नवरंग रंग से रंग खिला!

942

>> विद्या कुलकर्णी

या नवरंगी पक्ष्याला अनेक नावं आहेत. आपला शेतकरी राजा याचा शकुनाचा आवाज ऐकूनच भातपेरणी करतो.

ननवरंग हिंदुस्थानातील सर्वोत्तमांपैकी एक सुंदर पक्षी आहे. स्थानिक स्थलांतर करणारा हा पक्षी मे महिन्याच्या सुमारास महाराष्ट्रातील जंगलात दिसू लागतो व पावसाची वर्दी देतो.

नवरंग हे पक्षी हिंदुस्थानी उपमहाद्वीपचे स्थानिक स्थलांतर करणारे पक्षी आहेत. ते झाडाझुडपांच्या घनदाट सदाहरित जंगलात व खुरटय़ा झाडांनी आच्छादलेल्या प्रदेशात आढळतात. यांचे प्रजनन हिमालयाच्या पायथ्याशी (दिल्लीजवळ मोरनी जंगलात, हरयाणातील कालका आणि कलसर, उत्तर प्रदेशमधील डेहराडून आणि कॉर्बेट, राजस्थानमधील सरिसका ) येथे होते. पाकिस्तान, नेपाळ ते मध्य आणि पश्चिम हिंदुस्थानातील टेकडय़ांमध्ये 1200 मीटर उंचीपर्यंतसुद्धा यांचे प्रजनन होते. नवरंग पक्षी अलीकडेच ‘नाय-का-नाथ व बास्सी’ राजस्थान येथेही दिसले.

याची शेपूट एकदम आखूड असते किंवा जवळपास नसतेच. हा सहसा जंगलामधे जमिनीवर पालापाचोळय़ामधे किडय़ांकरिता उलथापालथ करताना दिसतो. या पालापाचोळय़ाखाली दडलेल्या अळय़ा, मुंग्या इतर कीटक यांना पकडून तो खातो. याकरिता त्याच्या जाडसर चोचीने तो पानांची बरीच उलथापालथ करताना दिसतो. त्याचे दणकट असणारे पायही त्याला या कामात खूप मदत करतात. या दणकट पायांमुळेच त्याला जमिनीवर उडय़ा मारत चालता येते. याचे डोके फिकट पिवळसर रंगाचे असते आणि त्याच रंगाचे पोट असते.

या पक्ष्याचे रंग अतिशय चित्तवेधक असून प्रामुख्याने निळा, हिरवा, काळा, पांढरा, तांबडा या रंगांची उधळण असते. नर व मादी दिसायला सारखेच असतात.

हे पक्षी दिवसा सहसा जंगलामधे जमिनीवर पालापाचोळय़ामधे, छोटे छोटे नाले व पाने गळणाऱया झाडांच्या फांद्यांत किडय़ांकरिता त्यांच्या जाडसर चोचीने पानांची बरीच उलथापालथ करताना दिसतात. त्यांचे दणकट असणारे पायही या कामात खूप मदत करतात. पालापाचोळय़ाखाली दडलेल्या अळय़ा, मुंग्या इतर कीटक यांना पकडून ते खातात. विविध प्रकारचे कीटक, छोटय़ा अळय़ा, मुंग्या, कोळी, गोगलगाय, बिया व खाली पडलेली फळे हे त्यांचे खाद्य आहे. रात्री मात्र झाडांवर राहतात.

पालापाचोळय़ामध्ये लपलेल्या या पक्ष्यांचे अस्तित्व आवाजावरूनच जाणवते. सकाळी व संध्याकाळी हे पक्षी ओरडताना दिसतात, म्हणूनच त्यांना “Six-O-Clock Bird” असेसुद्धा संबोधितात. ओरडताना हे पक्षी आपले डोके मागे व चोच वरच्या दिशेला निर्देशित करतात. ढगाळ हवेत मात्र त्यांचा आवाज दिवसभर ऐकू येतो.

पश्चिम भागातील भातशेतीधारक शेतकऱयांमध्ये असा विश्वास आहे की, सकाळी नवरंग पक्ष्याची शीळ ऐकू येण्याआधी जमिनीत पेरण्यासाठी लागणारे बियाणे पाण्यामध्ये भिजत घातले तरच पीक भरभरून येते.

या पक्ष्यांच्या प्रजननाचा काळ मध्य हिंदुस्थानात जून ते ऑगस्ट व उत्तर हिंदुस्थानात जुलै असतो. यांचे घरटे नळीच्या आकाराचे 21 सें. मी बाय 10 सें. मी. असते. घरटय़ाच्या बाजूने प्रवेश करण्यासाठी गोलाकार भोक असते. त्यांचे घरटे आतल्या बाजूला तीन स्तरांचे असते. झाडांची मुळे, आवळा व खैर झाडांच्या पानांच्या शिरा यांचा पहिला स्तर, त्याच्यावर झाडांच्या काडय़ा काटक्या व त्यावर पालापाचोळय़ाचा तिसरा स्तर असतो. घरटे जमिनीवर किंवा झुडुपामधे अगदी खालच्या पातळीवर असते. मादी एकावेळी 4/5 अंडी घालते. अंडी गोलाकार असून त्यांचा रंग पांढराशुभ्र असतो आणि त्यावर लालसर, जांभळे ठिपके किंवा चट्टे असतात. नर व मादी दोघे मिळून पिल्लांचे संगोपन करतात.

या सुंदर पक्ष्याचे फोटो काढताना मला खूपच कष्ट घ्यावे लागले, पालापाचोळय़ामध्ये लपणारा असल्यामुळे त्याचा खूपच पाठलाग करावा लागला. संध्याकाळच्या वेळी मात्र माझी इच्छा पूर्ण झाली.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या