लेख : निवृत्तीनाथांचा संजीवन समाधी सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नामदेव सदावर्ते  

सर्व संतमंडळी निवृत्तीनाथांना समाधी देण्यासाठी त्र्यंबकेश्वरी दाखल झाली. प्रत्यक्ष पांडुरंगांनी स्वतः संतांचे पूजन केले. गोदातीरी क्ष्रेत्र धन्य त्र्यंबकेश्वर। चालले भार वैष्णवांचे।। नंतर निवृत्तीनाथांनी श्रीविठ्ठलरायांची पूजा केली, पताकांच्या ध्वजा उभारल्या. पश्चिमेला अनादी अशा समाधीची शिळा समूळ उघडली. ही समाधी अनादी असून चिद्रत्नांनी हिची पूजा घडलेली आहे असे देव म्हणाले.

सातशे तेरा वर्षांपूर्वी शके 1212 मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासे येथे श्रीमदभगवद्गीतेवर ‘भावार्थदीपिका’ अथवा ‘ज्ञानेश्वरी’ हा अप्रतिम ग्रंथ मराठी भाषेत लिहिला. हा अलौकिक ग्रंथ त्यांनी अत्यंत नम्रपणे संतसद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी अर्पण केला.

ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेवरून ‘अमृतानुभव’ हा एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला. आपले अवतारकार्य पूर्ण झाल्यानंतर या चारही भावंडांनी संजीवन समाधी घेऊन आपले शरीर ठेविले. श्रीसंत नामदेव महाराजांनी केलेल्या या चारही भावंडांच्या समाधीप्रसंगांची वर्णने नितांतसुंदर व भावोत्कट आहेत. संत नामदेव हे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई यांचे समकालीन असल्याने त्यांनी केलेली समाधीप्रसंगाची वर्णने अत्यंत यथार्थ व हृदयस्पर्शी अशी आहेत. हे वर्णन वाचले असता अंतःकरण पिळवटून येते, इतके ते सहृदयतेने व कळवळ्याने लिहिले आहे.

सद्यकाळी देव न मानणाऱयांनी जरी ही वर्णने काल्पनिक आहेत असे मानले तरी कविकल्पना म्हणून तरी त्या किती मनोहर उचित व सर्वांच्या डोळ्यांना अश्रू आणणाऱ्या आहेत बघा!

श्रीसंत ज्ञानेश्वरांनी कार्तिक वद्य 13 शके 1218 रोजी अलंकापुरी (आळंदी) येथे समाधी घेतली. त्यांचे लहान बंधू सोपानदेवांनी मार्गशीर्ष वद्य 13 शके 1218 रोजी संजीवन समाधी घेतली. संत चांगदेव यांनी गोदातीरी ‘पुण्यस्तंभी’ येथे समाधी घेतली. नंतर तापीतीरी महग्राम येथे आकाशामध्ये प्रचंड वीज कडाडली व संत मुक्ताई गुप्त झाली. अशा प्रकारे ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताई यांच्या वियोगाने संत निवृत्तीनाथ व्याकूळ झाले. त्यांनी पांडुरंगाला विनवले की, आता माझ्या समाधीची सिद्धता करावी. माझ्या समाधीकार्यासाठी आपण त्र्यंबकेश्वरी चलावे. अशा रीतीने टाळमृदंग, सुस्वर गायन यायोगे सर्व संतमंडळी निवृत्तीनाथांचे मन उल्हासित करण्याचा प्रयत्न करीत चालले. योगी, मुनीजन गीतेच्या चर्चेने निवृत्तीरायास सुखावीत होते, पण निवृत्तीनाथ अत्यंत उद्विग्न झालेले होते. ते म्हणतात, मला माझ्या ज्ञानदेवाचे स्मरण होत आहे. मुक्ताबाईच्या मुखाने परमार्थ विचार ऐकावा असे वाटते.

कीर्ती, वैराग्य केले सामराज्य । गुरुत्वासी लाज नाही आली ।

देवराया! कोणकोणत्या गोष्टींची आठवण करू? वळचणीचे पाणी आढय़ाला जावे तसे झालेल्या सद्गुरू गहिनीनाथांनी मला जे परमार्थ हृदगत् प्रचीतीला आणून दिले, त्याच गुह्यज्ञानाचे स्पष्टीकरण माझ्या ज्ञानदेवाने केले. तेच आत्मज्ञान सोपान, मुक्ताईने ग्रहण केले. अशा प्रकारे भावंडांची आठवण करीत सर्वजण सप्तशृंगी गडावर आले. निवृत्तीनाथ म्हणतात,

तुझ्यामुळे हरी चालतो उगला। देहा आधी गेला प्राण माझा।।

ज्येष्ठांचे आधी कनिष्ठांचे जाणे । केले नारायणे उफराटे ।।

असे अत्यंत व्याकूळ चित्ताने निवृत्तीनाथ सप्तशृंगीमातेच्या मंदिरात आले. श्रीअंबेचे स्तवन, पूजन केले. सप्तशृंगीस प्रदक्षिणा करून कीर्तन गजर करीत पंचवटीतील नाशिकक्षेत्री असलेल्या सुंदरनारायणाची स्तुती गाऊ लागले. नाशिकच्या गोदातीरी असलेल्या या मंदिरात सर्व दर्शनासाठी उतरले.

सुंदरनारायण गौरविला फार । केला नमस्कार वैष्णवांनी ।।

सर्व संतमंडळी निवृत्तीनाथांना समाधी देण्यासाठी त्र्यंबकेश्वरी दाखल झाली. प्रत्यक्ष पांडुरंगांनी स्वतः संतांचे पूजन केले.

