लेख – लॅटिन अमेरिका आणि मध्यपूर्वेत आंदोलनांचे लोण

614

सनत कोल्हटकर ([email protected])

जगातील अनेक देशांत वेगवेगळी आंदोलने होत आहेत. कारणे वेगवेगळी असली तरी तेथील सामान्य नागरिकांमध्ये असंतोष आहे हे निश्चित. आशियात हाँगकाँगमध्ये चिनी सरकारविरुद्ध तेथील नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत. उत्तरपूर्व आफ्रिकेतील  इथिओपियामधील  लोकही आंदोलन करीत होते. त्याशिवाय लॅटिन अमेरिकेतील चिली, इक्वेडोअर, अर्जेंटिना, व्हेनेझुएला, पेरू, होंडुरास, ब्राझिल, बोलिव्हिया या देशांमध्ये तसेच मध्य पूर्वेतील लेबनॉन, सीरिया, तुर्कस्तान, पाकिस्तान या देशांमध्येही जनआंदोलनांचा उद्रेक झाला आहे

सध्या जगाच्या अनेक भागांत वेगवेगळय़ा आंदोलनाचे लोण पसरलेले आहे. प्रत्येक ठिकाणी कारणे वेगवेगळी असली तरी सामान्य नागरिकांमध्ये असंतोष आहे हे निश्चित. आशियात गेल्या सात महिन्यांपासून हॉंगकॉंगमध्ये चिनी सरकारविरुद्ध तेथील नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत. उत्तरपूर्व आफ्रिकेतील  इथिओपियामधील  लोकही आंदोलन करीत होते. त्यांचे आंदोलन तूर्तास शमले असले तरी ते परत पुनरुज्जीवितही होऊ शकते. मात्र या सर्व आंदोलनात एक समान धागा दिसून येतो तो म्हणजे या सर्व देशांतील लोक तेथील सत्ताधाऱयांवर नाराज आहेत.

चिली देशामध्ये चालू असलेल्या आंदोलनामध्ये आतापर्यंत 20 लोक मरण पावले आहेत. गेले काही आठवडे चिलीमधील लोक तेथील रस्त्यांवर उतरले आहेत. या निदर्शनांमुळे चिलीमध्ये आयोजित केल्या गेलेल्या दोन आंतरराष्ट्रीय परिषदा रद्द कराव्या लागल्या. चिलीच्या पर्यटनक्षेत्राला या आंदोलनामुळे फटका बसला आहे. चिलीमधील  मेट्रोचे भाडे वाढवायचे निमित्त झाले आणि लोक रस्त्यांवर उतरले. नागरिकांच्या उत्पन्नातील असमानता हा विषयही आता पुढे आलेला दिसतो आहे. चिलीच्या सरकारने  विजेचे बिल वाढविण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली तरी लोकांचा राग शांत होण्याची लक्षणे नाहीत.

इक्वेडोरची राजधानी क्विटो येथे तेथील नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत. तेथील राष्ट्राध्यक्ष लेनिन मोरेनो यांनी इंधनाच्या किमतीवर सरकारकडून दिली जाणारी सूट काढून टाकावयाचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि लोक रस्त्यांवर उतरले. तेथील राष्ट्राध्यक्ष लेनिन हे काही काळ राजधानी क्विटोमधून पळून गेले आणि त्यांचे इक्वेडोरमधील पूर्वसुरी राफेल कोरिया यांनी बंडाचा  प्रयत्न केल्याचे सांगितले.

अर्जेन्टिनाची अर्थव्यवस्था तर सध्या वाईट अवस्थेत आहे. त्यात तेथे निवडणुकीचे वारे वाहत असून तेथील अर्थव्यवस्था हाच निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्जेंटिनाच्या डोक्यावर जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज आहे.

व्हेनेझुएला गेल्या दोन वर्षांपासून अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी झगडतो आहे. तेथील चलनाचे मूल्य जबरदस्त घसरलेले आहे. व्हेनेझुएलाचे अनेक नागरिक देश सोडून कोलंबिया,  पेरू आणि इतर देशांत गेले आहेत. व्हेनेझुएलाचे सध्याचे अध्यक्ष निकोलस मादुरो हे तेथील निवडणुकीत गैरप्रकार करून निवडून आल्याचा आरोप अमेरिका, युरोप, कोलंबिया या सर्वांनी केला आहे. या सर्वांनी व्हेनेझुएलाचे विरोधी पक्षनेते जुआन ग्वाडो यांनाच व्हेनेझुएलाचे हंगामी अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे. लॅटिन अमेरिकेत पसरलेल्या असंतोषाची सुरुवात व्हेनेझुएलामधूनच झाली असल्याचा अनेक देशांचा आरोप आहे. व्हेनेझुएलाचे असंख्य नागरिक इतर देशांमध्येच घुसले असून अनधिकृत निर्वासित म्हणून राहत आहेत. या असंख्य लोकांना पोसण्याचा खर्च या देशांना पेलवेनासा झाला असावा असे दिसते आहे.

