
>> ज. मो. अभ्यंकर
1835चा मेकॉलेचा लिपिकांची निर्मिती करणारा शैक्षणिक आराखडा 100 टक्के अमलात आला होता. 1968 आणि 1986च्या (सुधारित 1992) शैक्षणिक आराखडय़ांच्या बाबतीत मिळालेले यश अर्धवट होते. मोठमोठे प्रगत देश वगळता क्युबा, नॉर्वे, स्वीडन, फिनलंडसारख्या आपल्या राज्याहून लहान-लहान देशांतसुद्धा जीडीपीच्या 7 टक्क्यांहून अधिक आर्थिक तरतूद शिक्षणासाठी केली जाते. तशाच राजकीय इच्छाशक्तीचे प्रदर्शन या वेळी घडून आले आणि खरोखर जीडीपीच्या किमान 6 टक्के आर्थिक तरतूद शिक्षणासाठी उपलब्ध झाली तर नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यशस्वी होऊ शकेल.
मार्च महिन्यापासून जगभरातील सर्व वृत्तवाहिन्यांवर आणि अन्य प्रसारमाध्यमांवर कोविड-19चा विशेष प्रभाव आहे. त्यामुळे देश-विदेशातील अनेक धोरणात्मक बदलांची नोंद वृत्तसंस्थांना अपेक्षित गांभीर्याने घेणे शक्य झाले नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वाटय़ाला आलेली उपेक्षा, वृत्तसंस्थांना शैक्षणिक धोरणाचे महत्त्व न समजल्यामुळे आली, असे म्हणता येणार नाही. 1968 आणि 1986ला जाहीर झालेल्या शैक्षणिक धोरणांचा प्रचार व प्रसार सर्वदूर झाला होता. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठवून त्यांचेही अभिप्राय घेण्यात आले होते. इतक्या व्यापक प्रमाणातील प्रसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020चा होऊ शकला नाही. त्यामुळे आम जनतेमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली.
29 जुलै 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मान्यता दिली आणि शासनाच्या वतीने सदर शैक्षणिक धोरणाचा आराखडा देशवासीयांसमोर मांडण्यात आला. शालेय शिक्षणाच्या धोरणाची तुलना यापूर्वीच्या धोरणांशी केल्यास मागील धोरणांची पुनरुक्तीच झाली असल्याचे दिसून येईल. 1968 आणि 1986च्या धोरणातील पूर्व प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था, प्रादेशिक भाषेतून शिक्षण, त्रिभाषा सूत्र, संस्कृत भाषा शिकण्याची सुविधा, शिक्षकांच्या पुरेशा पदांची निर्मिती, मागास भागातील शिक्षकांची भरती, शिक्षक प्रशिक्षणाची दर्जेदार सोय, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या व अन्य सवलती, शाळा समूह केंद्राची स्थापना इत्यादी बरेच कार्यक्रम 2020च्या योजनेत भाषा रचना बदलून अंतर्भूत केले आहेत. मुख्य म्हणजे 1968 आणि 1986च्या शैक्षणिक धोरणात शिक्षणावर जीडीपीच्या 6 टक्के खर्च करण्याचा खास उल्लेख करण्यात आला होता.
