हत्तींचे जंगल

48

>> अनंत सोनवणे, [email protected]

पेरियारला हिंदुस्थानी हत्तींचं माहेरघर मानलं जातं. पश्चिम घाटातल्या शिवगिरी पर्वतातून उगम पावणारी पेरियार नदी या जंगलातून वाहते. असं म्हणतात की, शंभर वर्षांपूर्वी या जंगलात तीन हजार हत्ती होते.

बाल गणेशावर क्रोधित झालेल्या शंकराने त्याचं मुंडकं उडवल्यावर पार्वतीच्या आग्रहाखातर त्याला हत्तीचं शीर जोडलं, अशी कथा सांगितली जाते. या कथेच्या निमित्ताने तमाम भाविकांचा लाडका गणपती आणि वन्यजीव प्रेमींचा लाडका हत्ती यांचा जणू संगमच झाला! हत्ती हा प्राणी आकाराने महाकाय असल्याने त्याची जरा भीती वाटणं स्वाभाविक आहे, तरीही त्याच्या नुसत्या दर्शनाने त्याच्याबद्दल ममत्त्व दाटून येतं. त्याला जवळून पाहाण्यासाठी केरळमधल्या पेरियार राष्ट्रीय उद्यानाला नक्की भेट द्या.

पेरियारला हिंदुस्थानी हत्तींचं माहेरघर मानलं जातं.. असं म्हणतात की, शंभर वर्षांपूर्वी या जंगलात तीन हजार हत्ती होते. वाघांची संख्याही भरपूर होती. पण चोरटी शिकार, अतिक्रमण, बेफाम वृक्षतोड यामुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात येऊ लागलं. चहा मळ्यांचं अतिक्रमण थोपवण्यासाठी 1934 मध्ये त्रावणकोरच्या महाराजांनी या जंगलाला खासगी वन्य प्रकल्प म्हणून घोषित केलं. 1950 मध्ये त्याचं अभयारण्यात रूपांतर झालं. 1978 मध्ये व्याघ्र प्रकल्प, 1982 मध्ये राष्ट्रीय उद्यान, तर 1991 मध्ये हत्ती प्रकल्प असा या जंगलाचा प्रवास झाला आणि इथल्या जैवविविधतेचं जतन-संवर्धन झालं. पेरियार हा व्याघ्र प्रकल्प असला तरी क्वचित पाण्यावर आलेला वाघ इथं पाहायला मिळतो. पेरियार जलाशयातून बोटीने फेरी मारताना काठावर हिरवं गवत खाताना हत्तींचा कळप मात्र दिसू शकतो. हत्तीला पाण्याचं प्रचंड आकर्षण त्यामुळे पाण्यात डुंबणारे, सोंडेने पाण्याची कारंजी उडवणारे हत्ती पाहताना भान हरपून जाते. देह वजनदार असला तरी हत्ती अत्यंत उत्कृष्टपणे पोहतो. आसामच्या काझिरंगा अभयारण्यात मी 20-25 हत्तींचा कळप लीलया पोहून नदी पार करताना पाहिलाय. पेरियारमध्ये पूर्वी शंभर-शंभर हत्तींचे कळप पाहिल्याचं लोक सांगतात. हत्ती हा सामुदायिक जीवन जगणारा प्राणी आहे. कळपात सुळेवाले नर हत्ती, माद्या, तसेच पिले असतात. जाणती हत्तीण कळपाचे नेतृत्व करते. तिच्या आज्ञेनुसारच कळपाचं मार्गक्रमण होतं. संरक्षणाच्या हेतूने पिले नेहमी कळपाच्या मध्यभागी असतात.

हत्ती आणि वाघाव्यतिरिक्त पेरियारच्या जंगलात बिबटय़ाचाही अधिवास आहे. तसेच येथे रानगवे, रानकुत्रे, सांबर, भेकर, चितळ इत्यादी 35 प्रकारचे सस्तन प्राणी पाहायला मिळतात. पेरियार जलाशयात बोटीतून फिरताना मला पाणमांजरांचा खेळ पाहायला मिळाला. येथे दुर्मिळ लायन टेल्ड मकाक ही वानरेही आढळतात. या जंगलात वैशिष्टय़पूर्ण असे चार उडणारे जीव आढळतात- काळ्या-पिवळ्या रंगांचा उडता साप, पिवळा-केसरी रंगांचा उडता सरडा, पायाचे पडदे फैलावून झेपावणारा उडता बेडूक आणि एका झाडावरून दुसऱया झाडावर तरंगत जाणारी उडती खार!

पेरियारच्या जंगलात 260 पेक्षा अधिक प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. यात प्रामुख्याने मोठा धनेश, भृंगराज, मत्स्य घुबड, सोनपाठी सुतार, स्वर्गीय नर्तक आणि विविध प्रकारच्या बदकांचा समावेश होतो. सुमारे 200 इंच पाऊस पडणाऱया या परिसरात साग, देवदार, रोजवूड, टर्मेनेलिया इत्यादी 100 ते 130 फूट उंचीचे वृक्ष आढळतात. पावसाळ्यात रक्त शोषणाऱया जळवांचा उपद्रव असतो. या अतिसुंदर जंगलाला विविध समस्यांचा सामना करावा लागतोय. तरीही ती आपल्या उदरातली जैवविविधतेची वनसंपदा चिकाटीने टिकवून आहे.

पेरियार राष्ट्रीय उद्यान
प्रमुख आकर्षण – हत्ती, वाघ
जिल्हा – इडुक्की, कोट्टायम, पथानमथिट्टा
राज्य – केरळ
क्षेत्रफळ – 777 चौ.कि.मी., निर्मिती ः 1950
जवळचे रेल्वे स्थानक – कोट्टायम (114 कि.मी.)
जवळचा विमानतळ – कोची (120 कि.मी.)
निवास व्यवस्था – वन विभागाचे विश्रामगृह, खासगी हॉटेल्स
सर्वाधिक योग्य हंगाम – ऑक्टोबर ते मे
सुट्टीचा काळ – नाही
साप्ताहिक सुट्टीचा दिवस – नाही

आपली प्रतिक्रिया द्या