
>> अरुण जोशी
हिंदी सिनेसृष्टीत गाजलेल्या बहुतेक कलाकारांना देशभर ‘गाजण्यासाठी’ चित्रपटांचीही राजधानी असलेल्या मुंबईत यावं लागलं. व्ही. शांताराम, वसंत देसाई, सी. रामचंद्र, दत्ता डावजेकर असे संगीतकार आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंब यांचा हिंदी सिनेसृष्टीवर खूप पगडा होता. सुधीर फडके यांनीही पूर्वी हिंदी चित्रपटांना संगीत दिलं होतं. मुंबईत प्रो. देवधर, पं. भातखंडे यांच्यासारखे संगीताचे जाणकार होते. विष्णू दिगंबर पळुसकर यांचं गांधर्व संगीत विद्यालय होतं. अनेक वादक कलाकारही मुंबईत होते. त्यामुळे हिंदुस्थानातून सिनेकलाकार आणि गायक-गायिकांचा ओघ उत्कर्षासाठी अर्थातच मुंबईकडे लागला.
ज्या काळात पार्श्वगायन सिनेमात यायचं होतं तो ‘आलम आरा’पासूनचा काही काळ ‘धूप छांव’ चित्रपटात आर. सी. बोराल या संगीतकाराने ‘पार्श्वगायना’चा प्रयोग केला. कालांतराने साधारण 1940 च्या दशकात अनेक चित्रपटांतील नायक-नायिकांना ‘उसना’ आवाज मिळू लागला. उत्तम अभिनेत्यांना उत्तम गाता येईलच असं नाही, पण एखाद्या नायक-नायिकेला साजेसा स्वर पार्श्वगायनाच्या स्वरूपात मिळाला तर दुधात साखर. लतादीदींनी सुमारे पाऊणशे वर्षं आपला स्वर अनेक अभिनेत्रींना दिला. पुलंच्या भाषेत त्यांच्या नायिका दीदींच्या गाण्याच्या ‘पार्श्वनायिका’ वाटतात इतका तो स्वर प्रभावी ठरला.
चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळात नायक-नायिकांनी (जमेल तसं) गाणं गायिलं. त्याचप्रमाणे गायक-गायिकांनीही पडद्यावर अभिनय करण्याचा प्रयत्न केला. तलत मेहमूद, मुकेश यांना तर अभिनेताच व्हायचं होतं, पण लवकरच त्यांना त्यांचं सांगीतिक जीवनध्येय गवसलं आणि ही मंडळी हिंदी सिनेसंगीतात अमर झाली.
येत्या 22 तारखेला ‘राज कपूरचा आवाज’ असं म्हटल्या गेलेल्या मुकेश यांची जयंती. जुलै 1923 ते ऑगस्ट 1976 एवढं केवळ त्रेपन्न वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं, पण त्यांचा स्वर आजही तरुण पिढीला मोहित करतो.
मुकेशचंद्र माथुर हे त्यांचं मूळ नाव. त्यांचा जन्म दिल्ली येथे झाला. कालांतराने माथुर कुटुंब मुंबईत आलं. गाण्याचं शिक्षणही मुकेश यांनी इथेच घेतलं. अभिनेते मोतीलाल यांनी या तरुणाचं गाणं ऐकलं आणि मुकेशनं 1945 मध्ये ‘दिल जलता है तो जलने दे, आसूं न बहा, फरयाद न कर’ हे अगदी कुंदनलाल सैगल यांचं वाटावं असं गाणं सादर केलं. चित्रपटाचे नायक मोतीलाल होते. हे गाणं रसिकांच्या पसंतीला उतरलं, कारण सैगलचा प्रभाव त्या काळच्या बहुतेक गायकांवर होता. ‘पहिली नजर’ चित्रपटातल्या या गाण्याने मुकेश यांना पार्श्वगायक केलं ते कायमचं. खरं तर अभिनेता होण्याचीच त्यांची इच्छा होती. ‘निर्दोष’ चित्रपटात त्यांनी कामही केलं होतं. त्यानंतर ‘यहुदी’ चित्रपटातल्या ‘ये मेरा दिवानापन है’ या दिलीपकुमार यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. त्या काळात ग्रामोफोनवर किंवा ‘ज्युक बॉक्स’मधून रसिकांनी ते गाणं अवीट ओढीने ऐकलं. त्या चित्रपटातलं सोहराब मोदींचं कामही इतपं गाजलं की त्यांचे ‘डायलॉग’ रसिकांना पाठ झाले.
पुढच्या काळात अनेक गायकांना मुकेशच्या आवाजाने साथ दिली. राजेश खन्नाच्या ‘आनंद’मधलं ‘कही दूर जब दिन ढल जाये’ आठवा, परंतु मुकेशचा आवाज सर्वाधिक चपखल कोणाला शोभला असेल तो केवळ राज कपूरला. स्वतः राज कपूर ‘मुकेशचा आवाज म्हणजे माझा आत्मा’ असं म्हणत असत. 1959 मध्ये राज कपूरचा ‘अनाडी’ चित्रपट आला. त्यातल्या ‘सबकुछ सीखा हमने ना सीखी होशियारी’ या गाण्याने कहर केला आणि राज कपूरचं गाणं म्हणजे मुकेशचं हे समीकरण मुकेश यांच्या निधनापर्यंत अद्वैत होऊन राहिलं.
राज कपूरचा आर. के. स्टुडिओ मुंबईत होता. राजच्या चित्रपटात मराठी कॅरॅक्टर्सही असत. शिवाय अवतीभवती बरेच मराठी संगीतकारही होते, पण मुकेशना मराठी गाणी मिळालेली दिसत नाहीत. याला एकमेव अपवाद म्हणजे ‘सप्तपदी’ या चित्रपटातलं ‘एकदा येऊन जा, तू एकदा येऊन जा, मी तुझा नव्हतो कुणी हे एकदा सांगून जा’ हे खास मुकेश स्टाइलचं, विराणीचं गाणं त्यांनी गायिलंय. गीतकार आहेत मधुसूदन कालेलकर आणि संगीत आहे गजानन शिर्के आणि द्वारकानाथ भोसले. गाण्याच्या रेकॉर्डवर त्यांची नावं ‘गजानन-द्वारकानाथ’ अशी आढळतात.
मिलनाचे चित्र होते अंतरी मी राखिले
मी तुझ्या-माझ्यात होते विश्व सारे देखिले
आज सीमा त्या जगाची तूच ओलांडून जा…
असं या गाण्याचं पहिलं कडवं. कधीकाळी ऐकल्याचं आठवतं असेल तर पहा. नाहीतर नेटवरून ऐका.
मुकेश यांचं निदान मला ठाऊक असलेलं एकमेव गाणं. आणखी असली तर कुणी कळवावं. अनेक चित्रपटांतील गाण्यांसाठी त्यांचा फिल्मफेअर अॅवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला. राज कपूरच्याच ‘तिसरी कसम’साठी मुकेश यांचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून सन्मान झाला होता.
1976 मध्ये अमेरिकेत कार्यक्रमासाठी गेले असताना मिशिगन राज्यातील डेट्रॉइट येथे त्यांचा हृदयविकाराने आकस्मिक अंत झाला आणि अवघ्या देशाला धक्का बसला. त्यांच्या शेकडो गीतांचे स्वर कायम रसिकमनात राहतील. त्यांनी आणखी मराठी गाणी गायला हवी होती असं मात्र वाटतं.

































