मागील दोन्ही शैक्षणिक धोरणे जाहीर झाल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनांनी आपापले कृती कार्यक्रम तयार केले होते. केंद्र शासनाने त्या धोरणांतर्गत डी.पी.ई.पी., ऑपरेशन ब्लॅक बोर्ड, नवोदय विद्यालय, केंद्रीय शाळांचा विस्तार, कस्तुरबा बालिका विद्यालयांची स्थापना, सर्व शिक्षा अभियान इत्यादी कार्यक्रम सुरू केले होते. त्यासाठी शालेय शिक्षणाकरिता आर्थिक तरतुदीत भरीव वाढ केली होती. महाराष्ट्रात आर्थिक तरतुदींचे प्रमाण बऱयापैकी वाढवण्यात आले होते. राज्य शासनाच्या एकूण उत्पन्नापैकी 20 टक्केपर्यंतची तरतूद शालेय शिक्षणाकरिता बरीच वर्षे करण्यात आली. 2020-21च्या अर्थसंकल्पात तर हे प्रमाण 20.42 टक्के आहे. अशा या वाढीव तरतुदीमुळे राज्यात नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर विद्यानिकेतनची स्थापना, केंद्रप्रमुखांच्या पदांची निर्मिती, प्राथमिक शाळांना वेतनेतर अनुदान, सैनिकी शाळांची स्थापना, एम्.सी.सी., नवीन शाळांना अनुदाने, आश्रम शाळांचा विस्तार इत्यादी अनेक उपक्रम सुरू करता आलेत. आर्थिक तरतुदीत बरीचशी वाढ केल्यानंतरही देशात 2018-19मध्ये जीडीपीच्या केवळ 3 टक्के अर्थात रुपये 5.6 लाख कोटी इतकाच खर्च करण्यात आला. 6 टक्केपर्यंतच्या खर्चाचे उद्दिष्ट शासनाला कधीही गाठता आले नाही. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाचे ध्येय गाठण्याकरिता आवश्यक असणाऱया किमान पायाभूत सुविधा निर्माण करणे शक्य झाले नाही. चार वर्गांना एकाच शिक्षकाने शिकवण्याचा अशैक्षणिक प्रयोग बऱयाच ठिकाणी आपण आजपर्यंत थांबवू शकलेलो नाही. शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी सधन प्रशिक्षणाचे वर्ग अजूनही आम्हाला नीटपणे चालविता आले नाहीत. या सर्व कमतरतेचे फलीत असरच्या अहवालाने उघड केले असून आठवीच्या विद्यार्थ्यांना दुसरीचा धडा नीटपणे वाचता न येणे आणि पाचवीच्या बालकांना कोणतीही गणिती प्रक्रिया करता न येणे, असले गुणवत्तेचे धिंडवडे उघड झाले आहेत.
2020चे शैक्षणिक धोरण अमलात आणायला फार मोठय़ा आर्थिक तरतुदीची गरज लागणार आहे. पायाभूत शिक्षणाच्या स्तरावर शिशुवर्ग आणि बालवाटिकांची जवळजवळ सर्वच गावात पुनर्रचना करावी लागणार आहे. वर्गखोल्यांचे बांधकाम, प्रशिक्षित शिक्षकांची अतिरिक्त पदे आणि शिशूंच्या शिक्षणाकरिता लागणारे दृकश्राव्य अध्ययन साधने इत्यादीकरिता बरीच मोठी तरतूद उपलब्ध करावी लागेल. माध्यमिकच्या स्तरावर अनेक नवीन विषयांच्या अंतर्भावामुळे आणि 6 ते 8 वर्गातील व्यवसाय शिक्षणाच्या व्यवस्थेमुळे शिक्षकांची वाढीव पदे आणि अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील. 2025मध्ये बाल शिक्षणात गुणवत्ता निर्माण करण्याचे ध्येय साध्य करण्याकरिता सर्व सुविधा त्यापूर्वी किमान तीन वर्षे आधी उपलब्ध कराव्या लागतील. याशिवाय धोरणात नमूद केल्याप्रमाणे शिक्षकांची पदे मंजूर करण्याचे निकष शिथील होणार असल्यामुळे शिक्षकांची अतिरिक्त पदे, शालेय पोषण आहाराकरिता मध्यवर्ती स्वयंपाकगृहे, शाळाबाहय़ बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता समुपदेशक आणि प्रशिक्षित समाजसेवकांच्या नियुक्त्या, शिक्षकांचे दर्जेदार प्रशिक्षण आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची विशेष व्यवस्था मोठय़ा प्रमाणात निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून राहणार आहे.
