प्रासंगिक – महालय अर्थात पितृपक्ष 

366

>> अमोल करकरे

यंदा 14 सप्टेंबरपासून महालय आरंभ झाला. पितरांना दिलेले त्यांना लवकर प्राप्त व्हावे म्हणून सूर्याचे पृथ्वीच्या सर्वात जवळचे अंतर असलेला काळ हा महालयासाठी योग्य ठरविला आहे. चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही, पण सूर्याची सुषुम्ना नावाची राशी चंद्रमंडलाला प्रकाशित करते. अमावास्येला सूर्यमंडलाजवळ चंद्रमंडल येत असते म्हणूनच सर्वपित्री अमावास्या पितरांसाठी योग्य ठरविली गेली आहे. पितर वायुरूपाने आपल्या वंशाच्या जवळ येतात तोच हा काळ आहे. या श्राद्धात केवळ आपले पितरच असतात असे नाही, तर धर्मपिंड या व्यवस्थेनुसार दोन्ही कुलातील जन्मांतरीचे दास, पोष्य, आश्रित किंवा सेवक, तसेच मित्र-मैत्रिणी, सहवासात आलेले पशू, झाडे, दृष्ट स्वरूपात-स्पर्श स्वरूपात आलेले निरनिराळे उपकार केलेले, अन्य जन्मामध्ये जे आपल्याबरोबर होते त्यांचासुद्धा यात शास्त्राने समावेश केलेला आहे. इतकेच नाही तर पितृकुल-मातृकुलामधील समस्त व्यक्ती, गुरू, श्वशूर, बंधू आणि त्यांचे आप्तसंबंधी किंवा ज्या गेलेल्या व्यक्ती अविवाहित किंवा निपुत्रिक असतील, जे जन्मांध पांगळे असतील त्यांचा आणि अन्य ज्ञात-अज्ञात मंडळींचाही श्राद्धात आदरपूर्वक विचारविनिमय नक्कीच पाहावयास मिळतो. त्याही पुढे वनात किंवा कुंभीपाक नरकात गेलेल्यांचाही विचार केलेला आहे. म्हणजेच पूर्वजांनी ही व्यवस्था किती दूरदृष्टीने केलेली आहे. ज्यांनी आपल्या पोषणासाठी कष्ट घेतले, काळजी घेतली, विज्ञान क्षेत्रात अनंत प्रकारचे कष्ट सोसून सुखसाधने निर्माण केली त्यांचे या स्वरूपात आभार मानणे आपले कर्तव्यच ठरते. ज्या पशूंनी म्हैस, बैल, घोडा, कुत्रा वगैरे आपल्या जीवनाला उन्नती दिली त्यांना विसरणे कितपत योग्य आहे? म्हणूनच सर्वांचे ऋण फेडण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही व्यवस्था पितरांसाठीचा नक्कीच मुक्तीचा मार्ग ठरेल.

आपली प्रतिक्रिया द्या