गोदातीरी क्ष्रेत्र धन्य त्र्यंबकेश्वर । चालले भार वैष्णवांचे ।।

नंतर निवृत्तीनाथांनी श्रीविठ्ठलरायांची पूजा केली, पताकांच्या ध्वजा उभारल्या. पश्चिमेला अनादी अशा समाधीची शिळा समूळ उघडली. ही समाधी अनादी असून चिद्रत्नांनी हिची पूजा घडलेली आहे असे देव म्हणाले.

ज्या समाधीवर तुळशी-बेल, पुष्पे वाहिलेली आहेत अशी ही प्रथम पूजा ऋषीश्वरांनी पाहिली आहे. नारायण, विठा, गोंदा व महादा ही नामदेवांची चारही मुले समाधी स्वच्छ करण्याकरिता पुढे सरसावली. समाधीच्या सभोवती दीप प्रज्वलित असलेले पाहून जणू काय ही पूजा पूर्वीच केलेली असावी असे संतांना वाटले.

श्री निवृत्तीनाथांचा वियोग होणार म्हणून संतजन स्फुंदून रडू लागले. समाधीभोवती कुंकवाचे, केशराचे सडे घातले. सन्मुख पांडुरंगराय उभे असता निवृत्तीरायांनी देवदेवतांना वंदन सुरू केले. संत नामदेव म्हणतात,

निवृत्ती बैसले समाधी सुचित्त । चिन्मय ते ज्योत उजळली ।।

गजानन, सरस्वती, ब्रह्मा, विष्णू, दिगंबर, नवनाथादी सर्व देवदेवतांना वंदन करून झाल्यावर सर्व भक्तमंडळी समाधी काठावर बसली. समाधीची सर्व तयारी झाली. निवृत्तीनाथांनी पुन्हा एकदा सर्वांना वंदन केले. श्रीविठ्ठल चरणींचे तीर्थ घेतले. पताकांच्या छायेने समाधी आच्छादित झाली असता निवृत्तीनाथ खाली उतरले.

पताकांची छाया समाधीसी आली । उतरले खाली निवृत्ती देव ।।

पुंडलिक, पांडुरंग गेले बरोबरी। बैसले आसनावरी निवृत्तीराजा ।।

नामा म्हणे देवा काय पहावे आता। गेला पंढरीनाथा चिद्भानू तो।।

निवृत्तीनाथ शांतपणे समचित्ताने समाधीत बसले असता जणू काय त्या वेळेला योगयुक्त असा चिन्मय प्रकाश पसरला. पुंडलिकरायाने जेव्हा निवृत्तीनाथांच्या गळ्यात मिठी मारली तेव्हा सर्वांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. जेव्हा निवृत्तीनाथांनी डोळे झाकले तेव्हा पांडुरंगरायाचे हृदय भरून आले. पांडुरंगराय अशा उद्विग्न अवस्थेत असलेले पाहून पुंडलिकाने त्यांना बाहेर आणले. राहीरखुमाई मातांना गहिवरून आले. संतमहंत आक्रंदन करू लागले. सर्वांचे देहभान हरपले. समाधीला शिळा घालावी असे नामदेवांनी सांगताच पांडुरंगरायांनी समाधीची शिळा झाकली. ज्येष्ठ वद्य 13 शके 1218 (दि. 17 जून 1297).

त्र्यंबकेश्वरी श्रीनिवृत्तीनाथांच्या समाधीचा पाच दिवस महोत्सव करून अमावास्येस काला केला. हरी प्रतिपदेला बाहेर निघाले असता सर्वांनी कीर्तन गजर केला. काही ऋषी मंडळींनी त्र्यंबकेश्वरास वास्तव्य केले.

कांही ऋषीश्वर राहियेले तेथे। गेले ते बहुतेक अलंकापुरा।।

आदी, अनादी अत्यंत प्राचीन असे योगिराज हे तर गेले. तथापि त्यांच्या समाधी या भूतलावर राहिल्या आहेत. संत नामदेवराय म्हणतात,

नामा म्हणे देवा गेले मुनिजन। राहिले ते ज्ञान जगामाजी।।

कानाने वैराग्याच्या गोष्टी ऐकता येतात. मात्र निवृत्तीराजांसारखे विरक्त कोणी राहिले नाही. अनुभविक आणि युक्तिकुशल परमार्थ प्रतिपादन करणारी अशी ज्ञानदेवांची मूर्ती आता आढळणार नाही.

समाधीशी केली आऩरती पंचारती। राहिली निवृत्ती स्वरूपी तुझ्या।।

अशा प्रकारे शेवटच्या निवृत्तीनाथ समाधीच्या प्रसंगासंबंधी जे काही अल्पस्वल्प घडले ते आपणांस अर्पण केले. नामदेव महाराज म्हणतात, पांडुरंगरायांनीच मला समाधीवर्णने करण्याची स्फूर्ती दिली. समाधी महोत्सवाचा प्रसंग मी वर्णन करावा ही त्यांची इच्छा मी पूर्ण केली. या विरक्त थोर पुरुषांच्या समाधी म्हणजे जणू काय पापी लोकांना उद्धरणाऱ्या काशीसारखे पुण्यक्षेत्रेच आहेत. संत नामदेवराय म्हणतात,

समाधी श्रवण करिती निशीदिनी। त्यांसी चक्रपाणी देईल भेटी।।

नामा म्हणे हरी बोलिलो तुझ्या बळे। वाहिली तुळशीदळे स्वामीलागी।।

संत ज्ञानराज आपल्या सद्गुरूंबद्दल म्हणतात,

सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी । तेथे बुडी देई माझे मना ।।

संतश्रेष्ठ सद्गुरू श्री निवृत्तीनाथांना आपणही वंदन करू या !