असे असले तरी 2020च्या शैक्षणिक धोरणात बरेच अर्थनिरपेक्ष असे नावीन्यपूर्ण कार्यक्रम दर्शवले आहेत. शाळाबाहय़ बालकांसाठी दूरस्थ शिक्षणाची व्यवस्था आणि इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीच्या स्तरावरील सामान्य परीक्षांचे आयोजन त्यामध्ये आहे. अभ्यासक्रम कमी करून चिकित्सक विचारसरणी, शोध, चर्चा, विश्लेषण यावर आधारित अभ्यासक्रम सुचवण्यात आला आहे. इयत्ता तिसरीपासून त्रिभाषा सूत्र, मातृभाषेतून पाचवीपर्यंत शिक्षण, त्रिभाषांची निवड करण्यास राज्याला दिलेले स्वातंत्र्य, गावांतील कारागीरांसोबत वर्षातून 10 दिवस प्रत्यक्ष कार्यानुभव घेण्याची संधी आणि `Doing whats right’ असे नाव धारण करून दिले जाणारे नैतिक मूल्यांचे पाठ हे त्यातील नावीन्यपूर्ण कार्यक्रम आहेत. पाठय़पुस्तकांची निवड करण्याचे स्वांतत्र्य शिक्षकांना राहणार आहे. कोचिंग क्लासेसने चालवलेले पालकांचे आर्थिक शोषण थांबवण्याकरिता मंडळाच्या परीक्षेत आमूलाग्र बदल सुचवला आहे. बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी गणित, विज्ञान, क्रीडा आणि कला संस्थांशी सहसंबंध जोडण्यात येणार आहे. ऑलिंपियाड परीक्षांना विशेष महत्त्व देऊन IIT, NIT आणि BIT अशा नामवंत संस्थांमध्ये ऑलिंपियाड विजयी विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळणार आहे.
शिक्षकांची निवड करताना ज्ञान आणि अध्यापन कौशल्यासोबतच अध्ययन अध्यापनाचा ध्यास तसेच प्रेरणा तपासण्याची व्यवस्था राहील. शिक्षकांना आदर आणि सन्मानाचे स्थान बहाल करताना उत्कृष्ट शिक्षकांना प्रोत्साहनपर वेतन, शिक्षणाच्या सर्व स्तरावर पदोन्नतीची संधी, शाळेच्या गावी निवासाची व्यवस्था, बदल्यांच्या जाचातून सुटका, अशैक्षणिक कामातून मुक्ती, वर्षातील किमान 50 तासांचे दर्जेदार प्रशिक्षण आणि गुणवत्ताधारी शिक्षकास गटसाधन केंद्र, डाएट, शिक्षण विभाग आणि मंत्रालयातील समुचीत पदांवर बढतीची संधी इत्यादी सुविधा शिक्षकांना देण्यात येणार आहेत. विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा यांच्या मूल्यांकनासाठी एनसीआरटी, एनपीएसटी आणि एनसीटीई या शिर्षस्थ संस्था साधन तयार करणार आहेत. सेवापूर्व प्रशिक्षणासाठी चार वर्षांचे बी.एड. ही सुधारित व्यवस्था शिक्षकाच्या अध्यापन कौशल्याची ग्वाही देणारी बाब आहे. याशिवाय माध्यमिक शाळेला केंद्रस्थानी ठेवून 15-20 प्राथमिक शाळांचा समूह शाळा समूह केंद्र या नावाने ओळखला जाईल. सुविधा आणि मनुष्यबळाचे आदानप्रदान या व्यवस्थेमुळे शक्य होईल. बालभावनांचा विस्तार आणि मानवी मूल्यांचा अभ्यासक्रमातील समावेश यामुळे शरीराने स्वस्थ, मनाने संतुलीत आणि बुद्धीने तरल असे विद्यार्थी घडविले जाणे अपेक्षित आहे.
1835चा मेकॉलेचा लिपिकांची निर्मिती करणारा शैक्षणिक आराखडा 100 टक्के अमलात आला होता. 1968 आणि 1986च्या (सुधारित 1992) शैक्षणिक आराखडय़ांच्या बाबतीत मिळालेले यश अर्धवट होते. धोरणांची अंमलबजावणी करण्याकरिता राजकीय शक्ती त्या-त्या वेळी कमी पडली. मोठमोठे प्रगत देश वगळता क्युबा, नॉर्वे, स्वीडन, फिनलंडसारख्या आपल्या राज्याहून लहान-लहान देशांतसुद्धा जीडीपीच्या 7 टक्क्यांहून अधिक आर्थिक तरतूद शिक्षणासाठी केली जाते. तशाच राजकीय इच्छाशक्तीचे प्रदर्शन या वेळी घडून आले आणि खरोखर जीडीपीच्या किमान 6 टक्के आर्थिक तरतूद शिक्षणासाठी उपलब्ध झाली तर नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यशस्वी होऊ शकेल.




























































