विज्ञान-रंजन – धुरक्याचा पडदा!

>> विनायक

काही महिन्यांपूर्वी ‘स्वच्छ’ हवेचे आपल्या देशातले ठिकाण होते कर्नाटकातले गदग शहर. आजही तसेच आहे. तिथे प्रदूषण कणांची संख्या प्रतिदशलक्ष फक्त 10 ते 15 होती. आज हा लेख लिहीत असताना दिल्लीतही पार्टिकल्स पर मिलयन म्हणजे ‘पीपीएम’ संख्या 100 ते 300 आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत ती 11 ते 50 टक्के इतकी, तर कोलकाता आणि चेन्नई या महानगरांत अनुक्रमे 290 पीपीएम आणि 153 एवढी आहे. शेवटच्या दोन शहरांत ती ‘पुअर’ म्हटली जातेय.

‘स्मॉग’ ही विसाव्या शतकातील ‘प्रगती’ची देणगी आहे. ‘स्मोक’ आणि ‘फॉग’ किंवा धूर आणि धुके यांच्या जुळणीतून (पोर्टमेन्टॉ) हा शब्द इंग्लंडमध्ये 1952 च्या सुमारास प्रचलित झाला. त्या वेळी लंडन शहरात नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डायॉक्साइड, धूर आणि इतर प्रदूषण कणांचे प्रमाण प्रचंड वाढले होते. त्याची कथा जगाच्या डोळय़ांत अंजन घालणारी ठरायला हवी होती, पण ‘प्रगती’च्या ‘गती’चा हव्यास असलेल्या जगाने ती नजरेआड केली. त्याला ‘ग्रेट स्मॉग’ असे म्हटले गेले होते. कधी घडला हा प्रदूषणोत्पात? अगदी अचूक सांगायचे तर शुक्रवार 5 डिसेंबर ते मंगळवार 9 डिसेंबर 1952 या पाच दिवसांत लंडन शहर कमालीचे घुसमटले होते. कोळशाच्या धुराचे प्रमाण हवेत इतके वाढले आणि प्रचंड थंडीमुळे दाट होऊन हवेच्या खालच्या थरापर्यंत पसरले की, दोन फुटांवरचेही स्पष्ट दिसणे अशक्य झाले. या धुरक्याचा जोर इतका होता की, थंडीमुळे दारे-खिडक्या घट्ट लावलेल्या घरातही ते सांदीकोपऱयातून घुसले आणि बाहेरची आधीच खराब झालेली हवा घरात घेणे शक्य नसल्याने अवघे शहर घुसमट सहन करत राहिले. त्याने ब्रिटिश सरकारच्या अंदाजानुसार त्या वेळी चार हजार, तर इतर अंदाजानुसार दहा हजार बळी घेतले आणि एक लाख लोक बाधित होऊन त्यांना कसले ना कसले आजार सुरू झाले.

इंग्लंडचे हे उदाहरण सध्या पृथ्वीभर पसरत चालेल्या ‘धुरक्या’साठी घेण्याचे कारण आधुनिक यांत्रिक प्रगती तिथे 13 व्या शतकापासून दिसू लागली. यांत्रिक संशोधनाचे फायदे तर अनेक होते. माणसाला कष्टदायी ठरणारी अनेक कामे यंत्रे करत होती. तीसुद्धा अधिक सफाईदार पद्धतीने आणि मजबुतीने. त्यामुळे विविध यंत्रांची मागणी वाढली. यंत्रांनीच नवी यंत्र बनवण्याचे कारखाने उभे राहिले. जॉन एव्हलीन यांनी 1661 मध्ये ‘फ्युमिफ्युजियम’ या पुस्तकात लंडनमधील अशुद्ध होत चालेल्या हवेचे वर्णन करून फार पूर्वीच धोक्याचा इशारा दिला होता. त्याचा उच्चांक गाठला गेला तो 1952 मध्ये आणि त्यातून जाग आलेल्या ब्रिटिश सरकारने 1956 मध्ये ‘क्लीन एअर अॅक्ट’ मंजूर केला. परंतु ‘स्वच्छ हवेचा’ नुसता कायदा करून सर्व साध्य होत नाही.

नैसर्गिक प्रदूषणात जगातल्या दाट जंगलांमध्ये वारंवार होणारे आणि महिनोन्महिने टिकणारे अग्नितांडव. कधी दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन खोऱ्यात, तर कधी इंडोनेशियासारख्या पूर्वेकडच्या देशात वणवे पेटतात. या ‘वाईल्ड फायर’ची व्याप्ती एवढी असते की, अनेक हेलिकॉप्टर्समधून पाण्याचे तीव्र फवारे मारले तरी आग शमत नाही. वरवर थांबली असे वाटले तरी आत धुमसत राहते आणि हवेचा, वादळाचा वेग वाढताच पुन्हा पह्फावते. यात असंख्य झाडे-पाने, दुर्मिळ वनस्पती आणि जंगलातून बाहेर पडण्यास असमर्थ ठरलेले पशू-पक्षी बळी पडतात. दुसरा प्रकार म्हणजे एखादा ज्वालामुखी ‘ऑक्टिव्ह’ होऊन एकदम आग-धूर ओकू लागतो. दाट काळे ढग आसपासची हवा व्यापतात. याशिवाय मानवनिर्मित प्रदूषणात सर्व प्रकारच्या इंधनांतून निर्माण होणारा धूर आणि रसायने तसेच कुजलेले, आंबलेले पदार्थ, पिकांचे पाचट मोठय़ा प्रमाणावर जाळल्यावर होणारा धूर हवा अशुद्ध करतो. दिल्लीत हा प्रकार वारंवार होतो. वाऱ्याच्या दिशेमुळे ठरावीक दिवसांत परागकण, धूलिकण, धूर, रसायने, वाळूची वादळे अशा अनेक गोष्टींमुळे नैसर्गिक आणि कृत्रिम प्रदूषणाची निर्मिती होते व थंडीच्या दिवसांत ही ‘प्रदूषके’ हवेच्या खालच्या थरात ‘सेटल’ झाल्याने पिंवा बराच वेळ स्थिरावल्याने श्वासाचे विकार वाढतात. श्वासनलिकेचा दाह (ब्रॉन्कायटिस) आणि अस्थमा (दमा) हे आजार जगातल्या शहरी भागात गेल्या 50-60 वर्षांत वेगाने वाढताना दिसतात. त्यावर उपाय म्हणून स्वच्छ हवेच्या ठिकाणी ‘पिकनिक’ला जाऊन सुखाचा श्वास घेताना आपण तिथे प्लॅस्टिक, सिगारेट इत्यादी गोष्टींनी प्रदूषण करणार नाहीना याची काळजी घ्यायला हवी. पण सारे समजूनही उमजत नाही हे विज्ञान रंजन करते तसे कधी कधी डोळय़ांत ‘अंजन’ही घालते. विज्ञानाचा वापरही वैज्ञानिक शिस्तीने केला तरच ते ‘रंजक’ ठरेल.