पेरूमध्ये येत्या जानेवारीमध्ये निवडणूक अपेक्षित आहे. तिथेही भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आली. मागील आठवड्यातच मार्टिन वीजकर या पेरूच्या अध्यक्षांनी तेथील संसद बरखास्त केली. विरोधक भ्रष्टाचाराचा तपास होऊ देत नसल्याचा त्यांनी आरोप केला.

होंडुरास या देशाच्या अध्यक्षांच्या भावावरच अमली पदार्थांच्या व्यापाराचा आरोप झाला. तिथेही राजकीय अस्थिरता आहे. अमेरिकन न्यायालयात त्याच्यावर गुन्हा सिद्ध झाला असून टोनी या त्यांच्या भावावर 200 टन कोकेन अमेरिकेत आणल्याचा आरोप होता.

ब्राझीलमधील जंगलांना लागलेल्या प्रचंड आगीने जगाचे लक्ष वेधले गेले होते. ब्राझीलने जंगले बेचिराख करणाऱ्या वणव्याला आटोक्यात ठेवण्यासाठी आर्थिक तरतूद करावयास नकार दिला. त्यात गेल्या जानेवारीमध्ये ब्राझीलमधील वेल नावाच्या एका धरणफुटीने मोठी जमीन पायाखाली गेली. शेकडो लोक या धरणफुटीमुळे मरण पावले. ब्राझीलमधील अनेक खाणींमधून निघणारा गाळ या धरणफुटीमुळे बाहेर आला. ब्राझील सरकारला जंगले जळून गेल्यावर जी जमीन उपलब्ध झाली आहे, ती उद्योगांना देण्याचा डाव असल्याचा ब्राझीलच्या अध्यक्षांवर आरोप झाला. ही आग आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न न केल्याने फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोन आणि ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोलसेनारो यांच्या वादाची ठिणगी पडली. ती ठिणगी व्यक्तिगत पातळीवर पोहोचल्याचेही जगाने बघितले.

बोलिव्हिया हाही लॅटिन अमेरिकेतील एक देश आहे. ब्राझील, पॅराग्वे, अर्जेंटिना, चिली आणि पेरू या देशांशी बोलिव्हियाच्या भौगोलिक सीमा भिडलेल्या आहेत. या देशाला सागरी सीमा नाहीत. बोलिव्हियामध्ये सध्या तिथे नुकत्याच झालेल्या निवडणुकीवरून तेथील स्थानिक लोक रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या रविवारी तेथील अध्यक्षांच्या निवडणुकीचा निर्णय जाहीर झाला आणि त्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा लोकांचा आरोप असल्याने लोक रस्त्यांवर उतरले आहेत. रस्त्यांवर अडथळे उभे करणे, जाळपोळ सुरू आहे. लोकांनी अनेक मतमोजणी केंद्रावरच हल्ले केले. मोरालेस आणि मेसा हे दोन उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

इकडे मध्यपूर्वेतील लेबनॉन हाही गेल्या दोन आठवडय़ांपासून लोकांच्या असंतोषाला सामोरे जात आहे. साद हरिरी या लेबॅनॉनच्या पंतप्रधानाने नुकताच पंतप्रधानपदाचा राजीनामाही दिला आहे. लेबनॉन यापुढे अराजकतेकडे वाटचाल करतो की काय अशी भीती आहे. एका बाजूला इस्राएल, अमेरिका, सौदी अरेबिया तर दुसरीकडे इराण, तुर्कस्तान आणि त्यांचे मित्र देश या दोन्हीमध्ये चालू असलेल्या सुप्त संघर्षाची लेबनॉन ही संघर्षभूमी बनते की काय ही भीतीही आहे. सीरियामध्ये तर संघर्ष पाचवीलाच पुजलेला आहे. तिथेही तुर्कस्तान आणि सीरिया यांच्या घनघोर चकमक चालू आहे. येमेनमध्येही सौदी अरेबिया, मित्रदेश आणि इराणप्रणीत हैती बंडखोर यांच्या खडाखडी चालू आहे. पाकिस्तानमध्येही नुकताच मौलाना फजलूर रहमान यांनी इस्लामाबादपर्यंत काढलेला लॉंग मार्च आणि तेथील पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी यामुळे पाकिस्तान ढवळून निघाला आहे. पाकिस्तानी सामान्य जनता ‘कश्मीर नको, आधी रोटी द्या!’ अशी मागणी करत आहे. पाकिस्तानमध्येही महागाईने उच्चांक गाठला आहे. इम्रान खान यांना डच्चू देऊन लष्कर सत्ता ताब्यात घेईल की काय अशी लक्षणे आहेत. एकंदरीत लॅटिन अमेरिकेपासून मध्यपूर्वेतील अनेक देशात वेगवेगळय़ा कारणांवरून जनआंदोलनांचे लोण सध्या पसरले आहे. त्याचे नेमके काय परिणाम त्या देशांवर होतात हे नजिकच्या भविष्यात समजलेच.

आपली प्रतिक्रिया द्या