लेख – निळ्या आकाशाखाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

खूप दिवसांनी की वर्षांनी आकाश भर दिवसा निळंशार दिसू लागलं. चैत्राबरोबर फुटलेली पालवी आणि फुलांचे ताटवे धूळमुक्त झाल्यामुळे अधिक टवटवीत दिसू लागले. प्रदूषणात घुसमटलेला आकाशाचा ‘ग्लोबल’ घुमट स्वच्छ दिसू लागला. कोकिळकूजन तर या काळात कानी पडतंच पण मुंबईसारख्या महानगरातही वेगवेगळे छोटे पक्षी चिवचिवाट करू लागले. मुंबई बेटाला वेढणार्‍या समुद्राची निळाई बर्‍याच काळाने परतली. तिथे फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे येऊ लागले. कुठे सागरकिनारी डॉल्फिनही दिसले म्हणतात.

तिकडे देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचं प्रदूषण तर जगजाहीर आहे. पंजाब-हरियाणामध्ये शेतातील कचर्‍याची होळी पेटली की दिल्ली धुराने भरते आणि एरवीही तिथलं ‘इंडिया गेट’ दुधी काचेतून पहावं तसं धुक्याच्या नव्हे धुरक्याच्या (स्मॉग) पडद्याआड दडलेलं दिसतं. आता हा सगळा भाग किती स्पष्ट आणि सुंदर दिसतोय याची छायाचित्रं प्रसिद्ध झालीयत. पंजाबमधल्या जालंधर शहरातून तर हिमालयाची दूरस्थ, बर्फाच्छादित शिखरं दिसायला लागलीयत. गेल्या पाव शतकात असा मनोहारी देखावा तिथून दिसला नव्हता.

ही सगळी एका अवकृपेची कृपा किंवा काळ्या ढगाला रुपेरी किनार म्हणतात तसं घडलंय. अवघ्या जगावर कसली अवकृपा होऊन जनजीवनाला अवकळा आली आहे हे तर आता पोरासोरांनाही ठाऊक आहे. कोरोनाच्या संकटाने जगातले जवळपास सर्व व्यवहार ठप्प झालेत. मुंबईची लोकल आणि देशातली रेल्वेसेवा पूर्णपणे स्तब्ध होण्याची ही बहुधा तिसरी वेळ आहे. 1928 मध्ये दक्षिण भारतातील रेल्वे सेवा 29 जून ते 2 ऑगस्ट या काळात संपामुळे थांबली होती. 8 मे ते 27 मे 1974 चा रेल्वे संप तर आम्ही प्रत्यक्ष अनुभवला. यावेळी मात्र कोणत्याही मानवी मागणीसाठी किंवा कारणासाठी रेल्वे बंद नाही. ही सारी कोरोनाची करणी आहे. ‘सोशल डिस्टन्सिंग’ प्रभावीपणे अंमलात आणायचं तर सरकारपुढे रेल्वे, विमान आणि इतर दळणवळण सेवा बंद करण्यावाचून पर्यायच नव्हता. 22 मार्चपासून आपण आयुष्यातला हा अभूतपूर्व काळ अनुभवत आहोत. आपण म्हणजे जगभराची सारी माणसं. त्याचा त्रासही अनेकांना होतोय पण महामारीपेक्षा तो बरा म्हणून सोसावा लागतोय.

या बंधनांचा परिणाम प्राणी-पक्षी जगतावर मात्र नाही. माणसांचे कायदेच त्यांना लागू होत नाहीत. त्यांचं जीवन कायद्याच्या नव्हे तर निसर्गाच्या नियमांनुसार चालतं. मानवी वस्ती जिथे वाढते तिथे या प्राणी-पक्ष्यांचा संचार कमी होतो किंवा केला जातो. तरीही त्यांना ते कळत नसल्याने अधूनमधून माणसांच्या वस्तीत घुसतात. खरं तर माणसानेच इतका काळ त्यांच्या वस्तीत घुसखोरी केलेली आहे. मग कुठे शहरी वस्तीत बिबटय़ा किंवा अजगर दिसला की घबराट उडते. वन विभागाचे लोक आणि सर्पमित्र वगैरे मंडळी लोकांची या संकटातून सुटका करतात. मात्र रस्त्यावर मोर, हरिण आली, सुंदर पक्ष्यांनी परिसर गजबजला तर माणसाला हवाहवासा वाटतो.

जागतिक दळणवळण आणि कारखाने बंद झाल्यापासून एकूणच प्रदूषण कमालीचं खाली आलं. गंगेपासून पंचगंगेपर्यंतच्या नद्या स्वच्छ होऊ लागल्या. मोकळा श्वास घेता आल्याने माणसांना होणारे दम्यासारखे रोग कमी होऊ लागले. आजच जागतिक अस्थमा किंवा दमा दिवस आहे. या दम्याने अनेकांच्या नाकी दम आणलेला असतो. 135 कोटी लोकांच्या हिंदुस्थानात हे प्रमाण सुमारे 3 टक्के म्हणजे किती आहे ते बघा. सध्या ‘कोरोना’मुळे चेहर्‍यावर मास्क लावावं लागतंय पण नेहमीसुद्धा दिल्लीपासून पुण्यापर्यंतच्या अनेक शहरांत साध्या कापडाचं ‘मास्क’ लावूनच वावरावं लागतं त्याचं काय?

कुणीतरी परवा म्हणालं की, ‘कोरोना’सारख्या रोगाच्या धास्तीने ‘लॉकडाऊन’ करण्याची वेळ पुन्हा येऊ नये पण प्रदूषण नियंत्रणासाठी, नियोजनबद्ध कार्यक्रम आखून प्रदूषण वाढवणारा अनावश्यक प्रवास दरवर्षी काही काळ थांबवता आला तर! अर्थात एकदा सर्व व्यवहाराला गती आली की एकदम रोखणं कठीणच असतं. त्यामुळे ‘कोरोना’ तर घालवायलाच हवा पण हवा-पाणीही स्वच्छ कसं राहील याचा विचार जागतिक सत्ताधीश करतील?

ते जाऊ दे. पण आताच्या घडीला स्वच्छ हवेत श्वास घेऊया. स्वच्छ वातावरणामुळे ‘रेस्परेटरी’ किंवा ‘श्वसनाच्या व्याधी कमी झाल्या तर रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल. जगाच्या गतीमध्ये ‘कोरोना’ने अचानक खिळ घातली हे वाईटच. परंतु ही गती खर्‍या अर्थाने प्रगती ठरायची तर वसुंधरेचा श्वासही मोकळा असायला हवा. त्यासाठी कोरोनासारखं संकट मात्र नको. सर्वसमावेशक प्रगतीचा ‘सम्यक्’ (बॅलन्स्ड) विचार रुजायला पाहिजे. जीवन पूर्वपदावर आल्यानंतरही ‘आकाश मोकळे’ रहावे यासाठी ‘ग्लोबल प्रयत्नांची गरज आहे’, सूज्ञपणाचंही ‘ग्लोबलायझेशन’ व्हावं.