
>> पंढरीनाथ सावंत
संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी केशव सीताराम ठाकरे यांना ‘प्रबोधनकार’ बनवणाऱ्या ‘प्रबोधन’चा पहिला अंक 16 ऑक्टोबर 1921 ला प्रकाशित झाला. ‘प्रबोधन’चे शताब्दी वर्ष आजपासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने हा विशेष लेख.
केशव सीताराम ठाकरे या अथांग माणसाला प्रबोधनकार हा लोकमान्य किताब कशामुळे लाभला याची माहिती आजसुद्धा बहुतेकांना नाही. कारण त्यांच्या अंगच्या अनेकविध कलाकाैशल्यामध्येच माणसे रंगून आणि गुंगून गेली. प्रबोधनकार ठाकरे काय काय होते याचा थोडा मागोवा घेतल्याशिवाय त्यांना ‘प्रबोधना’ला जन्म देण्याची तातडी का लागली आणि ते त्यांनी कसे केले याकडे जाणे अवघड आहे.
त्यांच्या कलाकाैशल्याचा ढोबळ शोध घेतला तरी काय काय हाती लागते पहा. ते उत्कृष्ट छायाचित्रकार होते. पहिल्या श्रेणीचे चित्रकार होते. चारकोलपासून तैलरंगापर्यंतची त्यांच्या हातची चित्रं मी डोंबिवलीत पाहिली होती. वादविवाद हा त्यांचा खास प्रांत होता. पण वाद आपली अक्कल पाजळण्यासाठी नव्हे. समाजातले अनिष्ट घालवण्यासाठी. वादाची पद्धत त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘घाव घाली निशाणी’ अशी. वक्तृत्व त्यांचे विलक्षण आहे. त्यांचा टाइपरायटरवर चालणारा हात सुरू झाला की, लेखाच्या शेवटच्या पूर्णविरामापाशीच थांबत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या महासंग्रामात त्यांनी म्हातारपणी तुरुंगवास भोगला होता. त्यांनी अत्रेसाहेबांच्या दोन चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. त्यांनी चित्रपटांचे पटकथा-संवाद लिहिले. चरित्रकार, इतिहासकार म्हणून त्यांची योग्यता मोठी होती. ते समाजात उलथापालथ घडवून आणणारे नाटककार होते. जे कधी माहीत झाले नसते ते माहीत करून देणारे इतिहासकार होते. ऐतिहासिक वादासाठी त्यांच्या ‘कोदंडाचा टणत्कार’ ठणाणल्याशिवाय राहत नसे. त्यांनी 25 च्या वर पुस्तके लिहिली. ते दौऱयावर जात तेव्हा जिथे मुक्काम तिथे लेख असा त्यांचा खाक्या होता. जळगावच्या नेहेते यांच्या वृत्तपत्रात त्यांनी ‘घाव घाली निशाणी’ हे साप्ताहिक सदरच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात चालवले होते.
पत्रकारितेची लागण त्यांना फार लवकर म्हणजे इंग्रजी 4 थ्या- 5 व्या यत्तेच्या काळात झालेली दिसते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर इंग्रजी साधारण लिहू, बोलू लागल्यावर त्यांना मुंबईच्या रस्त्यांवरील पुस्तकांच्या दुकानांमधून चांगली चांगली पुस्तके (दोनचार पैशांना) विकत घेण्याचा नाद लागला. ‘पॉकेट एन्सायक्लोपीडिया’ या पुस्तकातील छत्र्यांची उत्पत्ती आणि वर्तमानपत्रांची उत्पत्ती या विषयावरील माहितीचे भाषांतर करून हरिभाऊ (ह. ना.) आपटे यांच्या ‘करमणूक’ साप्ताहिकाला पाठवले. ते छापून आले. हरिभाऊंचे काwतुकाचे पत्र आले. त्यात वरचेवर लेख पाठवीत जावे अशी सूचनाही होती.
याच काळात प्रबोधनकारांनी साप्ताहिक ‘विद्यार्थी’ नावाचे पत्र स्वतः लिहून आणि स्वतः छापून प्रसिद्ध करण्याचा उद्योग केला. त्यातले लेख, नक्षी, मथळा, लेखन आणि छपाई सगळे प्रबोधनकारांचे होते. त्याची छपाई करण्यासाठी त्यांनी कॉपिंग शाईतंत्र शिपून घेतले आणि पहिल्या अंकाच्या 50 प्रती शाळेत मास्तरांसकट सगळय़ांना वाटल्या. हा खटाटोप त्यांनी चार-सहा महिने केला.
अशा माणसाला, त्यातल्या त्यात लढाऊ समाज सुधारकाला आपल्या व्रतासाठी स्वतः वर्तमानपत्र काढावे असे वाटले नाही तरच नवल आणि अशा विचारांतूनच ‘प्रबोधन’ पाक्षिकाचा जन्म झाला. 1921 सालच्या सप्टेंबरात त्यांचा वृत्तपत्र काढण्याचा निश्चय झाला. त्यावेळी प्रबोधनकार सरकारच्या नोकरीत होते. सरकारी नोकरीत राहून वर्तमानपत्र काढणे शक्य नव्हते. राजीनामा देण्याची गरज होती. त्यांनी वरिष्ठांना कळवले. चीफ सेव्रेटरी रॉबर्टसन यांच्याकडे प्रकरण गेले. एका खास सरकारी हुकमाने त्यांना वृत्रपत्र काढण्याची परवानगी देण्यात आली. ‘पण पुन्हा अशी परवानगी कोणाला देऊ नये’ अशा अटीसह, त्याबद्दल प्रबोधनकार लिहितात.
‘‘कर्दनकाळ ब्रिटिश सरकारच्या अमदानीत सरकारी नोकरीत असतानाही वर्तमानपत्र काढण्याची खास परवानगी मिळवणारा मला वाटते मीच पहिला आणि शेवटचा गव्हर्नमेंट सर्वंट आहे.’’
अशा प्रकारे परवानगी मिळवून सुरू केलेल्या वर्तमानपत्राचे नाव केशव सीताराम ठाकरे यांनी ‘प्रबोधन’ ठेवले. त्याचा पहिला अंक 16 ऑक्टोबर 1921 रोजी प्रसिद्ध झाला. त्याचे शताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त त्याच्या जन्माची ही गोष्ट थोडक्यात. सबंध वाचायची असेल तर प्रबोधनकारांची ‘माझी जीवनगाथा’ वाचावी.























































