मंथन – नव्या शैक्षणिक संकल्पनांची नांदी!

407

>> विनायक कुलकर्णी

शिक्षण आणि कौशल्ये विकास क्षेत्रात मोठे पायाभूत बदल घडविण्यास हा कोरोना कारणीभूत ठरणार आहे. अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध अभ्यासक्रम आणि कौशल्ये विकास कार्यक्रम ऑनलाइन सुरू करतानाच, कदाचित शैक्षणिक वर्षात पण चांगले बदल अपेक्षित आहेत. तांत्रिक प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर जी नोकरीची संधी असावयाची ती आता नजीकच्या काही महिन्यांत उपलब्ध असणार नाही. पण या टाळेबंदीच्या निमित्ताने अधिकाधिक कौशल्ये आत्मसात करून नजीकच्या अवधित नोकरी-व्यवसायात संधी प्राप्त करता येणार आहे.

हिंदुस्थानातील शैक्षणिक क्षेत्रात नजीकच्या भविष्यात आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. होम स्कूलिंग, ऑनलाइन शिकवण्या, व्हर्च्युअल क्लासरूमसारख्या संकल्पना आता वेगाने समाजात स्थान निर्माण करतील. हा बदल मध्यमवर्ग आणि नव्याने मध्यम उत्पन्न गटात आलेला समाज गट आनंदाने स्वीकारील. सरकारला सुद्धा आजवर चालत आलेली शैक्षणिक व्यवस्था नव्या रंग-रुपासह आणायला भाग पडत आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमातसुद्धा नव्या व्यवस्थेला सुसंगत बदल घडवून परीक्षा पद्धतीत चांगले बदल करण्याशिवाय पर्याय नाही. पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हेच सांगताना 200 ई-बुकच्या माध्यमांतून शिक्षणाचा प्रवाह वाहता ठेवला जाणार आहे. ज्यांना या क्षेत्रातच कारकीर्द घडवायची आहे अशाच तंत्रकुशल शिक्षकांनाच मागणी वाढेल. प्रत्येक वर्गातील विद्यार्थी संख्येवर कदाचित आरोग्य खात्याची बंधने येतील. टोनिक वर्ल्डवाईडने केलेल्या सर्वेक्षणानुसार या टाळेबंदीच्या काळात ऑनलाइन अभ्यासक्रमात 48 टक्क्यांनी वाढ झाली असून 69 टक्क्यांनी ऑनलाइन शिकवण्यांत वाढ झाली आहे. तसेच ऑनलाइन शिक्षणात एकूण 220 टक्क्यांनी वाढ झाली असून त्यात प्रत्येक दिवसागणिक वाढच होत आहे. ऑनलाइन शिक्षण देणाऱया स्थानकांत (Online Platforms) 108 टक्कांनी झालेली वृद्धी लक्षात घेता, हिदुंस्थानींना सुद्धा ज्ञान आणि नवनवीन कौशल्ये स्वतःच्या विकासासाठी आवश्यक असल्याची जाण या कोरोनाच्या निमित्ताने झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही.

