लेख – अनियंत्रित लोकसंख्या संसर्गवाढीला कारणीभूत

544

>> वैभव मोहन पाटील

कोरोनासारख्या अभूतपूर्व साथरोग परिस्थितीत प्रचंड संख्येने येणार्‍या रुग्णांना पुरेशा आरोग्य सुविधा पुरवण्यात मर्यादा येत आहेत. हॉस्पिटल, बेड, व्हेंटिलेटर रुग्णसंख्येच्या तुलनेत मर्यादित असल्याने उपलब्ध होत नाहीत ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. अर्थात, ही परिस्थिती अनियंत्रित लोकसंख्या वाढीमुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यातील लोकसंख्येचे दिसत असलेले उग्र रूप यावर कुठेतरी निर्बंध आणण्यासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्यक आहेत. व्यक्तिगत, कौटुंबिक व सामूहिक प्रयत्नांनी येणार्‍या काळात लोकसंख्यावाढीच्या भस्मासुरावर मात करण्याचा संकल्प आपण सर्वांनी आज करायला हवा.

कोरोनाचा हाहाकार थांबण्याचे नाव घेत नाहीये. जगात     रुग्णसंख्या एक कोटीच्यावर असून हिंदुस्थानात कोरोनाबाधितांची संख्या सुमारे 16 लाख इतकी आहे. मृत्यूचे आकडेदेखील चिंताजनक आहेत. कोरोनाचा संसर्ग एका व्यक्तीपासून इतरांना होतो. समूहात हा संसर्ग झपाटय़ाने पसरत असल्यामुळे सोशल गॅदरिंग टाळण्याचा उपाय यावर आखण्यात आला आहे. मात्र हिंदुस्थानसारख्या देशात अनियंत्रित लोकसंख्येमुळे सामाजिक अंतराचे नियम पाळणे किती जिकिरीचे ठरत आहे हे एव्हाना आपल्या लक्षात आलेलेच आहे. प्रचंड वाढत चाललेली लोकसंख्या तसेच शहरी भागात एकवटलेले त्याचे स्वरूप याची परिणती लोकसंख्येच्या दाट घनतेत झालेली आहे. त्यामुळे कोरोनासारखी महामारीची साथ अशा दाट लोकवस्तीच्या भागांत थोपवणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. ही परिस्थिती थोडय़ाफार फरकाने देशातील जवळपास सर्वच राज्यांची आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचे आकडे मोठेच आहेत. त्यात मुंबई, ठाणे, पुण्यासारखी दाट लोकवस्तीची शहरे आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात एकूण कोरोनाग्रस्त चार-साडेचार लाख असून दहा हजारांच्या वर या आजाराला बळी पडलेले आहेत. या आजारातून बरे होणाऱयांची संख्यादेखील लक्षणीय असल्याची बाब त्यातल्या त्यात दिलासादायक म्हणावी लागेल. मात्र इतक्या झपाटय़ाने आजाराचा प्रसार होण्यामागची कारणे तपासावीच लागतील. देश व जगभरातील तज्ञ व अभ्यासक कोरोनाच्या प्रसाराची निरनिराळी कारणे देत असले तरी देशातील अनियंत्रित रीतीने वाढत चाललेली लोकसंख्या हे संसर्गाचा वेग वाढण्यामागचे महत्त्वाचे कारण दिसून येत आहे.

सन 1950 साली जगाची लोकसंख्या केवळ 250 कोटींच्या घरात होती. आज केवळ हिंदुस्थानची लोकसंख्या 135 कोटी आहे, तर महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटींच्या घरात आहे. लोकसंख्या वाढ ही केवळ कोण्या देशाची वा प्रांताची समस्या नाही, तर संपूर्ण जगाची समस्या बनलेली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या उद्रेकाने व मानवी गरजांनी निर्माण केलेल्या अनैसर्गिक व तांत्रिक गोष्टींमुळे निसर्गाची भयंकर हानी होऊन निसर्गव्यवस्थेचा विस्फोट होण्याची भीतीदेखील वाढलेली आहे. यातून निरनिराळे जीवघेणे साथरोग पसरण्याचा धोका वाढू लागलेला आहे. हिंदुस्थानमधील झपाटय़ाने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी, महागाई आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू लागले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, देशाच्या प्रगतीला लोकसंख्यावाढ ही बाब अडसर ठरत आहे. कुटुंब कल्याण व कुटुंब नियोजन कार्यक्रमांच्या व्याप्तीमुळे लोकसंख्यावाढीच्या गतीला खीळ बसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये लोकसंख्येचे प्रमाण मर्यादित असले तरी वाढत्या शहरीकरणामुळे शहरी भागातील लोकसंख्यावाढीचा वाढता दर दखलपात्र ठरतो. लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमांमध्ये अधिक व्यापकता आणणे आवश्यक असून सर्व यंत्रणांसाठीच हे एक मोठे आव्हान आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून चीन ओळखला जातो. ज्याची लोकसंख्या जवळपास 138 कोटी आहे पण चीनलादेखील मागे टाकण्याच्या मार्गक्रमणात आपला देश आहे. ही हर्षाची नाही, तर गंभीर व विचारमंथनाची बाब आहे. वाढत असलेल्या लोकसंख्येला आवश्यक सुविधा व पूरक गोष्टी निर्माण करणे हेदेखील एक आव्हान असून येणार्‍या काळात मोठय़ा समस्येला तोंड द्यावे लागेल. यामुळे गरीब-श्रीमंतांमधील दरी वाढत चालली असून श्रीमंत हे अतिश्रीमंत तर गरीबांना दोन वेळचे जेवणदेखील दुरापास्त होत आहे.

