
>>नामदेव सदावर्ते<<
संत निवृत्तीनाथांना त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीवर सद्गुरू श्री गहिनीनाथ यांचा अनुग्रह लाभला. त्यांच्या आज्ञेनुसार निवृत्ती यांनी ज्ञानदेव, सोपान व मुक्ताईस गुरुपदेश दिला. चारही भावंडांनी समाजाला ज्ञान, अद्वैत, समता या तत्त्वज्ञानाधिष्ठत सदाचार व आत्मज्ञान देणारी अभंग रचना प्रदान केली.
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई ही चार भावंडे आपल्या महाराष्ट्राच्या संतमाळेतील बहुमोल माणिकमोती आहेत. त्यांचे जीवनचरित्र अलौकिक आहे, जीवनकार्य अनमोल आहे. त्यांनी महाराष्ट्र सारस्वत समृद्ध करणारी अभंग, ग्रंथरचना केली आहे. महाराष्ट्राच्या पवित्र सांस्कृतिक सागरातील हे तेजस्वी दीपस्तंभ आहेत. या चारही भावंडांनी समाजात प्रेम, सहिष्णुता, समता शिकविणाऱ्या मानवता धर्माची स्थापना केली. स्वतः नामस्मरण, भक्तीचे सतत सदाचरण करीत इतरेजनांना भक्तिमार्गानुसार आचरण करण्यास मार्गदर्शन केले.
निवृत्तीनाथांना त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीवर सद्गुरू श्री गहिनीनाथ यांचा अनुग्रह लाभला. त्यांच्या आज्ञेनुसार निवृत्ती यांनी ज्ञानदेव, सोपान व मुक्ताईस गुरुपदेश दिला. चारही भावंडांनी समाजाला ज्ञान, अद्वैत, समता या तत्त्वज्ञानाधिष्ठत सदाचार व आत्मज्ञान देणारी अभंग रचना प्रदान केली. मराठी भाषेतील या सर्व अभंगरचना, ग्रंथरचना मराठी वाङ्मयाचे भूषण आहेत. ज्ञानदेवांनी भगवद्गीतेवर नऊ हजार बत्तीस ओव्यांचा ‘भावार्थदीपिका’ हा ग्रंथ लिहिला. ‘ज्ञानेश्वरी’ या नावाने तो प्रसिद्ध आहे.
श्री पांडुरंगभक्ती करीत सर्व भावंडांनी वारकरी संप्रदाय प्रवाहित केला. संत नामदेव या संप्रदायाचे प्रचारक झाले. ही चार भावंडे वारकरी संप्रदायात ईश्वरी अवतार मानली जातात. आपले थोरले बंधू व सद्गुरू अशा निवृत्तीनाथांवर ज्ञानदेव, सोपान व मुक्ताई यांची भक्ती, श्रद्धा होती. ते भावंडं ती भक्ती नम्रपणे अभंगरचनेतून प्रकट करतात. ज्ञानदेवांनी आपले सद्गुरुप्रेम, भक्ती ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथात ओवीबद्ध केली आहे. सद्गुरूंच्या आशीर्वादामुळेच आपण ग्रंथरचना केली आहे, असे ज्ञानराज नम्रपणे सांगतात.
ज्यांच्या कृपेमुळे मी संसारसमुद्रातून पैल पोहोचलो, ते सद्गुरू माझ्या हृदयमंदिरात वास्तव्य करीत आहेत. म्हणून तर विवेकावर माझा इतका लोभ आहे. हाती चिंतामणीरत्न आले की, सर्व कामना पूर्ण होतात तसे माझे सर्व मनोरथ श्रीगुरुकृपेमुळे पूर्ण झाले. श्रीकृष्ण अर्जुनाला जे म्हणाले, तेथपर्यंत माझी बुद्धी जात नाही, पण माझ्या हाती श्रीनिवृत्तीनाथांच्या कृपेचा दीप आहे. त्यामुळेच मी हे सर्व जाणण्यास समर्थ झालो आहे. अहो, जर सद्गुरूंची कृपा झाली तर मग काय अशक्य आहे! माझ्यावर सद्गुरूंची अपार कृपा आहे. त्या गुरुकृपा बळाने मी माझ्या मराठी बोलावाटे अरूप परमात्म्याचे रूप दाखवीन.