आजवर आपण ज्या पद्धतीने बाहेर समाजात वावरत होतो त्याच्यावर आता बंधने आल्याने मुळातच समाजप्रिय असलेल्या मानवाला हे सर्व जड जाते आहे. आपली म्हणून मानलेली काही मूल्ये आता कायमस्वरूपात बदलावी लागणार आहेत. आपल्या चांगल्या सवयी सुद्धा वेगळ्या परिमाणात बसवाव्या लागणार आहेत. जगभरातील लोक एकीकडे आरोग्य तर दुसरीकडे आर्थिक बाजूच्या अशाश्वतेच्या भीतीपोटी चिंताग्रस्त झाले आहेत. याचा परिणाम उपभोक्ता विश्वास निर्देशांकात प्रकर्षाने दिसून येत आहे. अक्सेन्चार कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात 64 टक्के लोकांना आरोग्याची काळजी वाटते आहे तर 64 टक्के लोकांना या कोरोनाच्या संकटामुळे त्यांच्या वैयक्तिक नोकरीच्या भवितव्याची काळजी वाटत आहे. समाजातील 82 टक्के लोकांना इतरांच्या आरोग्याची भीती वाटते आहे. तर समाजातील 88 टक्के लोकांना अर्थव्यवस्थेवर होणाऱया विपरीत परिणामाची भीती वाटते आहे. आजवर कधीही इतरांच्या जाऊदे स्वतःच्या आरोग्यासाठीही जेमतेम 10.6 टक्के आरोग्यसुरक्षा उत्पादने खरेदी करणाऱया लोकांची या उत्पादनांची खरेदी पन्नास टक्क्यांवर पोहोचली आहे. उठसूट बाटलीबंद थंड पेय पिणारे आता फळांचे ताजे रस घरात करून पिऊ लागले आहेत. सौंदर्यप्रसाधने, फॅशन्स, गृह सजावट, महागडी इलेक्ट्रॉनिक साधने इत्यादी बाबींना ग्राहकांनी कोरोनापश्चात काळासाठी प्राधान्यक्रमात सर्वात तळाची जागा दाखवली आहे. देशी अन्न साखळी पुन्हा या निमित्ताने जोडली जाणार आहे. ज्याची गरज नाही अशा वस्तू किंवा सेवा दुर्लक्षित करण्याची मानसिकता वाढणार आहे. नाममुद्रांकित (Branded) कपडे किंवा साधने घेण्याऐवजी देशी वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा कल झुकतो आहे. डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून अधिकाधिक व्यवहार करताना अगदी नित्याचे किराणा सामान सुद्धा याच माध्यमातून मागविण्याची संख्या वाढू लागली आहे. यात मोठी वाढ तर टाळेबंदी नंतर दिसून येणार आहे.

कोरोना पश्चात काळात जगण्यासाठी लोकांची चांगले अन्न, वैद्यकीय सुरक्षा, आर्थिक सुरक्षा आणि स्वतःसह कुटुंबाची सुरक्षा या चार घटकांना उर्वरित आयुष्यात सर्वात अधिक प्राधान्य देण्याची मानसिकता निश्चित झाली आहे. एकीकडे चांगले अन्न खातानाच दुसरीकडे अन्न फुकट जाणार नाही याची काळजी आपसूकच घेतली जाऊ लागली आहे. आजारी पडू नये म्हणून अतिरिक्त खाणेपिणे टाळण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे घरातील मुलांना या सर्वाची आवर्जून माहिती देऊन आरोग्य संस्कार देण्याकडे पालकांचा कल वाढीस लागतो आहे. वैद्यकीय विमा संरक्षणाची विद्यमान असलेली विमा रक्कम वाढविण्याबरोबरच कुटुंबातील प्रत्येकाचा यात समावेश करण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. कुटुंबाच्या आर्थिक आणीबाणीच्या प्रसंगासाठी तरतूद करण्याचा निर्णय कुटुंब सदस्यांशी चर्चा करून घेतला जाऊ लागला आहे. मुलांच्या शिक्षणासाठी प्राधान्य देतानाच भविष्यातील त्यांच्या करीअरबद्दल सध्यातरी देशातच उपलब्ध असणाऱया स्रोतांचा विचार होऊ लागला आहे. विद्यमान नोकरी व्यवसायातील अशाश्वतता लक्षात घेऊन नजीकच्या भविष्यात उपलब्ध होणाऱया नोकऱया आणि व्यवसायांत संधी साधण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये शिकण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ऑनलाइन कौशल्ये अभ्यासक्रम आणि प्रमाणित अभ्यासक्रम करून ज्ञानाच्या आधाराने आर्थिक संकटाला आपल्या परीने सामोरे जाण्याचे बहुसंख्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. पुढील किमान दोन-तीन वर्षे मनासारखी गुतंवणूक करता येणार नसल्याचे गृहीत धरून, आहे तीच गुंतवणूक सांभाळून ठेवण्याकडे गुंतवणूकदारांचा कल दिसतो आहे. ज्यांच्याकडे अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी आहे त्यांनी बँकिग तसेच शीघ्र गतीशील ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील कंपन्याच्या (Fast Moving Consumer Goods) आणि निवडक औषध कंपन्याच्या शेअर्समध्ये आणि म्युच्युअल फंडांत नियोजनबद्ध (Systematic Investment Plan-SIP) द्वाऱे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. पेन्शन फंड्स आणि राष्ट्रीय पेन्शन योजने (NPS)चा गांभीर्याने गुंतवणूकदार विचार करू लागले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या