लेख – षड्गुणसंपन्न पंढरीचा राया

>> नामदेव सदावर्ते

पंढरीच्या विठ्ठलाचे लडिवाळ भक्त संत नामदेवरायांनी श्रीविठ्ठलाचे व पंढरीचे माहात्म्य अभंगबद्ध केले आहे. बालपणापासूनच ते विठ्ठलाचे भक्त होते. बालपणी नामदेवांनी श्रीविठ्ठलास नैवेद्य समर्पिला, तो श्रीविठ्ठलांनी प्रत्यक्ष प्रकट होऊन खाल्ला. वारकरी संप्रदायाचा प्रचारक म्हणून श्रीनामदेवांच्या कार्याचा गौरव केला जातो. श्रीविठ्ठलमाहात्म्य, पंढरीमाहात्म्य व श्रीविठ्ठलाची स्तुती व भक्तवत्सलता या विषयांवर त्यांनी अभंगबद्ध रचना केली आहे.

पंढरीला सारे संत आपले माहेर मानतात, श्रीविठ्ठल पिता व रुक्मिणी माता मानतात. आषाढी व कार्तिकी एकादशीच्या दिवशी सारे वारकरी भक्तभाविक श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी व संसारातील सुखदुःख विठ्ठलास सांगण्यासाठी हरिनाम गात पंढरपूर येथे जातात. गोकुळाहून पांडुरंग पंढरीस आला.

पितयाची भक्ती पुंडलिके केली ।
मात हे ऐकिली देवराये ।।
नवलक्ष गोधनें पाचशे सवंगडे ।
रामकृष्ण पुढे चालताती ।।
उठा चला जावो पुंडलिक पाहो ।
देव म्हणे भावो पाहो त्याचा ।।

गोपाळकृष्ण वाळवंटात आला. तेथून पुढे चालताना एका घरात पुंडलिक दिसला. तो माता-पित्याची सेवा करीत होता. पुंडलिकाला चतुर्भुज रूपात देव दिसला. पुंडलिकाने देवाकडे वीट टाकली.

इटेवरी उभा राहिला विठ्ठल ।
ठसा मिरविला त्रिभुवनी ।।

पुंडलिकाच्या मातृ-पितृभक्तीवर प्रसन्न होऊन देव त्याला भेटावयास आला व त्यांनी दिलेल्या विटेवर उभा राहिला. निर्गुण देवरूपात प्रकट झाला. हा सगुण रूपातील विठ्ठल रोज नित्यनवा दिसतो.
भक्तांना जसा विठ्ठलाचा लळा आहे तसाच विठ्ठलासही भक्ताचे प्रेम आहे. देवाला भक्तांचे वेड व भक्तांना देवाची ओढ असते. संत नामदेव म्हणतात –

विटेवरी उभा दीनांचा कैवारी ।
भेटाया उभारी दोन्ही बाह्या ।।
गुणदोष याचे न पाहेचि डोळां ।
भेटे वेळोवेळी केशिराज ।।
ऐसा दयावंत घेत समाचार ।
लहान आणि थोर सांभाळितो ।।
सर्वांलागी देतो समान दरूशन ।
उभा तो आपण समपायी ।।
नामा म्हणे तया संतांची आवडी ।
भेटावया कडाडी उभाची असे ।।

श्रीविठ्ठलास भक्ताची आवड आहे. भक्तही त्याला भेटण्यासाठी, दर्शनासाठी, त्याला सुखदुःख सांगण्यासाठी आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपुरी जातात. भक्त भेटताच देवाला खूप आनंद होतो. श्रीविठ्ठलही भक्तांना गुज सांगतो…आषाढी-कार्तिकी एकादशीला या, मला विसरू नका. तुमच्या प्रेमभक्तीच्या आधाराने मी खरा पतितपावन ठरतो. तुम्ही मला भेटता आणि नंतर आपापल्या गावी जाता तेव्हा तुम्हाला निरोप देताना मला हुरहुर वाटते. संत नामदेव म्हणतात –

आषाढी कार्तिकी विसरू नका मज ।
सांगतसे गुज पांडुरंगा ।।
पतितपावन मी तो आहे खरा ।
तुमचेनि बरा दिसतसे ।।
तुम्ही जाता गावां हुरहुर माझे जीवा ।
भेटाल केधवा मजलागी ।।
धावोनिया देव गळा घाली मिठी ।
स्फुंदस्फुंदून गोष्टी बोलतसे ।।
तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी ।
म्हणे चक्रपाणि नामयासी ।।

श्रीविठ्ठल आणि भक्त एकरूप आहेत. निर्गुण, निराकार, निर्विकल्प असा हा देव सगुण साकार झाला आहे. पुंडलिकासाठी तो पंढरपुरी आला आहे. त्याचे मूळ गाव मायापूर आहे. कटीवर कर ठेवून तो विटेवर उभा आहे. याच्या भेटीसाठी एकच उपाय आहे.

