लेख – सोलापूरचा ‘सावळा विठ्ठल’

>> शरदकुमार एकबोटे

सोलापूरचे सुप्रसिद्ध कवी रा. ना. पवार यांची जन्मशताब्दी आजपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त…

आपल्या काव्यप्रतिभेनं महाराष्ट्राला मुग्ध करणाऱया कविराय रा. ना. पवार यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. सुदैवाने मला त्यांच्या सहवासातील काही क्षणांना ‘साक्ष’ होण्याची संधी मिळाली. अनेकदा आमच्या भेटी झाल्या. कवी संजीव, कवी दत्ता हलसगीकर, प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुख, डॉ. निर्मलकुमार फडकुले, प्रा. चंद्रभूषण कुलश्रेष्ठ, कवी रा. श्री. पंचवाघ, कवी डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली, प्रा. श्रीराम पुजारी अशी कितीतरी साहित्य क्षेत्रातील मंडळी ‘रा. नां.’च्या दरबारातील मैफली झुलवत राहिले. त्यांच्यात वादसंवाद रंगले, साहित्य सजले.

रा. ना. पवारांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपला कवीबाणा आणि स्वाभिमान जपला, तडजोड मान्य केली नाही. विनम्र शालीनता, जगण्यातला साधेपणा, परंतु करारी स्वभाव अढळ ठेवला.

‘भाऊबीज’ या गाजलेल्या मराठी चित्रपटातील ‘सोनियाच्या ताटी…’ ही रचना कवी संजीव यांची असताना ध्वनिमुद्रिकेवर (78 एल.पी.) कवी योगेश यांचे नाव होते. ती चूक कवी रा. ना. पवार यांच्या लक्षात आल्यावर ते या वादात कवी संजीव यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. खरं तर या काळात या दोन कवींचे तात्त्विक मतभेद होते. पुढे चित्रपट संगीताचे अभ्यासक सुनील देशपांडे, मोहन सोहोनी, जयंत राळेरासकर, मुंबईचे चांदवणकर यांनी शोध घेतला आणि कवी संजीव यांना न्याय मिळाला. यातून ‘रा.नां.’चे मोठेपण अधोरेखित होते.

ज्योत्स्ना भोळे या सुप्रसिद्ध गायिकेने ‘‘देवा बोला हो माझ्याशी!’’ हे रा. ना. पवार यांचे गीत रसिकप्रिय करून सोडले. मृत्युशय्येवर असलेल्या एका स्त्री रुग्णाला हे गीत ऐकण्याची अखेरची इच्छा होती. त्यासाठी भोळे यांना रुग्णालयात जाऊन गीत पेश करावं लागलं. तेव्हा त्या पेशंटने उद्गार काढले-

‘‘आता मी सुखाने प्राण सोडायला मुक्त झाले!’’

पुण्याच्या भरतनाटय़ मंदिरमध्ये कवीराय ‘रामजोशी’ हे संगीत नाटक सादर झालं. प्रयोगाला पु. ल. देशपांडे हजर होते. प्रयोग पाहून ते प्रसन्न झाले आणि ‘रा.नां.’ची भेट झाल्यावर म्हणाले,‘‘कवीराय आम्ही तिकीट काढून आपला ‘रामजोशी’ पाहिला. ‘मानापमान’नंतर एवढा प्रसन्न शृंगार तुमच्या ‘रामजोशी’ने दाखवला. प्रयोग मस्त रंगतो- अभिनंदन!’’ सुमन कल्याणपूरकर यांनी गायलेले आणि गाजलेलं पहिलं गाणं – ‘‘सावळय़ा विठ्ठला, तुझ्या दारी आले!’’ या रचनेने ग. दि. माडगूळकर प्रभावित झाले होते. ‘राम राम पावनं’ या मराठी चित्रपटासाठी रा. ना. पवार यांनी गीते लिहावीत आणि लता मंगेशकरांनी ती सादर करावीत असे प्रयत्न दिग्दर्शक गणेश मसुते यांनी केले होते. पण ‘कोलंबिया’ कंपनी आणि रा. ना. पवार यांच्यातील मतभेदामुळे ही संधी हुकली. कारण पवार यांना तडजोड मान्य नव्हती. प्रा. विजया जोशी या अमेरिकेत शिकागो येथे मराठीच्या प्रोफेसर म्हणून काम पाहत होत्या. तेव्हा लुई हॉलमध्ये हॉलीवीन पार्टीत विद्यार्थ्यांनी ‘‘सावळय़ा विठ्ठला तुझ्या दारी आले’’ हा अभंग पेश केला. तेव्हा सारा हॉल भारावून गेला होता. फिशपॉण्ड, ड्रिंक्स जोक, डान्सिंग व्हरायटी प्रोग्रॅम, बुफे डिनर यापेक्षा हा अभंग अविस्मरणीय ठरला. ही आठवण ‘स्त्री’ मासिकाच्या 1979 साली प्रसिद्ध झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या