लोकसंख्यावाढीचा फटका सर्वात जास्त सामान्यांनाच बसत असून वाढत असलेली लोकसंख्या केवळ गरीब व श्रीमंत यांच्यातच विभागली जात आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे एकीकडे गाडी, बंगला अशी ऐषोरामाची जीवनपद्धती तर दुसरीकडे दारिद्रय़, एक वेळची भूक भागविण्याची  धडपड असे आजचे चित्र दिसते. तेव्हा जनतेनेदेखील या बाबीचा अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कुटुंब नियोजनाचे नियम समाजातील सर्वच घटकांनी काटेकोरपणे पाळले पाहिजेत. येणार्‍या पिढय़ांना समाजात सुखाने व सन्मानाने जगायचे असेल तर लोकसंख्या नियंत्रणासाठी शासनाच्या प्रयत्नांना सर्वांनी साथ दिली पाहिजे.

लोकसंख्यावाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत असून याविषयी जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. लोकसंख्या ही समस्या उग्र रूप धारण करीत असल्याने विकासाला खीळ बसत आहे. उपलब्ध साधनसंपत्तीवर येत असलेल्या अतिरिक्त ताणामुळे लोकांना मूलभूत गरजा देतानाही कसरत करावी लागत आहे. मुलगाच हवा यासाठी तीन-चार अपत्यांना जन्म दिला जातो. अशिक्षितपणा असलेल्या कुटुंबात लोकसंख्यावाढीची बीजे दिसून येतात. हे रोखणे काळाची गरज आहे. आज मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी गर्दीने हद्दच ओलांडलेली आहे. जिकडे पहावे तिकडे नुसती माणसेच माणसे. रेल्वेसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचा नियमित वापर करणार्‍या लोकांना याची चांगलीच जाण आहे. ही परिस्थिती अचानक ओढवलेली नसून अनेक वर्षांपासून चालत आलेला लोकांमधील निष्काळजीपणा व अलिप्तवादी वृत्ती याला कारणीभूत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. कुटुंबकबिला वाढविण्यामध्ये व्यस्त असलेल्या आपल्या समाजाला जागृत करणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, विचारवंत, साहित्यिक, लेखक व विविध क्षेत्रांमध्ये नैपुण्यप्राप्त व्यक्ती खूप मोठी जबाबदारी पार पाडू शकतात. लोकसंख्यावाढ हा अत्यंत संवेदनशील विषय असून ती रोखण्यासाठी व्यक्तिगत जबाबदारी निश्चित करून कठोर नियम अमलात आणावे लागतील. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ही समस्या प्रकर्षाने जाणवू लागली आहे. वाढत्या लोकसंख्येला नागरी व आरोग्य सुविधा अपुर्‍या ठरताना दिसून येत आहे. कोरोनासारख्या अभूतपूर्व साथरोग परिस्थितीत प्रचंड संख्येने येणार्‍या रुग्णांना पुरेशा आरोग्य सुविधा पुरवण्यात मर्यादा निर्माण होत आहेत. हॉस्पिटल, बेड, व्हेंटिलेटर रुग्णसंख्येच्या तुलनेत मर्यादित असल्याने उपलब्ध होत नाहीत ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. अर्थात, ही परिस्थिती अनियंत्रित लोकसंख्या वाढीमुळे निर्माण झाली आहे.

त्यामुळे भविष्यातील लोकसंख्येचे दिसत असलेले उग्र रूप यावर कुठेतरी निर्बंध आणण्यासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्यक आहेत. व्यक्तिगत, कौटुंबिक व सामूहिक प्रयत्नांनी येणार्‍या काळात लोकसंख्यावाढीच्या भस्मासुरावर मात करण्याचा संकल्प आपण सर्वांनी आज करायला हवा, तरच येणार्‍या पिढ्या सन्मानाने, सुखाने व सुसह्यपणे जगू शकतील.

आपली प्रतिक्रिया द्या