लेख – ग्रामीण भागात ग्रंथालय विकासाची गरज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. प्रीतम भि. गेडाम 

ग्रामीण भागात ग्रंथालयांच्या माध्यमातून विकासाची गंगा वाहण्यासाठी अनेक जण आपापल्या स्तरावर कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी, ज्ञानाधारित समाजात सहभागी होण्याची क्षमता आणि ग्रामीण समाजाच्या उन्नतीसाठी ग्रामीण ग्रंथालयाची नितांत गरज आहे. लोकसंख्येचा मोठा भाग गावात राहतो. अशा स्थितीत देशाच्या विकासासाठी सरकारने खेडोपाडी ग्रंथालय समृद्धीसाठी अधिकाधिक गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे आणि आजची ग्रंथालयातील गुंतवणूक हीच उद्या देशाचा विकास आहे. कारण ग्रंथालयांची समृद्धी ही देशातील मजबूत शिक्षण व्यवस्था, प्रत्येक क्षेत्राच्या विकासात सहयोगी आणि सुजाण नागरिक घडविण्याचा मुख्य पाया आहे.

आपल्या देशात ‘गाव तिथे ग्रंथालय’ या संकल्पनेचे अनेक दशकांपासून पाहिलेले स्वप्न आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. हे स्वप्न 100 टक्के कधी पूर्ण होईल हे सांगणे कठीण आहे. देशातील 65.07 टक्के लोकसंख्या खेडय़ात राहते, सध्या देशातील अनेक ग्रंथालये मोडकळीस येण्याच्या मार्गावर आहेत, जिथे पुस्तके, हस्तलिखिते, संसाधने या स्वरूपाचा अनमोल वारसा व फर्निचर, इमारती जीर्ण अवस्थेत असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

2011च्या जनगणनेनुसार ग्रंथालयांना प्रथमच अधिसूचित करण्यात आले, 83 कोटी लोकसंख्येच्या ग्रामीण भागात 70,817 ग्रंथालये आणि 37 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरी भागात 4,580 ग्रंथालये होती. ही संख्या प्रत्येक 11,500 लोकांमागे अंदाजे एक ग्रामीण ग्रंथालय आणि 80,000पेक्षा जास्त लोकांसाठी शहरी ग्रंथालय दर्शवते.

ग्रामीण हिंदुस्थानातील शालेय ग्रंथालयांचे वास्तव, शैक्षणिक स्थिती (ग्रामीण) 2014च्या वार्षिक ‘असर’ अहवालानुसार ग्रामीण हिंदुस्थानातील शालेय ग्रंथालये दुर्लक्षित आहेत. ग्रंथालय असलेल्या शाळांचे प्रमाण 2010मध्ये 62.6 टक्क्यांवरून 2014मध्ये 78.1 टक्क्यांपर्यंत वाढले आहे आणि निश्चितच, गेल्या पाच वर्षांत देशातील सर्व राज्यांमध्ये (उत्तर भारतीय राज्ये वगळता) परिस्थिती सुधारली आहे. असे असूनही ग्रामीण हिंदुस्थानातील 21.9 टक्के शाळांमध्ये ग्रंथालयासारख्या मूलभूत सुविधा नाहीत. चट्टोपाध्याय समितीने एकदा ‘लायब्ररी नाही, शाळा नाही’ अशी टिप्पणी केली होती. या शब्दात 21.9 टक्के शाळांना शाळा म्हणता येणार नाही. हिंदुस्थानात असे एकही राज्य नाही जिथे सर्व शाळांमध्ये ग्रंथालये आहेत. ग्रंथालय असलेल्या शाळांचे प्रमाण 2014मधील 78.1 टक्क्यांवरून 2016मध्ये 75.5 टक्क्यांवर घसरले आहे.

देशातील ग्रंथालयांशी संबंधित समस्या विशेषतः ग्रामीण भागात चिंताजनक आहे. परंतु आजही आपल्या देशात आशेचा नवा किरण घेऊन दुर्गम भागात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतून ग्रंथालयांना चालना दिली जात आहे. समस्यांनी घेरूनही लोकांमध्ये ज्ञानाचा प्रसार करण्याचे निस्वार्थीपणे काम करणाऱ्या अशा समाजसेवकांना मानवतेचा सलाम!

म्हैसूरच्या सय्यद इशाक यांनी समाजसेवेच्या उद्देशाने 11 हजार पुस्तके जमा करून ग्रंथालय उभारले, ते स्वतः कधीच शिकू शकले नाहीत पण त्यांनी लोकांसाठी ज्ञानाचे केंद्र स्थापन केले. मात्र एप्रिल महिन्यात समाजातील काही असामाजिक घटकांनी त्यांचे ग्रंथालय जाळले, पण या परिस्थितीतही त्यांनी हार न मानता पुन्हा ग्रंथालय उभारणीचे काम सुरू केले. ग्रंथालयाच्या उभारणीसाठी देणगी म्हणून देशभरातून पुस्तकांचा वर्षाव सुरू झाला, तसेच अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, दुबई आणि इतर अनेक देशांतून पुस्तके येऊ लागली. आता लवकरच त्यांचे नवीन ग्रंथालयाचे स्वप्न साकार होणार आहे.

