गंधकुपी – सृजनगंध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रज्ञा पळसुले

 माझी आजची सकाळ उजाडली तीच चिमणीच्या इवलुशा पिल्लांमुळे…

त्यांचा बारीकसा, पण एकजुटीने सततचा येणारा चिवचिवाट ऐकून कुतूहलाने माझी पावले त्यांच्या घरटय़ाकडे वळलीच.

गॅलरीच्या एका वरच्या बाजूच्या फळीवर चिमणीने आपल्या पिल्लासाठी काडी काडी करून गेले काही दिवसआधी सुंदर छोटेसे घरटे तयार केले होते.

आज या घरटय़ात तिची चिमुकली पिल्ले जन्मास आली आणि मात्र तिचे हे घर खऱया अर्थाने बागडू लागले  व त्यांच्या आनंदाच्या सुगंधात माझेही घर दरवळायला लागले.

सृष्टी ही मोठीच किमयागार आहे हे बोलणं अजिबातच वावगं ठरणार नाही.

आणि विषय जिथे ‘सुगंधाचा’ येतो तिथे मला नेहमी वाटतं की, ‘गंध’ नाही, तर जीवन नाही, तर जीवच अपुरा आहे.

प्रत्येक सजीवाच्या जन्मापासून ते अगदी मृत्यूपर्यंत प्रत्येक जण हे गंधरूपी अनेक सुखदुःख तो अनुभवत असतोच.

एखाद्या घरात नवजात बाळ जन्मास आलं की, आपल्याला शेजारीपाजारी आपोआप निरोप घेऊन येतं.

त्या घराचा पार कायापालट करून टाकतो ते बाळ.

मग अगदी बाळाचं गोड, खटय़ाळ हसू असो की बाळाची लाळ असो किंवा अगदी शी-शु, बाळाची गुटी असो, या सगळ्यामधून एक अनोखा सुंदर व सकारात्मक सुगंध घरामध्ये नवचैतन्य निर्माण करतो.

शिवाय बाळास दिली जाणारी कोळशामधील ओव्याची धुनी तर बाळाच्या तब्येतीसोबतच घरातील जिवाणू, किटाणू निघून जायलाही खूप मदत करते.

पाऊस सुरू झाल्यावर मातीमध्ये जेव्हा नवीन तृण  बहरू लागतात तेव्हा जर एखाद्या गर्द हिरव्या झाडीत आपण गेलो, तर तिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पानाफुलांचा रानगंध अनुभवण्यास मिळतो.

तेथील निरव शांतता…आपल्या डोळ्यापर्यंत उतरणारे धुके …वेगवेगळ्या वेलींची अनोळखी फुले, मधूनच एखाद्या कोकिळेची साद आणि आपल्या पायांखाली कोवळे, मऊ लुसलुशीत नुकतेच डोके वर काढलेले गवत व सोबतच हळूच स्पर्श करणारी ओलसर माती… अशी अत्तरमय नैसर्गिक भटकंती जर रोज घडली तर मानसिक व शारीरिक कोणतेही आजार आपल्याला शिवणारही नाहीत.

चप्पल न घालता अशा प्रकारे मनसोक्त फिरल्यावर  गवत व मातीचा थेट संपर्क आपल्या तळव्यातून मेंदूपर्यंत जातो आणि आपोआप हृदयविकार, वात, बऱयाचदा स्किन इन्फेक्शनही दूर व्हायला मदत करते.

असे म्हणतात, गवत हे उत्तम ऍक्युप्रेशर आहे.

शिवाय वातावरणातील हा सुगंध आपल्याला सर्व ताणतणाव विसरायला भाग पाडून आनंदाने जगायला शिकवतो.

म्हणून स्वतःसाठी स्वतःच थोडा वेळ काढून आपला ‘मी टाईम’ एन्जॉय केलाच पाहिजे.

आणि या सगळ्यांसाठी निसर्ग टिकायला हवा म्हणूनदेखील प्रयत्न आपणच करायला हवेत.

[email protected]