गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक काळ ऑर्गन आणि हार्मोनियम वादनात कार्यरत असणारा वादक कलावंत केदार भागवत.
मराठी संगीत रंगभूमीवर ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत मानापमान’, ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘गोरा पुंभार’ अशा अनेक नाटकांतून ऑर्गन हे महत्त्वाचे वाद्य वादन करणारा वादक कलावंत म्हणजे केदार भागवत. केदार तीन वर्षांचा असतानाची गोष्ट. त्याच्या आईला नाटय़ संगीताची आवड होती आणि बाबा उत्तम पेटी वादक होते. एकदा मामाच्या घरी नाटय़ संगीताचा रियाज चालू होता. त्यावेळी केदारने सहज म्हणून पेटीवर एका गाण्याची सुरावट वाजवली. त्याचे बाबा ‘‘पेटीला हात लावू नकोस’’ असे त्याला ओरडलेदेखील. त्याचे मामा गुरुनाथ बाव्रे यांनी केदारमधील कलागुण ओळखून तो पेटी उत्तम वाजवू शकेल याची खात्री दिली. केदारला त्याच्या मामाने अडीचशे रुपयांची पेटी आणून दिली आणि केदारचा वादक म्हणून प्रवास सुरू झाला. तो म्हणतो, ‘‘माझे पेटी वादनातील पहिले गुरू माझे बाबा. आई आणि मामा यांच्याकडूनही मी खूप शिकलो. सातत्याने गोविंदराव पटवर्धन यांचे हार्मोनियम वादन ऐकले आणि त्यातून मला खूप काही शिकायला मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी छबीलदास हायस्कूलमध्ये पेटीवादक म्हणून काही गाण्यांना साथ केली होती. 1997 सालापासून ते 2012 पर्यंत सुप्रसिद्ध गायक-कलाकार अजित कडकडे यांच्या कार्यक्रमांत मी पेटीवादक म्हणून सहभागी होत होतो.’’
गायिका नीलाक्षी पेंढारकर, शुभदा दादरकर, श्रीकांत दादरकर या सर्व मान्यवरांकडून केदारला खूप काही शिकता आले. नाटय़ संगीताची आवड केदारमध्ये निर्माण झाली. ‘संगीत सौभद्र’ नाटकाचा दौरा गोव्यामध्ये होता तेव्हा त्या दौऱयात पहिल्यांदा केदारने संपूर्ण नाटकासाठी ऑर्गन वाजवला होता. नंतर अरविंद पिळगावकर, रामदास कामत, रजनी जोशी अशा अनेक नामवंत गायक-गायिकांना केदारने पेटीवादनासाठी आणि नाटकात ऑर्गन वादनासाठी साथ केली. केदार म्हणतो, ‘अवघा रंग एक झाला’ या संगीत नाटकाचे मी जवळ जवळ 400 प्रयोग केले आहेत आणि सध्यासुद्धा हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आले आहे, त्यातही मी ऑर्गनची साथ करत आहे. जवळ जवळ दोन हजार नाटय़प्रयोगांमध्ये मी ऑर्गन वाजवला आहे.’’
मुंबई मराठी साहित्य संघाचा सर्वोत्कृष्ट ऑर्गन वादक पुरस्कार केदारला मिळाला आहे. पंडित उपेंद्र भट यांना दुबईमध्येदेखील केदारने वादक म्हणून साथ केली आहे.
शब्दांकन – गणेश आचवल