
>> सीए अभिजित कुळकर्णी, योगशिक्षक, भारतीय योग मंदिर
आपण गरुडासनाची माहिती घेतलेली आहे. गरुडासनाच्या क्रियेच्या अगदी विपरीत म्हणजे उलटी क्रिया ही या पार्श्व नमन आसनामध्ये आहे. या आसनाचा मनावर आणि आपल्या आत्मविश्वासावर होणारा प्रभाव अन् परिणाम हा गरुडासनाइतकाच आहे.
आसनाचा विधी
सर्वप्रथम दोन्ही पाय जुळवून सरळ ताठ उभे राहावे. नंतर दोन्ही हात मागे नेऊन हाताचे तळवे जुळवून ठेवावेत. हाताची बोटे कमरेला लावावीत. नंतर हाताची बोटे वरच्या बाजूला वळवावीत आणि हात सावकाशपणे जितके होतील तितके वर आणावेत. नंतर आपल्या हाताचे कोपरे आणि खांदे जास्तीत जास्त मागे बघून ठेवावेत. डोळे बंद करावेत आणि ओमकाराचे उच्चारण करावं.
पार्श्व म्हणजे मागे, नमन म्हणजे नमस्कार. जो नमस्कार आपण आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे पुढील बाजूला करतो तोच या आसनामध्ये मागील बाजूला केला जातो. म्हणून या आसनाला पार्श्व नमनासन असे म्हणतात.
आसनाचे लाभ
हे आसन केल्याने छातीचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे छाती आणि खांद्यांचे स्नायू उन्नत होतात. पाठीच्या स्नायूवरती दबाव पडतो. त्यामुळे स्पाँडलायटिसचा त्रास कमी होऊ शकतो. पाठीच्या वरच्या मणक्यांना, स्नायूंना आणि छातीच्या स्नायूंना उत्तम व्यायाम देणारे हे आसन आहे. फुप्फुसांवरती चांगला प्रभाव पडून त्यांची क्षमता वाढते. फ्रोजन शोल्डर’चा त्रास होत नाही. गरुडासन आणि पार्श्व नमनासन ही दोन्ही आसने मानसिक स्वास्थ्यासाठी आणि आत्मविश्वासासाठी अतिशय लाभदायी आहेत. यांचा अभ्यास एकामागे एक करावा.
– www.bymyoga.in


























































