आरोग्यमंत्री हरवले आहेत!

देशात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. भाजपशासित राज्यांमध्ये ‘आम्ही स्थिती चांगली हाताळली’ वगैरे म्हणत भाजपाई मंडळी स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेत असताना कोरोनाने त्यातला फोलपणा उघड केला. मध्य प्रदेश हे कोरोनाने तडाखा दिलेले आणखी एक महत्त्वाचे राज्य. मुळातच मध्य प्रदेशातले शिवराजसिंग चौहान सरकार सत्तेवर आले तेच शपथविधीवेळी तोंडावर मास्क घालून.

कमलनाथांचे सरकार पाडून शिवराज सत्तेवर आले तेव्हापासून कोरोना आणि त्यांच्या सरकारचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. शिवराज यांनीही आपापल्या परीने कोरोनाची स्थिती हाताळली आहे. मात्र या महासंहारक कोरोना लाटेत शिवराज यांचे आरोग्यमंत्री प्रभुराम चौधरी हे हरवलेले आहेत.

कोरोनाचे थैमान त्या राज्यात सुरू असताना आरोग्यमंत्री म्हणून यांचे दर्शन जनतेला झालेले नाही. मूळचे काँग्रेसी व ज्योतिरादित्य सिंधियांबरोबर भाजपचा गमचा गळ्यात घातल्यामुळे प्रभुराम व मुख्यमंत्र्यांमध्ये फारसे टय़ुनिंग नाही. ज्योतिरादित्य गट प्रभावहीन करण्यासाठी शिवराज यांनी अशा आयात मंत्र्यांना फारसे काम दिलेले नाही. अधिकार व कामच नसेल तर मंत्रालयात कशाला यायचे आणि करायचे तरी काय, असा प्रभुरामांच्या निकटवर्तीयांचा सवाल आहे. कोरोना कालखंडात ‘अदृश्य’ झालेल्या प्रभुरामांचे (चौधरी) यांचे ‘दर्शन’ मध्य प्रदेशच्या जनतेला कधी होईल हे दस्तुरखुद्द् प्रभुरामच जाणोत..

आपली प्रतिक्रिया द्या