विठ्ठल नाम हृदयी धरा । हाचि उतार पैलपारा ।।
मग नाही येरझारा । शंभू कुमरा सांगतसे ।।
भेटी चौघे मुरडले । अठरा धावता भागले ।।
पंथी साही भांडले । ते अद्यापि बुझले नाही ।।

तपस्वीयांचे तप, जप करणारांचे जाप्य. तेजस्वींचे तेज असे हे कुळदैवत आहे. पुंडलिकाच्या भाग्याने ते पंढरपुरी आले. संत नामदेवराय म्हणतात-

वेडावली वाचा वेदाची बोलतां ।
देवा पाहूं जाता अनिर्वाच्य ।।
अनिर्वाच्य वाचा बोलावया गेली ।
जिव्हा हे चिरली भूधराची ।।
भूधराची जिव्हा जालीसे कुंठित ।
नामा म्हणे अंत न लगे त्याचा ।।

श्रीविठ्ठलाचे माहात्म्य सांगताना नामदेवराय म्हणतात, वैकुंठामध्ये भगवंताचे चतुर्भुज रूप आहे. क्षीरसागरात देवाचे निद्रिस्त रूप आहे, द्वारकेत श्रीकृष्ण रूप आहे. हृदयी तर अव्यक्त रूप आहे, पण या सर्व रूपांपेक्षाही पंढरीचे विठ्ठलरूप सुंदर आहे. असे सुंदर रूप वैकुंठात, क्षीरसागरात, द्वारकेतही नाही. पंढरीतील विठ्ठलरूप आनंददायी व तेजस्वी आहे.
भगवंतांनी प्रथम पंढरीची निर्मिती केली व नंतर वैकुंठ निर्माण केले. सृष्टीची उत्पत्ती होण्यापूर्वीसुद्धा पंढरपूर हे तीर्थक्षेत्र होते. संत नामदेवराय वर्णन करतात-

चंद्रभागेच्या तटी । धन्य पंढरी गोमटी ।।
नासिलीया भूमंडळ । उरे पंढरी मंडळ ।।
असे सुदर्शनावरी । म्हणूनि अविनाश पंढरी ।।
नामा म्हणे बा श्रीहरी । ते म्यां देखिली पंढरी ।।

देव दाखवील असा गुरू कोठे नाही. कुठेही जा, प्रत्येक ठिकाणी देवाच्या जागी दगडाला शेंदूर लावलेला दिसेल. दगडाचा देव बोलत नाही. कोणत्याही काळात त्याला वाचा फुटणार नाही. देवदेव करून मी थकलो. देव तर माझ्या हृदयात आहे हे समजल्याने मी पांडुरंगाचे पाय सोडीत नाही.

संत नामदेव म्हणतात की, या पंढरीनाथाने भक्त प्रल्हादाचे अनेक संकटांतून रक्षण केले, ध्रुवाला अढळपद दिले. अशा भगवंताला पुंडलिकाने पंढरीस विटेवर उभे केले. या देवाने अनेक राक्षस ठार केले. सुरवरांचे रक्षण केले. अहिल्या, गजेंद्र यांचा उद्धार केला. अशा भगवंताला पुंडलिकाने विटेवर उभे केले. त्यामुळे विश्वातील जीवांचा उद्धार झाला आहे.

षड्गुणसंपन्न पंढरीच्या राया । आमुच्या स्वामिया केशिराजा।।
रामकृष्णहरी श्रीधरा मुकुंदा । सज्जनी स्वानंदा सर्वातीता ।।
गोविंदा गोपाळा गोपवेशधारी । गोवर्धन धरी नखावरी ।।
दुष्टदुर्जनांच्या दुखाविना चित्ता । पावन पतिता नामा म्हणे ।।

भगवंत सगुणसंपन्न तर आहेच, पण तो सहागुणसंपन्नही आहे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य हे सहा गुण ज्याच्या जवळ आहेत, त्यास भगवंत म्हणतात.

आपली प्रतिक्रिया द्या