‘तरु’णाई – सोन्याचा पिंपळ

227

>> डॉ. सरिता विनय भावे

श्री ज्ञानेश्वरांची महती विशद करताना संत तुकारामांनी, प्रदक्षिणा घातल्यानंतर माऊलींच्या आई रुक्मिणीबाई यांचे भाग्य सोन्यासारखे झळाळून टाकणाऱ्या आणि माऊलींच्या समाधीसमोरच स्थान प्राप्त झालेल्या पिंपळवृक्षाला ‘जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ’ असे नावाजले आहे.

जेव्हा प्रत्यक्ष भगवंतच गीतेच्या 10 व्या अध्यायात (श्लोक 26), ‘अश्वत्थः सर्ववृक्षाणां…..’ अर्थात ‘सर्व वृक्षांमध्ये मी अश्वत्थ म्हणजे पिंपळ आहे’ असे म्हणतात तेव्हा हिंदुस्थानी जनमानसात हा वृक्ष एवढा पूजनीय का आहे हे लक्षात येते. ‘अश्वत्थ’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘पुढील क्षणात जो पूर्ववत राहत नाही (‘श्व’ – येणारा काळ, ‘त्थ’ – स्थिर असलेला) असा नवनवोन्मेषशाली’ हा आहे! म्हणूनच गीतेच्या 15 व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या श्लोकांत गतिमान, परिवर्तनशील विश्वाचे वर्णन करताना अश्वत्थ वृक्षाचे सार्थ रूपक योजिले आहे.

उखडलेल्या पाराचे, काजळी धरलेले आणि तेलकट झालेले, दिवा ठेवण्याचे खोबण असणारे, नियमित दिवा लावायला येणारी आजीबाई असलेले, एखाद्या सवाष्णीची व्याकुळ करणारी कथा असणारे, मुंजाच्या खऱयाखोटय़ा आख्यायिका असणारे पिंपळकट्टा नसलेले गाव हिंदुस्थानात विरळाच असेल. पिंपळाच्या मुळाशी प्रत्यक्ष ब्रह्मदेव, मध्यभागी श्री विष्णू आणि टोकावर शंभू महादेव विराजमान असतात, असे पुराणात सांगितले आहे. श्री विष्णू यांचा जन्म आणि श्रीकृष्ण यांचा मृत्यू पिंपळ वृक्षाखाली झाला होता असे मानले जाते. गौतम बुद्धांना ज्या वृक्षाखाली बसले असताना ज्ञानप्राप्ती झाली होती तो ‘बोधिवृक्ष’ पिंपळच होता.

हिंदुस्थानी संस्कृतीत धार्मिकतेची पाळेमुळे घट्ट रुजलेल्या पिंपळाचे वनस्पतिशास्त्र्ाातही Ficus religiosa असे यथार्थ नामकरण केले आहे. वड, उंबर यांच्या जातकुळीतील पिंपळाला पिप्पल, प्लक्ष, अश्वत्थ (संस्कृत), पीपल (हिंदी, उर्दू), पीपलम (तामीळ), पीपलमु (तेलुगू) आणि ‘अश्वत्थ’ शब्दाच्या विविध अपभ्रंशीत रुपांनी हिंदुस्थानात ओळखले जाते. इंग्रजीतही r Sacred fig tree, holy tree या नावांमुळे साधर्म्य राखले गेले आहे. आपल्या बिहार, हरयाणा आणि ओडिशा या राज्यांचा हा ‘राज्यवृक्ष’ आहे.

पिंपळाची पाने टोकदार, साधी, हृदयाकार असतात. कोमल आणि हलकी असल्याने त्यांची सतत चैतन्यमय सळसळ चालू असते! वादळी वाऱयात इतर झाडांच्या तुलनेत पिंपळ जास्तच पिसाटल्यासारखा डोलत असतो, त्यामुळे उगाच मनात घर करून राहतो. पिंपळाची खासियत म्हणजे शिशिराच्या पानगळतीनंतर वसंतागमनावेळी त्याचे नवजात बालकाच्या त्वचेसारख्या तांबूस-गुलाबी, मुलायम, तुकतुकीत, कोवळ्या पानांनी बहरून येणे! इतर वेळी भव्यतेमुळे कठोर भासणारा हा वृक्ष अशावेळी अगदी ‘बाल-पिंपळ’ म्हणावा असा लोभस दिसतो! पिंपळाच्या पानांबद्दलची आपली बालपणची आठवण म्हणजे पुस्तक/वहीत दडवून ठेवलेल्या पानाची जाळी करण्याचा अट्टहास….जीवाला लागलेली ती हुरहूर….! झटपट ‘रिझल्ट’ साठी पाने काही दिवस पाण्यात बुडवून ठेवावी म्हणजे त्यातील हरितद्रव्य लवकर निघून जाते आणि जाळीदार नक्षीची, विलोभनीय कलाकृती असलेले पान मनाला अगदी खूश करून टाकते! असंख्य पक्षी-प्राणी यांचा पोशिंदा, आधारस्तंभ असणाऱया, वातावरण शुद्ध ठेवणाऱया, अतिशय शीतल छाया प्रदान करणाऱया या दीर्घायू, डेरेदार वृक्षाला आयुर्वेदातही रक्तशुद्धीकारक, उदरविकार आणि दम्यावर उपयोगी असल्याने महत्त्वाचे स्थान आहे. श्री ज्ञानेश्वरांची महती विशद करताना संत तुकारामांनी, प्रदक्षिणा घातल्यानंतर माऊलींच्या आई रुक्मिणीबाई यांचे भाग्य सोन्यासारखे झळाळून टाकणाऱया आणि माऊलींच्या समाधीसमोरच स्थान प्राप्त झालेल्या पिंपळवृक्षाला ‘जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ’ असे नावाजले आहे. ‘…..जगण्यावर शतदा प्रेम करावे….’ असे म्हणणारा कवीही ‘इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे’ असा नतमस्तक होतो. संत, लेखक, कवी, शास्त्र्ाज्ञ सगळ्यांना सारखेच आकृष्ट करणाऱ्या; भगवंताच्या आरंभ आणि अंताचा साक्षीदार असणाऱया या वृक्षाचे हिंदुस्थानी संस्कृतीत शतकानुशतके असलेले आध्यात्मिक महत्त्व म्हणूनच वादातीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या