तें बुद्धीही आकळितां सांकडे ।
म्हणऊनि बोली विपाये सांपडे ।
परि श्रीनिवृत्तिकृपादीप उजियेडें । देखेन मी ।। 6.32
हे श्रीगुरू, आपल्याला माझा नमस्कार. शिष्याला बोध कसा करावा हे आपणापासून शिकावे. विद्यारूपी कमळाचा विकास आपल्या कृपेनेच होतो. आपला उदय होताच संसाररूप अंधार नष्ट होतो. हे गुरुदेवा, आपण जगाचे पालक आहात. कल्याणकारी रत्नांची आपण खाणच आहात. चित्तरूप चकोर पक्षी आपल्या दर्शनाने आनंदित होतो. ब्रह्मानंद साम्राज्याचे आपण राजे आहात. वेदांच्या अर्थाचे आपण सागर आहात. आपणांस पाहून विश्व मोहित होते.
हे सद्गुरू निवृत्तीनाथा, आपला अनुग्रह झाला की, लहान मूलही सगळ्या विद्यांत सहज पारंगत होते. आपल्या उदार वाणीकडून एकदा शिष्याला अभय मिळाले की, साहित्यातील नऊ रस त्याच्या दारी दासासारखे राबतात. आपल्या स्नेहरूप सरस्वतीने जर एखाद्या मुक्या माणसावर कृपा केली तर तोदेखील अगदी बृहस्पतींशी वाद खेळू शकतो. हे गुरुदेवा, आपली कृपादृष्टी सहज पडली, आपला अभयहस्त आपण मस्तकावर ठेवला की, त्या सामान्य जीवाची परमात्मा शिवाशी भेट होते. ज्ञानराज म्हणतात-
हे असो दिठी जयावरी झळके ।
कीं हा पद्मकरू माथा पारूखे ।
तो जीवचि परि तुके । महेशेंशी ।। 10.9
हे गुरुकृपादृष्टी माते, तुझ्या चरणाजवळ विद्येचे मळे फुलतात. तू साधकाची आई आहेस. तुझ्या सावलीत असलेला मी तुझी सावली सोडून जाणार नाही. तू ज्याच्यावर कृपा करतेस तिथे सगळ्या विद्या पिकतात. मी गीतेचा अर्थ सांगावा अशी मला आज्ञा कर.
हे माते, या मराठीच्या नगरीत ब्रह्मविद्येचा जयजयकार होऊ दे. साहित्यातील नवरसाचे समुद्र उसळू दे. अर्थरत्नाची आगरे पिकू दे. या मराठी भाषेच्या प्रांतात साहित्यरूपी सोन्याच्या खाणी उघडून दे. विवेकाच्या वेली चहू दिशांना फळूफुलू दे.
ज्ञानराज म्हणतात, माझ्यावर श्रीनिवृत्तीनाथांची कृपा आहे. श्रीगुरुप्रसादामुळे मी श्रीमंत झालो आहे. आता माझा विश्वात्मक गुरुराजा या वाङ्मयीन पूजेचा स्वीकार करो. असे जे ज्ञानरूपी महातेजस्वी सूर्य श्रीनिवृत्तीनाथ, त्यांना ज्ञानदेव वंदन करीत आहेत. भगवद्गीतारूपी गुप्तधन संस्कृत भाषेच्या कडीकुलुपातून सोडवून मराठी भाषेत मराठी जनतेच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘ज्ञानेश्वरी’ निर्माण झाली ती केवळ सद्गुरुकृपेमुळेच! हा ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ माझ्या गुरूंच्या कृपेचेच वैभव आहे. धर्मनिधान असे माझे गुरू निवृत्तीनाथांनी माझ्याकडून संस्कृत भाषारूपी कठीण किनारे फोडून मराठी शब्दरूप पायऱयांचा घाट बांधला. ज्ञानराज म्हणतात-
तैसे श्रीनिवृत्तिनाथांचे । गौरव आहे जी साचें ।
ग्रंथु नोहे हे कृपेचे । वैभव तिये ।।
























