केरळच्या जंगलांमध्ये वसलेल्या एडमलकुडीच्या आदिवासी लोकांसाठी स्वतःभोवती ग्रंथालय हे एक स्वप्न होते, पण आता या शहरातील एका छोटय़ाशा चहाच्या टपरीवर ‘अक्षरा’ हे ग्रंथालय स्थापन करण्यात आले आहे. जंगलाच्या मधोमध वसलेले, कदाचित हे जगातील एकमेवाद्वितीय लायब्ररी असेल जिथे केवळ पायीच जाणे शक्य होत होते. मात्र या वर्षी मार्चमध्ये पहिल्यांदा एक जीप एडमलकुडी येथे आली. ही लायब्ररी इतकी प्रसिद्ध झाली की खुद्द पीएम मोदींनी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात या लायब्ररीचा उल्लेख करून कौतुक केले.

राजस्थानच्या ग्रामीण भागात जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने उंटगाडय़ांवर ग्रंथालये (मोबाईल लायब्ररी) आयोजित केली. अशी गावे ज्या परिसरात, ना योग्य वाहतुकीची साधने आहेत ना योग्य रस्ते, अशा गावांतील मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी उंटगाडय़ांवर फिरती ग्रंथालये सुरू करणे अत्यंत कौतुकास्पद आहे. मुलांना आकर्षित करण्यासाठी लायब्ररीमध्ये अनेक सचित्र पुस्तके आहेत, ज्यामुळे त्यांचे शिकण्याचे कौशल्य आणखी वाढण्यास मदत होते. मुलांसाठीही हा एक अतिशय मनोरंजक विषय आहे, गावातील मुले त्यांच्यामध्ये रंगीबेरंगी पुस्तके आणि सजवलेल्या उंटगाडय़ा पाहून खूप आनंदाने पुस्तके वाचतात.

भिलार हे गाव महाराष्ट्रातील सातारा जिह्यातील ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध आहे, जिथे सहसा सर्वत्र ग्रंथालये दिसतात. हे बुक विलेज म्हणून पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. जवळपास प्रत्येक घरात ग्रंथालये स्थापन करून गावकऱयांनी इतरांसमोर आदर्श मांडला आहे. दूरदूरवरून वाचक येथे येऊन तासन्तास पुस्तके वाचतात.

उत्तर प्रदेशातील बांदा जिह्यातील अर्जुनह गावात नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) द्वारे ग्रामीण ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे. या ग्रंथालयात गावातील शेतकऱयांसाठी फळबाग, पीक, फळांची माहिती, शेतीशी संबंधित, दुग्धोत्पादन, व्यवसाय अशा सर्व प्रकारच्या विषयांवर माहिती देणारी पुस्तके उपलब्ध आहेत. असे ग्रंथालय प्रत्येक गावात उभारायला हवे.

आजकाल मंडला जिह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जुगाडद्वारे ग्रंथालय तयार करण्यात येत आहे. जुगाडही असा आहे की, ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येक घरातील रद्दी, वह्या सजविल्या आहेत. ज्ञानाचा रथ गावोगावी, शहरातून धावत आहे. हे वाहन घरोघरी पुस्तके जमा करून महापालिकेत साठवत आहे. यानंतर ही पुस्तके ग्रामपंचायतींमधील ग्रंथालयांमध्ये ठेवण्यात येत आहेत.

लायब्ररी ऑन व्हील, स्ट्रीट लायब्ररी ही संकल्पनाही चांगलीच सुरू झाली आहे. ग्रामीण भागात ग्रंथालयांच्या माध्यमातून विकासाची गंगा वाहण्यासाठी अनेक जण आपापल्या स्तरावर कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी, ज्ञानाधारित समाजात सहभागी होण्याची क्षमता आणि ग्रामीण समाजाच्या उन्नतीसाठी ग्रामीण ग्रंथालयाची नितांत गरज आहे. लोकसंख्येचा मोठा भाग गावात राहतो. अशा स्थितीत देशाच्या विकासासाठी सरकारने खेडोपाडी ग्रंथालय समृद्धीसाठी अधिकाधिक गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे आणि आजची ग्रंथालयातील गुंतवणूक हीच उद्या देशाचा विकास आहे. कारण ग्रंथालयांची समृद्धी ही देशातील मजबूत शिक्षण व्यवस्था, प्रत्येक क्षेत्राच्या विकासात सहयोगी आणि सुजाण नागरिक घडवण्याचा मुख्य पाया आहे.

[email protected]