50 वर्षांचा सदाबहार राक्षस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> क्षितिज झारापकर, [email protected]

‘निम्मा शिम्मा राक्षस’ 50 वर्षांपूर्वीचं सदाबहार बालनाटय़ केवळ लहानांचेच नव्हे तर मोठय़ांचेही मन जिंकून घेत आहे.

गेल्या वर्षी झी मराठीने मराठी व्यावसायिक नाटय़ निर्मात्यांना एक वेगळी दिशा दाखवली. ‘अलबत्या गलबत्या’ या बालनाटय़ाच्या निर्मितीला मोलाचा हातभार लावून थक्क करणारं बालनाटय़ रंगभूमीवर आणलं गेलं. आज जिथे व्यावसायिक मराठी नाटक आपल्या दिवाणखान्याच्या हट्टापायी आपली प्रेक्षकांना थक्क करण्याची शक्ती गमवू पाहतंय तिथे ‘अलबत्या गलबत्या’चं अद्भुत व्यावसायिक गणित सुखावणारं होतं. साहजिकच मग त्या नाटकाचे निर्माते राहुल भंडारे आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर हे त्याची पुनरावृत्ती घडवायला पुढे सरसावले. रत्नाकर मतकरी या बालनाटय़ांच्या बादशहाचं आणखी एक बालनाटय़ रंगभूमीवर आणण्याचं त्यांनी योजलं आणि आधीच्या नाटकातल्या चेटकिणीला जुळा भाऊ जन्माला घालायचं ठरवलं. ‘निम्मा शिम्मा राक्षस’ हा तो जुळा भाऊ. आगपेटीतल्या चमत्कारांपेक्षा बाटलीतून निघालेला राक्षस जास्त करामती ठरतो का ही परीक्षा होती. आज आपण या बाटलीतून निघालेल्या राक्षसाला भेटणार आहोत.

‘निम्मा शिम्मा राक्षस’ हे खरं तर रत्नाकर मतकरींचं अल्लाऊद्दीनच्या कथेचं व्हर्जन आहे असं म्हणायला हरकत नाही, पण व्हर्जन करताना मतकरी इथे ओरिजनलच्या पलीकडे जाऊन मूल्य देतात आणि बालनाटय़ म्हणून ‘निम्मा शिम्मा राक्षस’ अल्लाऊद्दीनपेक्षा पोषक आणि पूरक करून टाकतात. इथला राक्षस बाल्यावस्थेत आहे. तो पूर्ण वाढण्याआधीच त्याला बाटलीत कोंडलं गेलं. म्हणून तो निम्मा शिम्मा आहे. अब्दुल्ला त्याला बाटलीतून बाहेर काढतो आणि समजतं की तो निम्मा शिम्मा असल्याने अर्ध्याच इच्छा पूर्ण करू शकतो. मग आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी हुशारी आणि विचार करण्याची गरज आली आणि इथे रत्नाकर मतकरी ओरिजनलला मागे टाकून खूप पुढे निघून जातात. चमत्कारी शक्तीच्या मदतीने आपल्या इच्छाआकांक्षा पूर्ण करतानाही स्वतःची हुशारी आणि विचार महत्त्वाचा असतो अन्यथा फजिती होते हा थॉटच कमालीचा परिपूर्ण आहे. एकदा का नाटकाचं गमक गवसलं की मतकरींसारखे सिद्धहस्त नाटककार मग त्यात राजकन्या, राजा, राजाचे सैनिक, जादुगार अणि अन्य सुसंगत पात्र रचून निम्मा शिम्मा राक्षस आपल्यासमोर मांडतात आणि आपण त्यात हरवून जातो. इतकं सगळं असलं तरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण विसरता कामा नये. ‘निम्मा शिम्मा राक्षस’ हे नाटक तब्बल पन्नास वर्षे जुनं आहे. ते आताच्या मुलांना भुरळ घालेलच हे गृहीत धरून चालणार नाही. इथे दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर महत्त्वाचा ठरतो.

