुरू केला. एका कामातून ते अन्य कामात, मग आणखीन एका कामात इतक्या सहजपणे संचार करीत की, त्यासाठी लागणारी क्षमता ते आणतात कुठून असा प्रश्न आपल्याला पडावा. पण ते मात्र अशा प्रश्नोत्तरात न अडकता आपले काम झपाझप करत. त्यांच्या वेगवान चालण्याची सवय त्यांच्या कामातही होती. बराच काळ त्यांचा नवशक्तीशी आणि सहाय्यक संपादक भाऊ जोशी यांच्याशी जिव्हाळ्याचा संबंध होता. इतका की त्यांच्यामुळेच मला नवशक्तीत 1982 साली मुद्रित तपासनीस म्हणून संधी मिळाली.

आठवडय़ात किमान तीनदा तरी ते नवशक्तीत येत. त्या काळात ते नवशक्तीत कामगार सदर लिहित आणि रविवारच्या अंकात वासंती गावकर या नावाने फिल्मी गॉसिप्सचे अफू आणि अफवा सदर लिहित. दोन्हींचे स्वरूप भिन्न, पण एकच व्यक्ती ते करत होती हे विशेषच!  पु. रा. बेहेरे यांच्या निवृत्तीनंतर बांदेकर यांचे नवशक्तीत येणे बरेच कमी झाले. पण 1996 साली नवशक्तीच्या जल्लोष या मनोरंजन पुरवणीसाठी ते माझ्या जोडीला आले. तोपर्यंत ते ‘टाइम्स’मधून निवृत्त झाले होते. 2000 नंतर त्यांनी ‘नवशक्ती’ सोडण्याचा निर्णय घेतला. या पुरवणीसाठी त्यांनी रमेश पवार, नारायण जाधव यांची सदरे सुरू केली आणि नवीन पिढीतील अनेकांना त्यांनी लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले. पत्रकारांनी फक्त वृत्तपत्रीय कामातच अडकून न पडता आपल्या अनुभवावर सदर लेखन तर झालेच, पण पुस्तकही लिहावे याचा ते सतत पाठपुरावा करीत. माझा तो अगदी सुरुवातीपासूनच केल्याने मला बराच फायदा झाला. इतरांना सतत प्रोत्साहन देणे आणि मदतीला धावणे हे त्यांचे वैशिष्टय़ ही त्यांची एक ओळख झाली होती. ‘आपलं महानगर’ या दैनिकात त्यांनी सलग पाच वर्षे कामगारविषयक स्तंभलेखन केले. तर ‘टिळक गेले तेव्हा’ आणि ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची वचने’ अशी त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली.

बांदेकर यांचे आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे, वाचक चळवळीला वाहून घेणे. मोठय़ा प्रमाणावर वाचकवर्ग तयार व्हावा यासाठी ग्रंथालीच्या माध्यमातून त्यांनी कायमच प्रयत्न केले. अनेक प्रकाशकांशी ओळख आणि अगदी मराठी पुस्तकांची आवर्जून विक्री करणारी गिरगाव, दादर येथील दुकाने येथे त्यांचे आवर्जून येणे जाणे असे. मराठी ग्रंथसंग्रहालय, लोकवाङ्मय असा त्यांचा सर्वत्र संचार असे. बाहेरगावाहून मुंबईत आलेल्या नवीन पत्रकार आणि लेखकाला आवर्जून मदत करण्याचा त्यांचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. स्वतःबाबत शक्यतो कमी बोलणारे बांदेकर मालवणी भाषेत बोलताना अधिकाधिक मोकळे होत जात. त्यांच्या जाण्याने एक ग्रंथप्रेमी आणि व्यक्तीस्नेही काळाच्या पडद्याआड गेला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या