चिन्मय (या नाटकात तो स्वतःला चिन्या मांडलेकर म्हणवतो म्हणून इथे एकेरी उल्लेख केलाय) ‘निम्मा शिम्मा राक्षस’ लिखाणात तसंच ठेवून ते दृष्यात्मकरीत्या आजचं करण्याकडे वळला आहे आणि इथे तो जिंकलाय. आजची मराठी बाला पिढी ही फेसबुक, यूटय़ूबवरून जगातील सर्वश्रेष्ठ तंत्रज्ञानाचा सहाय्याने जगणारी पिढी आहे हे चिन्मय मांडलेकरने अचूक ओळखलंय. त्यांना जर मराठी नाटकांमध्ये अडकवायचं असेल तर मराठी नाटकाला या तंत्रज्ञानाची मदत घ्यावीच लागणार आहे हे सत्य त्याने पत्करलेलं आहे. आपल्याला न कळणारं तंत्रज्ञान वापरणं म्हणजे नाटकात गिमिक्स करून नाटक बाटवणं या कर्मठ आणि अनाकलनीय विचारसरणीत न अडकता चिन्मय मांडलेकरने ‘निम्मा शिम्मा राक्षस’ नेत्रदीपक केल्याबद्दल सर्वप्रथम त्याचं मनापासून अभिनंदन. ‘निम्मा शिम्मा राक्षस’  पडदा उघडल्यापासून आपल्याला स्तब्ध करून टाकतं. एकाच प्रोजेक्टरमधून पिक्चर मॅपिंग करून दोन लेव्हलवरची इमेजरी पाहून प्रेक्षक अचंबित होण्यावाचून राहूच शकत नाहीत. नेमक्या वेळेला रंगमंचावरील नदीत थेंब पडणे भन्नाट इम्पॅक्ट साधून जातं. यात संदेश बेंद्रे या नेपथ्यकाराचं विशेष कौतुक करायला हवं. मध्यभागी पडदा असून त्यावर कॉम्प्युटर जनरेटेड इमेज आहे हे भान ठेवून त्याने रचलेला नाटकाचा देखावा कमाल आहे. आता ‘निम्मा शिम्मा राक्षस’ पेलण्याची जबाबदारी येते ती कलाकारांवर.

अब्दुल्ला हा बाल प्रेक्षकांचा दोस्त व्हायला हवा ही ‘निम्मा शिम्मा राक्षस’ची गरज आहे हे ओळखून इथे मयुरेश पेमची पात्र योजना चपखल आहे. मयुरेश डान्सर उत्तमच नव्हे तर प्रशिक्षित आहे. त्यामुळे नाटकाच्या सुरुवातीलाच तो बाल रसिकांना काबीज करतो. या नाटकातल्या राक्षसावर पण बाल प्रेक्षकांनी प्रेम करणं गरजेचं आहे. इथे अंकुर वाढवे प्रकट होताच ते साध्य करतो. लोकनाटय़ाचा आणि स्पर्धेतील नाटकांचा अंकुरचा जबरदस्त अनुभव इथे त्याच्या कामी येतो. अंकुर वाढवे मूर्तिमंत ‘निम्मा शिम्मा राक्षस’ उभा करतो. नितीन जंगम याने हसन अत्यंत सहजतेने साकारला आहे तसेच अमृता कुलकर्णीची हसीनादेखील खूप सहज झाली आहे. अभिजीत भोसले यांनी सुलतान रुबाबदार केलाय. विकास चव्हाण याने त्याच्या सगळ्या बहुरंगी भूमिका ताकदीने वठवल्या आहेत. गायत्री दातार हिची राजकन्या लोभसवाणी आणि सुंदर आहे. गायत्रीचा वावर कमालीचा सहज जाणवतो. अरेबियन राजकन्येच्या पोषाखात हे साध्य करण्याचं कठीण काम गायत्रीने केलेलं आहे. अब्दुल्लाच्या दाढीवाल्या आईचं पात्र रंगवणारा गणेश पवार या नाटकात एक अवलिया कलाकार आहे. त्याचं भन्नाट टायमिंग नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर नेतं. अद्वैत थिएटर्सच्या राहुल भंडारे आणि चिन्मय मांडलेकर यांनी आपल्या आधीच्या नाटकाच्या दोन पावलं पुढे जाऊन एक जबरदस्त बालनाटय़ मराठी रंगभूमीवर आणल्याबद्दल त्यांचे धन्यवाद!

नाटक     –   निम्मा शिम्मा राक्षस

निर्मिती   –  अद्वैत थिएटर्स

सहनिर्मिती – बुक माय शो

निर्माते     – राहुल भंडारे

लेखक  –      रत्नाकर मतकरी

प्रकाश योजना    –       आनंद केकान

नेपथ्य    –     संदेश बेंद्रे

संगीत      –   मयुरेश माडगावकर

गायक     –    जसराज जोशी

नृत्य        –    कुंदन अहिरे

वेशभूषा   –    मेघा जकाते

रंगभूषा  –     उल्लेश खंदारे

सूत्रधार   –    गोटय़ा सावंत

गीत व दिग्दर्शन – चिन्मय मांडलेकर

कलाकार – मयुरेश पेम, अंकुर वाढवे, विकास चव्हाण, नितीन जंगम, अभिजित भोसले, अमृता कुलकर्णी, गायत्री दातार

n दर्जा